गूजबेरी हे एका फळाचे आणि वनस्पतीचे इंग्रजी नाव आहे. राइब्स (कुल-सॅक्सिफ्रागेसी) या वंशातील सु. सहा जातींतील फुलझाडांच्या (आवृत्तबीज, द्विदलिकित) सर्व वनस्पती या नावाने ओळखल्या जातात. या वनस्पतीचे मूलस्थान उत्तर अमेरिकेच्या पश्चिम भागात आहे. या सर्व पानझडी किंवा सदापर्णी आणि काटेरी किंवा बिनकाटेरी क्षुपे (झुडपे) असून त्यांचा प्रसार उत्तर गोलार्धात विशेषेकरून आहे. पाने साधी,एकाआड एक, बहुधा हस्ताकृती खंडित, तर कधी मंडलित असतात. फुले लहान,द्विलिंगी,क्वचित एकलिंगी व भिन्न झाडांवर, पंचभागी, क्वचित चतुर्भागी, हिरवट पांढरी लाल,शेंदरी किंवा पिवळी असून एकएकटी किंवा कमी जास्त संख्येने मंजरीवर येतात.मृदुफळे काळी,जांभळी,शेंदरी,गूजबेरी, पिवळट किंवा हिरवट व आकर्षक आणि बहुधा खाद्य (उदा.,यूरोपीय गूजबेरी-राइब्स ग्रॉस्युलॅरिया व ब्लॅक करांट-राइब्स नायग्रम )असतात.फळे आंबटगोड व अनेक बियांनी युक्त असतात.अनेक संकरज प्रकार लागवडीत आले आहेत.फळांचे मुरंबे,जेली,वडे वगैरे खाद्य पदार्थ करतात.पश्चिम हिमालयात कुमाऊँ ते काश्मीरपर्यंत यूरोपीय गूजबेरी आढळते.

महाबळेश्वर, पाचगणी व निलगिरी, कुन्नूर भागांत मध्यम प्रकारच्या जमिनीत गूजबेरीची लागवड करतात. रोपे लावून अगर दाब कलमे किंवा छाट कलमे लावून लागवड करतात.पश्चिम महाराष्ट्रात जूनमध्ये व उत्तर भारतात मेपासून जुलैपर्यंत बी पेरतात आणि २०–२५ सेंमी. उंचीची रोपे ६० सेंमी. हमचौरस अंतरावर लावतात. लागणीपूर्वी हेक्टरी अडीच टन शेणखत जमिनीला देतात. याखेरीज हेक्टरी ४० किग्रॅ. अमोनियम सल्फेट वरखत म्हणून सप्टेंबरमध्ये देतात. जमिनीच्या मगदुराप्रमाणे आठ ते पंधरा दिवसांनी पाणी देतात. महाराष्ट्रात लागणीपासून पाचसहा महिन्यांनी फळे लागतात. ती डिसेंबरपासून तयार होऊ लागतात.एका हेक्टरमधून डिसेंबर ते मार्चपर्यंत ५,००० ते १०,००० किग्रॅ. फळे मिळतात.
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.