ग्रीज हे अर्धघन रूपातील वंगण होय. स्थिर यंत्रसामग्री आणि फिरत्या यंत्रभागाचे गंजण्यापासून रक्षण व्हावे, यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे ग्रीज वापरावे लागते. चाकांचे बेअरिंग व साट्यासाठी (chasis) घन वंगणे उपयुक्त ठरतात.

ग्रीज घटकद्रव्ये

मूलत: ग्रीज हे मूलभूत तेले (base oils) आणि विविध  धातूंच्या संयुगांपासून तयार केलेल्या साबणाच्या एकजिनसी मिश्रणातून तयार केले जाते. ग्रीज हे प्राथमिक स्वरूपातील वंगण तेले (petroleum based oils) आणि विविध धातूंचे साबण यांचे एकजिनसी मिश्रण असते. खनिज तेलाचे शुध्दिकरण होत असताना निर्वात वातावरणात ऊर्ध्वपातन करून मिळविलेला तेलाचा अंश म्हणजे मूलभूत तेले होत. त्यांचे विशुध्दतेनुसार वेगवेगळे वर्ग पडतात. औद्योगिक क्षेत्रामध्ये निरनिराळ्या ठिकाणी होणारा ग्रीजचा वापर हा त्या ग्रीजमध्ये असलेल्या साबणाचे स्वरूप, त्यातील धातू व अल्कलीच्या प्रमाणावर अवलंबून असतो. हे साबण कॅल्शियम, सोडियम, लिथियम, बेरियम, ॲल्युमिनियम, टिटॅनियम या धातूंचे बनलेले असतात.

 

गुणधर्म : ग्रीजचे प्रामुख्याने दोन गुणधर्म तपासावे लागतात : (१) ज्या तापमानाला तेल आणि साबण वेगळे होऊन तेलाचा थेंब बाहेर पडतो, ते तापमान त्या ग्रीजचा गलन बिंदू (drop point) असतो. हा गलन बिंदू जितका जास्त तितका त्याचा यंत्रभागात उच्च तापमानाला वापर करता येतो. साबण आणि तेल वेगळे झाले की, ग्रीज निष्क्रिय बनते आणि त्याची वंगणक्षमता संपुष्टात येते. (२) त्याचप्रमाणे ग्रीजचा भेदन बिंदू (penetration point) तपासून त्याची दृढता तपासली जाते. ग्रीज मऊ आहे की कठीण याचा पडताळा या कसोटीतून होतो.

यांपैकी कॅल्शियमपासून तयार झालेल्या ग्रिजचा गलन बिंदू कमी असल्याने कमी तापमानाच्या पर्यावरणात त्याचा वापर होतो. सोडियम, लिथियम, बेरियम, ॲल्युमिनियम, टिटॅनियम यांच्या साबणांनीयुक्त ग्रिजे तुलनात्मकदृष्ट्या उच्च तापमानाच्या यंत्रसामग्रीत वापरली जातात. साधारणपणे हे गलन बिंदू खालीलप्रमाणे असतात:

साबणाचा प्रकार गलन बिंदू ( से.)
कॅल्शियम /जलमुक्त ९०/१५०
लिथियम /जटिल संयुगे (complex) १७५-२०५/२६०+
ॲल्युमिनियम/ जटिल संयुगे ११०/२६०+
सिलिकॉन २००
सोडियम १६५-१८०
पॉलियूरिया २४०
कार्बनी मृदा (organoclay) २६०+

विविध धातूंचे साबण : मेदाम्लांच्या क्षारांना साबण म्हणतात. विविध प्रकारच्या धातूंच्या व मेदाम्लांच्या संयोगाने निर्मिती केलेल्या साबणाचा वापर निरनिराळ्या प्रकारच्या स्वच्छतेसाठी केला जातो तसेच तो ग्रीज वंगणात देखील वापरला जातो. साबणाचे सूत्र साधारणत: (RCO2)n  Mn+ असे असते. यात R हा अल्कलीचा अंश असतो तर M हा धातू असतो. विविध प्रकारच्या धातूपासून साबण तयार केले जातात व ते निरनिराळ्या हेतूसाठी वापरतात. वनस्पतिज तेलापासून मिळणारी मेदाम्ले आणि धातूंची ऑक्साइडे यांच्या संयोगातून साबणनिर्मिती होते. विविध प्रकारच्या ग्रीजसाठी सोडियम, कॅल्शियम, ॲल्युमिनियम, लिथियम या धातूंचे साबण वापरतात.

ग्रीज घनकारक तुलनात्मक विश्लेषण

घनकारक : अर्थात काही ग्रीजमध्ये साबणाऐवजी घनकारक (thickener) म्हणून बेल्टोनची माती,  सिलिका, पॉलियूरिया वापरतात. हे घनकारक पदार्थ ग्रिजला घनत्व मिळवून देतात. सिलिकॉन या अधातू मूलद्रव्याच्या संयुगापासून तयार केलेले ग्रीज उच्च तापमान व दाबापुढे टिकाव धरू शकते. पॉलिडायमिथिलसिलोक्सेन (PDMS) या वाळूच्या संयुगामध्ये घनकारक म्हणून अस्फटिकी सिलिका मिसळून हे जाडसर ग्रीज तयार होते.  काचेची उपकरणे हवाबंद करण्यासाठी हे ग्रीज सर्रासपणे वापरले जाते. अन्ननिर्मिती करणाऱ्या प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या यंत्रणेत वापरल्या जाणाऱ्या सिलिकॉन ग्रीजमध्ये कॅल्शियम स्टिअरेट हे घनकारक वापरतात, तर उच्च तापमानासाठी वापरल्या जाणाऱ्या ग्रीजमध्ये पॉलिटेट्राफ्लुओरोएथिलीन (PTFE) हे घनकारक असते.

ग्रीजची उपयुक्तता :

  • घर्षणापासून यंत्रपृष्ठभागाची नुकसान रोखणे.
  • सतत यंत्रभागाच्या सान्निध्यात राहून गंजण्यापासून त्यांचे रक्षण करणे.
  • कचरा, पाणी, धूळ या बाह्यपदार्थांपासून यंत्राचे रक्षण करणे.
  • वंगणाची गळती होऊ न देणे व ते द्रवरूप वंगणासारखे फेकले जाणार नाही याची काळजी घेणे.
  • तापमानाच्या विस्तृत कक्षेत कार्यरत राहणे.
  • यंत्राच्या फिरणाऱ्या भागांना अडथळा पोहचू न देणे.
  • बेअरिंग व झिरपरोधक (seals) घटक पदार्थांशी अनुरूप राहणे.

 

संदर्भ :

समीक्षक – राजीव चिटणीस