मानवी आतड्याला होणारा एक तीव्र सांसर्गिक रोग. पटकी हा रोग स्वल्पविराम चिन्हाच्या आकाराच्या व्हिब्रिओ कॉलेरी या जीवाणूंमुळे होतो. बाधित व्यक्तीच्या विष्ठेने दूषित झालेल्या पाण्यामुळे या रोगाचा फैलाव होतो. या रोगाला महामारी, जरीमरी, विषूचिका असेही म्हणतात. पटकी या रोगाचे उगमस्थान भारतीय उपखंडात असावे. गंगा नदीच्या खोऱ्यामध्ये हा रोग प्राचीन काळात पसरल्याच्या नोंदी आहेत. १८१७ च्या सुमारास हा रोग रशियात पसरला आणि तेथून यूरोप आणि अमेरिकेत पसरला. गेल्या २०० वर्षांत जगभरात सात वेळा पटकीच्या साथी येऊन गेल्या आहेत. २०१० मध्ये जगभरात ३०–५० लाख लोकांना हा रोग झाला आणि त्यात १,००,०००–१,३०,००० लोक दगावले गेले असावेत, असा अंदाज आहे.
पटकीच्या जीवाणूंचे शरीरात संक्रामण झाल्यानंतर एक-पाच दिवसांत एकाएकी जुलाब आणि उलट्या होणे, हे या रोगाचे मुख्य लक्षण आहे. जुलाब धुतलेल्या तांदळाच्या पाण्यासारखे असून त्याला माशांसारखा वास येतो. पटकीबाधित व्यक्तीवर त्वरित उपचार न केल्यास त्याच्या शरीरातून दिवसाला १०–२० लि. पाणी बाहेर टाकले जाऊन निर्जलीभवन होते आणि त्याला मृत्यू येतो. प्राथमिक उपचारामध्ये तोंडावाटे क्षार आणि पाणी देतात. रोगाची तीव्रता अधिक झाल्यास शिरेवाटे लवणद्राव (सलाइन) देतात आणि शरीरातील क्षार तसेच पाण्याचे प्रमाण पूर्ववत करतात.
पटकीचे जीवाणू (व्हिब्रिओ कॉलेरी) कोणत्याही वातावरणात राहतात. तसेच ते पिण्याच्या पाण्याच्या स्रोतात असतात. निरोगी व्यक्ती पटकीने बाधित होण्यासाठी सु. १० कोटी जीवाणू त्या व्यक्तीच्या शरीरात शिरावे लागतात. उन्हाळ्याच्या शेवटी आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला या जीवाणूंचा अधिक प्रसार झाल्याचे आढळून येते. हे जीवाणू मोठया संख्येने माणसाच्या शरीरात अन्नातून व पाण्यातून घुसतात. जठरातील आम्लामुळे त्यांपैकी बरेचसे मरतात; परंतु जे जीवाणू जिवंत राहतात, ते पुढे लहान आतडयात शिरतात आणि तेथे क्रियाशील होऊन जहाल जीवविष तयार करतात. या जीवविषामुळे आतडयाच्या पेशींतून पाणी आणि सोडियम (Na+), पोटॅशियम (K+), क्लोराइड (Cl–), बायकार्बोनेट (HCO3–) ही आयने आतडयाच्या पोकळीत जमा होतात. यांमुळे आतडयातील श्लेष्मकलेच्या पेशींचा नाश होतो आणि शौचावाटे ते सर्व पदार्थ बाहेर टाकले जातात. वारंवार जुलाब झाल्याने रुग्ण शुष्क होतो, त्याला अतिशय थकवा येतो आणि त्याचा रक्तदाब कमी होतो. अशा निर्जलीभवनामुळे रुग्ण दगावू शकतो.
पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांमध्ये मलमूत्र मिसळले जाणार नाही, याची काळजी घेतल्यास पटकीचा प्रसार रोखता येतो. पटकीचे जीवाणू सागरी खेकडे आणि तिसऱ्या यांच्या शरीरातही असतात. पटकीचा संसर्ग टाळण्यासाठी ते स्वच्छ धुवून घ्यावेत. पिण्याच्या आणि वापराच्या पाण्याचे क्लोरिनीकरण करावे. पटकीवर जलसंजीवनी देणे हा प्रथमोपचार असून एरिथ्रोमायसीन, क्लोरँफिनिकॉल, टेट्रासायक्लिन इत्यादी प्रतिजैविके रुग्णाला देण्यात येतात. आजही यात्रेच्या ठिकाणी पटकीची साथ टाळण्यासाठी सर्व भाविकांना पटकीची लस देतात.