सामंत, बाळ गंगाधर : (२७ मे १९२४–२० जानेवारी २००९). मराठी लेखक, विनोदकार व चरित्रकार. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथे एका सुसंस्कृत मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. मुंबईच्या रुईया महाविद्यालयातून ते बी.ए. झाले. मराठी व संस्कृत हे विषय घेऊन मुंबई विद्यापीठाची एम्.ए. ची पदवी त्यांनी संपादन केली. सुरुवातीस काही काळ वृत्तपत्रीय क्षेत्रात त्यांनी काम केले. १९४९ पासून शासकीय प्रसिद्घी खात्यामध्ये मुख्यमंत्र्यांचे संपर्क अधिकारी, संशोधन अधिकारी वगैरे निरनिराळ्या पदांवर त्यांनी काम केले. महाराष्ट्र राज्य फिल्म ॲण्ड स्टेजचे ते संचालक होते.
पुढे १९६५ मध्ये शासकीय नोकरी सोडून ते रिलायन्स इंडस्ट्री त सल्लगारपदी रुजू झाले. या काळात अनेक शासकीय व सार्वजनिक क्षेत्रांतील – विशेषतः राजकारणातील – व्यक्तींशी त्यांचा संबंध आला.सुरुवातीस सोबत, नवशक्ती, लोकसत्ता यांसारख्या वृत्तपत्रांतून त्यांनी स्तंभलेखन केले. शासकीय सेवेत असतानाच त्यांच्या साहित्यिक कारकीर्दीस सुरुवात झाली. त्यांची ग्रंथसंपदा विपुल आहे. युवराज (१९५६) हे त्यांचे पहिले नाटक. त्यानंतर पुढे त्यांनी मुख्यतः विनोदी लेखन केले. त्यांचे मस्करी (१९६१), गोंधळ (१९६१), खिरापत (१९६४), नवराबायको (१९६५), करामत (१९७४), खुषमस्करी (१९७९), बाळबोध, बाळकीडा, बाळलीला, तारांबळ इ. विनोदी लेख-कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. आपल्या विनोदी लेखनातून शासकीय पातळीवरील भ्रष्टाचार, दिरंगाई व बेपर्वाई यांमधून घडणाऱ्या गमतीजमतींचा समाचार त्यांनी घेतला आहे.
विनोदी लेखनाबरोबरच चिंतनशील व संशोधनात्मक लेखनही त्यांनी केले. प्रसिद्घ इंग्रज साहित्यिक रिचर्ड बर्टन यांच्यावरील शापित यक्ष (१९८२) व मराठी रंगभूमीवरील प्रख्यात गायकनट बालगंधर्व यांच्यावरील तो राजहंस एक (१९८८) हे त्यांचे उल्लेखनीय चरित्रग्रंथ. बालगंधर्व यांच्याबद्दल महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांना विशेष आदर होता. मृत्यू व प्रेम ह्या विषयांवरही त्यांनी लेखन केले. मरणात खरोखर जग जगते (१९९३) हा त्यांचा मृत्यू या संकल्पनेचा वेध घेणारा काहीसा तत्त्वचिंतनपर ग्रंथ. त्यामध्ये त्यांनी मृत्यू म्हणजे काय, अतींद्रिय अनुभव, स्वेच्छामरण, पुनर्जन्म इ. गूढ विषयांचा परामर्श घेतला आहे. प्रेमगंथ (१९९६) या संशोधनपर ग्रंथामध्ये वन्यप्राणी, आदिवासी आणि सुसंस्कृत मानव या स्तरांवर स्त्री-पुरुषांचे परस्परसंबंध, त्यांचे वैयक्तिक आणि सामूहिक जीवन यांमध्ये गेल्या दोन हजार वर्षांमध्ये कसे बदल होत गेले, याचा शोध घेतला आहे.
याशिवाय सावळा गोंधळ (१९८२ व १९८६), हास्यकल्लेळ (१९८५), पुनर्जन्म (१९८७), हिटलर : एक महान शोकांतिका (१९९५), आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार (१९९५), शूरा मी वंदिले (१९९६), इ. गंथ तसेच हितगुज (१९६५), मुलुखावेगळी माणसे (१९८२), मर्मबंधातील ठेव ही (१९८६), महापर्व (१९८६), मराठी नाटय्संगीत (१९८८), निवडक अत्रे (१९८९) इ. त्यांचे संपादित गंथ उल्लेखनीय आहेत. त्यांनी मैफल (२००१), गजराज (२००२), मानवतेचे मारेकरी (२००२), एक होती मुंबई (२००४) वगैरे अन्य काही ग्रंथ सिद्घ केले. शब्दश्री या मासिकाचे त्यांनी दोन वर्षे संपादन केले.
साहित्याबरोबरच संगीताचीही सामंतांना आवड होती. एखाद्या विषयावर संशोधन करुन त्यातून त्या विषयाची सखोल माहिती वाचकांपर्यंत पोहोचविण्याची हातोटी त्यांना लाभली होती. त्यांना अनेक मानसन्मान मिळाले. वेगवेगळ्या शिष्टमंडळांचे सदस्य या नात्याने त्यांनी जर्मनी (१९६८), अमेरिका आणि मॉरिशस (१९८०) या देशांना भेटी दिल्या. १९७० मध्ये खार (मुंबई) येथील उपनगर साहित्यसंमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते. १९९३ मध्ये मुंबई येथे भरलेल्या त्र्याहत्तराव्या नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, महाराष्ट्र राज्य चित्रपट तसेच नाट्यविकास महामंडळ आदी शासकीय मंडळांचे ते काही काळ सदस्य होते. पद्मश्री हा किताब त्यांना लाभला (२००४). त्यांच्या शापित यक्ष या ग्रंथास १९८३-८४ या वर्षातील मराठीतील सर्वोत्कृष्ट चरित्रग्रंथ म्हणून मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयातर्फे वि. ह. कुलकर्णी पारितोषिक मिळाले.
मुंबई येथे त्यांचे निधन झाले.