पारोसा पिंपळ ही माल्व्हेसी कुलातील वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव थेस्पेशिया पॉपुल्निया आहे. ही वनस्पती आणि जास्वंद एकाच कुलातील आहेत. तिला भेंडीचे झाड असेही म्हणतात. पारोसा पिंपळ हा वृक्ष मूळचा भारतातील असावा, असे मानतात. जगातील सर्व समुद्रकिनाऱ्यांलगतच्या प्रदेशांत तो दिसून येतो. विशेष म्हणजे तो कोणत्याही मातीत वाढू शकतो. शोभिवंत असल्यामुळे त्याची लागवड उद्यानात तसेच रस्त्याच्या कडेने केली जाते.
पारोसा पिंपळ या सदाहरित वृक्षाची उंची सु. २० मी.पर्यंत असून खोड सु. ७५ सेंमी. रुंद असते. खोडाची साल गडद तपकिरी रंगाची असून जुनी साल भेगाळलेली दिसते. पाने साधी, एकाआड एक, हृदयाकृती व पिंपळाच्या पानांएवढी पण कमी लांबीचे टोक असणारी असतात. फुले मुख्यत: हिवाळ्यात येत असली, तरी वर्षभरसुद्धा येत राहतात. ती मोठी, ७-८ सेंमी. व्यासाची व गडद पिवळी असून एकेकटी किंवा जोडीने येतात. फुलांच्या मध्यभागी पाकळ्यांच्या तळाशी विटकरी लाल रंगाचा डाग असतो आणि तो कालांतराने जांभळा होतो. फुलांनी बहरलेला वृक्ष आकर्षक दिसतो. बोंड प्रकाराची फळे ३–५ सेंमी. व्यासाची व सफरचंदाच्या आकाराची असतात. वाळल्यावर ती गडद तपकिरी किंवा काळी होतात. फळात पाच कप्पे असून प्रत्येक कप्प्यात दोन बिया असतात.
पारोसा पिंपळ खोडाचे लाकूड कठीण आणि टिकाऊ असते. ते पाण्याने खराब होत नाही. याच्या लाकडाचा उपयोग बांधकाम, फर्निचर, बैलगाडीची चाके, पडाव, होड्या, खोकी, शेतीची अवजारे इत्यादींसाठी करतात. सालीतील धागे बळकट असून त्यापासून दोर काढतात व त्याच्या पिशव्या विणतात. साल स्तंभक असून अतिसारावर उपयुक्त आहे. पाला जनावरांना चारा म्हणून वापरतात. फळांपासून पिवळे रंगद्रव्य मिळते.