ओट ही गव्हासारखे धान्य देणारी एक वनस्पती आहे. ही वर्षायू वनस्पती ओषधी आहे. ती पोएसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव अॅव्हेना सटायव्हा असे आहे. ओट हे प्रामुख्याने थंड प्रदेशात येणारे पीक असून रशिया हा प्रमुख उत्पादक देश आहे. अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा, पोलंड, जर्मनी आणि ऑस्ट्रेलिया या देशांत मोठ्या प्रमाणावर ओटचे पीक घेतले जाते. भारतात आणलेल्या या तृणधान्याची लागवड काही प्रमाणात उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, बिहार व ओरिसा या राज्यांत करतात. महाराष्ट्रात पुणे, सातारा व अहमदनगर या जिल्ह्यांत ओटची लागवड अल्प प्रमाणात केली जाते.
साधारण ०.६ ते १.५ मी. उंचीच्या या तृणधान्याची पाने लांब, सपाट व अरुंद असतात. खोड पोकळ असते. फुले स्तबकांत येतात. तृणफलावर आतील तुषांचे वेष्टन असते आणि या तुषांवरचे कुसळ सरळ व नाजूक असते. ओटच्या बियांत प्रथिने ८ ते १४ %, कर्बोदके ६३ ते ६५ %, मेद २ ते ३% आणि क्षार २ ते ३% असतात. ओट या तृणधान्यात अॅव्हेनार्लिन नावाचे प्रथिन जास्त प्रमाणात असते. ग्लोब्युलीन प्रकारचे हे प्रथिन पाण्यात सहज विरघळते.
दाण्यात तंतुमय भाग जास्त प्रमाणात असतो. दाण्याचा भरडा शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या इ. जनावरांना खायला घालतात. याचा परिणाम त्यांच्या मांसोत्पादनावर व मांसाच्या प्रतीवर चांगला होतो. चविष्ट व पौष्टिक हिरवा चारा घोडा व दुभत्या जनावरांसाठी उपयुक्त असतो. दाण्यांपासून तयार केलेले पोहे, तसेच पिठापासून बनविलेली भाकरी यांचा समावेश माणसे आहारात करतात. दाण्यांची दुधातील खीर पौष्टिक असते. तुषांपासून रेझीन, रासायनिक द्रव्ये व जंतुनाशक द्रव्ये बनवितात. बी रेचक, उत्तेजक व मज्जातंतूस पोषक असते. ओटच्या कोंड्याच्या सेवनाने रक्तातील निम्न घनता लिपोप्रथिनांचे (एलडीएल्) व कोलेस्टेरॉलांचे प्रमाण कमी होते. यामुळे हृदयविकारावर ओट गुणकारी ठरू शकते.
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.