स्तनी वर्गातील नरवानर गणाच्या लेमुरिडी कुलात लेमूर प्राण्यांचा समावेश होतो. ते फक्त मादागास्कर आणि त्यालगतच्या कोमोरो बेटांवर आढळतात. मोठ्या संख्येने आढळून येणाऱ्या रिंग टेल्ड लेमूर या जातीचे शास्त्रीय नाव लेमूर कट्टा आहे. ती जाती पश्चिम मादागास्करच्या खडकाळ भागात राहते. लेमूर प्राण्यांच्या सु. ११२ जाती असून ते विविध आकारांत असतात. साधारणपणे ते आकाराने मांजराएवढे असून दिसायला माकडासारखे दिसते.

लेमूर प्रामुख्याने दिनचर असून ते टोळक्याने राहतात. त्यांच्या एका टोळक्यात ६–२० लेमूर असतात. फळे, पाने, पक्षी व त्यांची अंडी, कीटक इत्यादी ते खातात. ते चपळ असून अनेकदा झाडांच्या फांद्यांवर उड्या मारीत असताना दिसतात. त्यांचा आवाज कर्कश, शीळ घातल्याप्रमाणे किंवा किंकाळ्या मारल्यासारखा असतो. रोज उन्हात बसून उन्हे खायची त्यांना सवय असते. बहुतेक वेळा मादी त्यांच्या समूहाला दिशानिर्देशन करताना दिसते.

लेमूर निरुपद्रवी असून ते सहज माणसाळतात. प्रसंगी ते शेतीचे नुकसान करतात; परंतु ते फार उपद्रवी नाहीत. लेमूर या प्राण्याच्या पुढील जाती आढळून येतात.

रिंग टेल्ड लेमूर (लेमूर कट्टा)

रिंग टेल्ड लेमूर (लेमूर कट्टा) : यांच्या शरीराची लांबी सु. ६० सेंमी. असते. त्यांचे वजन सु. २.३  किग्रॅ. इतके असते. लेमूर वन्य स्थ‍ितीत सु. १६ ते १९ वर्षे जगतात मात्र बंदिवासात सु. २७ वर्षे जगल्याची नेांद आहे. शरीर सडपातळ आणि पाय काटकुळे असतात. शेपटी लांब व झुपकेदार असून तिच्यावर एकाआड एक काळी आणि पांढरी वलये असतात. पाठीचा रंग राखाडी असून पोटाकडचा भाग पांढरा असतो. चेहरा लांबोडका असतो. डोळे मोठे असून चेहऱ्याच्या किंचित बाजूला असतात. कान मध्यम लांबीचे व केसाळ असतात. पुढच्या पायांपेक्षा मागचे पाय लांब असतात. मागच्या पायांच्या दुसऱ्या बोटांवर नखर असते. इतर बोटांवर सपाट नखे असतात. मादीची गर्भधारणा वर्षातून एकदाच होते. गर्भावधी १४६ दिवसांचा असतो. मादी एका खेपेला एक किंवा दोन पिलांना जन्म देते.

रफ्ड लेमूर (लेमूर व्हेरिॲगॅटस)

रफ्ड लेमूर (ले. व्हेरिॲगॅटस) : यांच्या शरीराची लांबी सु. ६१ सेंमी. असते. यांच्या मानेच्या दोन्ही बाजूंना आयाळीप्रमाणे लांब केसांचे झुपके असून अंग काळ्या व पांढऱ्या रंगाचे असते.

तपकिरी लेमूर (लेमूर फल्व्हस)

तपकिरी लेमूर (ले. फल्व्हस) : हे प्राणी मळकट रंगाचे असतात. त्यांच्या शरीराची लांबी सु. ५० सेंमी. असते. मंगूस लेमूर (ले. मंगोस) व लाल पोटाचे लेमूर (ले. रुब्रिव्हेंटर) यांच्यासारख्या इतर जातींपासून त्यांना वेगळे ओळखणे अवघड असते. तपकिरी लेमूर याचे वजन सु. २ ते ३ किग्रॅ. असते. वन्य स्थितीत ते साधारणत: २५ वर्षे तर बंदिवासात सु. ३६ वर्षे जगतात.

इंड्री लेमूर (इंड्री इंड्री)

इंड्री लेमूर (इंड्री इंड्री) : ही लेमुरिडी कुलातील सगळ्यांत मोठी जाती असून याच्या शरीराची लांबी सु. ७१ सेंमी. असते. चेहऱ्यावर केस नसतात. शेपूट अगदीच लहान म्हणजे सु. ५ सेंमी. लांब असते. त्यांचे वजन सु. ६ ते ९.५ किग्रॅ. असते. ते लयीत आवाज काढतात. साधारणत: बंदिवासातील त्याचे आयुर्मान सु. ४० वर्षांपर्यंत असते.

ग्रे माऊस लेमूर (मायक्रोसेबस म्युरिनस)

ग्रे माऊस लेमूर (मायक्रोसेबस म्युरिनस) : ही लेमुरिडी कुलातील एक लहान जाती आहे. ते उंदरापेक्षा थोडे मोठे, निशाचर असून त्यांच्या हालचाली खारीसारख्या असतात. त्याच्या शरीराची लांबी सु. १२ सेंमी. असून वजन सु. ६० ग्रॅ. इतके असते. बंदिवासातील त्याचे आयुर्मान सु. १८ वर्षे नोंदवण्यात आले आहे. ते किडे खाऊन उपजीविका करतात.

बेर्ट्‌स माऊस लेमूर (मायक्रोसेबस बेर्ट्‌स) : ही लेमूरची सर्वांत लहान जाती असून त्याची लांबी सु. ९.२ सेंमी. इतकी असते आणि वजन सु. ३० ग्रॅ. पर्यंत असते. वन्य स्थितीत ते सु. ६ ते ८ वर्षे जगतात.