सामराज : (सु. १६१३–सु. १७००). मराठी आख्यानकवी. श्याम गुसाई, शामभट आर्वीकर, शामराज या नावांनीही याचा उल्लेख आढळतो. ह्याच्या काळाविषयी वेगवेगळी मते आढळतात. महाराष्ट्र सारस्वतकार वि. ल. भावे ह्यांच्या मते हा शाहूकालीन होता, तर प्रा. द. सी. पंगु ह्यांच्या मते तो शिवकालीन होता. याच्या आईचे नाव काशी व वडिलांचे नाव लक्ष्मण होते. ह्याचे घराणे ऋग्वेदी आश्वलायनसूत्री, गोत्र शाकल्य. तुळजापूरची भवानी, जेजुरीचा मल्हारी आणि आर्वीचा मुद्गलेश्वर ही ह्याच्या घराण्याची कुलदैवते होत. सामराजाच्या घराण्याकडे छ. शिवाजी महाराजांच्या भोसले घराण्याचे पुरोहितपद होते. मुद्गलाचार्य गोसावी ह्यांच्यापासून ह्या वंशपरंपरेतील तेरावे पुरुष लक्ष्मणभट हे होत. याला दोन पत्न्या होत्या. त्यांपैकी धाकटीचा मुलगा शामभट म्हणजेच सामराज होय. दुसरीचा मुलगा मल्हारभट हा ज्येष्ठ असून तो छ. शिवाजी महाराजांच्या दरबारात न्यायाधीश पंडितराव म्हणून नेमला होता. ह्या मल्हारभटापासूनच सातारच्या पंडितराव शाखेचा आरंभ होतो. सामराज हा कोल्हापूरच्या राजोपाध्ये घराण्याचा मूळ पुरुष होय. छ. राजारामांबरोबर हा कवी पन्हाळ्यास होता, म्हणून त्यास पन्हाळकर असेही म्हणतात. पुढे तो छ. राजारामांबरोबर सिंहगडावर गेला व तेथेच मृत्यू पावला.
सामराजाचे गंथ दोन : (१) मुद्गलाख्यान (श्लोकसंख्या २६१) आणि (२) रुक्मिणीहरण (आठ सर्ग श्लोकसंख्या १,१४०). अंगिरस गोत्रातील वेदपारंगत मुनी, मुद्गल ह्यांची कथा मुद्गलाख्यानात आली आहे. मुद्गलमुनींची दानशीलता आणि त्यांचे तपःसामर्थ्य ह्यांमुळे भयभीत झालेले इंद्रादी देव यमराजांना मुद्गलमुनींची सत्त्वपरीक्षा घेण्यासाठी पाठवितात. दुष्काळामुळे अन्न दुर्मिळ झालेले असताना यमराज अतिथी म्हणून मुद्गल कुटुंबात येतात पण त्यांच्या सत्त्वपरीक्षेत हे कुटुंब यशस्वी होते, ही ह्या आख्यानकाव्याची कथा. त्यातील उत्कृष्ट भक्तिभाव लक्षणीय आहे. रुक्मिणीहरण हे काव्य रचताना संस्कृतातील विदग्ध महाकाव्यांचा आदर्श सामराजाने समोर ठेवलेला आहे. यातील कथाभाग भागवताच्या दशम स्कंधातील (अध्याय ५२-५३) असून त्याचा आधार घेऊन रघुवंश, कुमारसंभव, शिशुपालवध व नैषधीयचरित या महाकाव्यांचा सजावटीसाठी त्याने उपयोग केला आहे. शिवाय पुराणे, भगवद्गीता, बाणभट्टाची कादंबरी, भवभूतीचे उत्तररामचरित, कालिदासाचे अभिज्ञानशाकुंतल व मेघदूत आदींचाही भरपूर उपयोग करुन घेतला आहे. यामुळे काही विद्वान या काव्यास ‘अभिजात संस्कृत वाङ्मयाचे मूर्तिमंत प्रत्युज्जीवन’ मानतात. संस्कृत साहित्याबरोबरच एकनाथ, रामदास, तुकाराम यांच्या काव्यांतील शब्दसंपत्तीचाही सामराजाने भरपूर वापर केला आहे. भक्ती व शृंगार हे रस ह्या काव्यातले प्रमुख असून ते कवीने समर्थपणे आविष्कृत केले आहेत. विविध काव्यालंकारांनी त्याची शैली नटली आहे तथापि स्वभावोक्ती हा त्याच्या विशेष आवडीचा अलंकार असल्याचे दिसून येते. रुक्मिणीहरण हे तंत्रदृष्ट्या महाकाव्य आहे. त्यात सामराजाने स्वतःच्या प्रतिभेने घातलेली भर यामुळे या महाकाव्याचे स्थान आख्यानकवितेत बरेच वरचे ठरते.