सुधांशु : (६ एप्रिल १९१७– सप्टेंबर २००६). मराठी कवी आणि कथाकार. मूळ नाव हणमंत नरहर जोशी. जन्म औदुंबर (जि. सांगली) येथे. शिक्षण एस्.एस्.सी. पर्यंत. खडकातले झरे (१९५१) हा त्यांचा एकमेव कथासंग्रह आणि काही बालकथा, संतचरित्रे सोडता त्यांनी गद्यलेखन केले नाही. कवी म्हणूनच ते प्रसिद्घी पावले. भावगीते आणि भक्तिगीते त्यांनी लिहिली. भक्तिगीते ही त्यांनी मुख्यतः दत्तोपासनेसाठी लिहिली आहेत. दत्तगीते (१९५८), गीत दत्तात्रेय (१९६५), दत्तगुरुंची गाणी सुंदर (१९७९) हे त्यांच्या दत्तगीतांचे संग्रह होत. साधा पण रसाळ आविष्कार हे त्यांच्या दत्तगीतांचे वैशिष्ट्य होय. प्रथितयश गायकांनी गायिलेल्या त्यांच्या दत्तगीतांच्या ध्वनिमुद्रिकांना श्रोत्यांचा मोठा प्रतिसाद लाभला. भरली चंद्रभागा (१९६६) हा त्यांचा अभंगसंग्रहही उल्लेखनीय आहे. त्यांच्या अन्य गीतसंग्रहांत कौमुदी (१९४०), गीतसुगंध (१९६०), गीतसुवर्ण (१९६१), गीतसुधा (१९६३), गीतसुषमा (१९६४), कालिंदीकाठी (१९६५ गौळणीसंग्रह) ह्यांचा समावेश होतो.सदानंद साहित्य मंडळातर्फे औदुंबर येथे त्यांनी साहित्यसंमेलने भरवली. १९७४ मध्ये ‘ पद्मश्री ‘ हा किताब देऊन भारत सरकारने त्यांना गौरविले, तसेच वाराणसी विद्यापीठाने त्यांना ‘ डी. लिट्.’ ही सन्मान्य पदवीही दिली.

औदुंबर येथेच ते निधन पावले.


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.