(सीर फिश/स्पॅनिश मॅकरेल). सुरमई माशाचा समावेश अस्थिमत्स्य वर्गाच्या स्काँबेरोमोरिडी कुलात केला जातो. या कुलातील स्काँबेरोमोरस प्रजातीच्या स्काँबेरोमोरस कॉमरसनस्काँबेरोमोरस गटॅटस अशी शास्त्रीय नावे असलेल्या दोन जातींतील माशांना सामान्यपणे ‘सुरमई’ म्हणतात. आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, म्यानमार, मलेशिया, फिजी, फिलिपीन्स, तैवान, जपान, श्रीलंका व भारत या देशांमध्ये सुरमई आढळून येतात. भारताच्या सर्व समुद्रात हे मासे आढळतात. भारतात पूर्व किनाऱ्यावरील आंध्र प्रदेश, तमिळनाडू तसेच पश्चिम किनाऱ्यावरील केरळ, महाराष्ट्र या राज्यांमध्ये हे मासे अधिक पकडले जातात. स्काँ. कॉमरसन या जातीची लांबी सु. १२० सेंमी. असून वजन सु. ७० किग्रॅ. असू शकते. स्काँ. गटॅटस या जातीची लांबी सु. ५५ सेंमी. पर्यंत असून वजन सु. २७ किग्रॅ. असते.

सुरमई (स्काँबेरोमोरस कॉमरसन)

सुरमईचा आकार लांबट व दोन्ही बाजूंना निमुळता असून शरीर खवलेविरहीत असल्याने पृष्ठभाग गुळगुळीत असतो. पाठीचा रंग रुपेरी निळा, तर उदराचा रंग रुपेरी अथवा पांढरा असतो. शरीराचे डोके, धड व शेपटी असे तीन भाग असतात. मुख लहान असून दोन्ही जबड्यांवर दात असतात. धडावर लांबट ठिपक्यांच्या तीन ओळी असतात. सुरमईला दोन पृष्ठपर, दोन वक्षपर, दोन गुदपर असून पुच्छपर दुभंगलेला असतो. बांगड्याप्रमाणे धडावर वरच्या व खालच्या बाजूस छोटे पर असतात.

सुरमई मासे थव्याने वावरतात. एका थव्यात हजारोंच्या संख्येने हे मासे असतात. हे थवे किनाऱ्याजवळ उथळ पाण्यात किंवा खाड्यांमध्ये देखील आढळून येतात. सुरमई वेगाने पोहतात. ते मांसभक्षी असून त्यांच्या आहारात थव्याने राहणाऱ्या लहान माशांचा समावेश असतो. भक्ष्य हेरून त्याचा पाठलाग करून ते तारळी, ढोमा, सौंदाळे इत्यादी मासे खातात. धोक्याची जाणीव झाल्यास मोठ्या माशांवरही हल्ला करतात. सुरमईत नर व मादी हा लिंगभेद बाह्यत: ओळखून येत नाही. सामान्यपणे मादी नरापेक्षा मोठी असते. शरीराची लांबी ४० सेंमी. झाल्यानंतर ते प्रजननक्षम बनतात. प्रजननकाळ मे ते ऑगस्ट असतो. या काळात मादी दोन वेळा अंडी घालते. भारतात आढळणाऱ्या लोकप्रिय अस्थिमत्स्यात सुरमईचा क्रमांक बराच वरचा आहे. या माशाला भरपूर मागणी असते. सुरमईचे मांस पांढरे शुभ्र, लुसलुसीत व चविष्ट असते आणि ते ताजे खाल्ले जाते. अधिकचे मासे खारविले जातात किंवा बर्फात गोठविले जातात. गळ लावून या माशांची पारध करता येते. अनेक जण छंद म्हणून त्यांना गळ लावून पकडतात. सुरमई उत्तम क्रीडामत्स्य मानले जातात.