श्रीपतिभट्ट : (सु. अकरावे शतक). महाराष्ट्रातील एक थोर व्यासंगी ज्योतिषज्ञ. त्यांच्या जीवनाविषयी विश्वसनीय माहिती उपलब्ध नाही; तथापि त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांतर्गत उल्लेखांवरून त्यांच्याविषयी तसेच त्यांच्या ग्रंथांविषयी काही माहिती ज्ञात होते. त्यांचा जन्म सुसंस्कृत काश्यपगोत्री ब्राह्मण कुटुंबात झाला. श्रीपतिभट्ट हे बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील रोहिणखेड या गावचे रहिवासी होत. तिथेच त्यांनी संस्कृत वाङ्‌मयाचा अभ्यास-अध्ययन केले. त्यांच्या आजोबांचे नाव केशव आणि वडिलांचे नाव नागदेव होते. जैन वाङ्‌मयविदयापंडित नथुराम प्रेमी यांच्यामते श्रीपतिभट्ट हे माहाराष्ट्री अपभ्रंश (जैन अपभ्रंश) भाषेतील प्रसिद्ध कवी व महापुराण या काव्यग्रंथाचे लेखक पुष्पदंत यांचे पुतणे असावेत कारण पुष्पदंत हेही रोहिणखेडचेच रहिवासी होत.

ज्योतिषरत्नमाला ग्रंथाचे हस्तलिखित

आर्यभट्ट, लल्ल, वराहमिहिर, मुंजाल, भट्टोत्पल, बह्मगुप्त वगैरे प्राचीन व प्रसिद्ध ज्योतिर्गणितज्ज्ञांच्या पंक्तीतील एक श्रेष्ठ ज्योतिषज्ञ म्हणून श्रीपतिभट्टांची गणना करण्यात येते. त्यांनी धीकोटिकरण ( इ. स. १०३९), सिद्धान्तशेखर, जातकपद्धती, पाटीगणित, श्रीपति-निबंध, ध्रुव-मानसकरण, दैवज्ञवल्ल्भ, ज्योतिषरत्नमाला, गणित-तिलक, श्रीपतिसमुच्च्य, रत्नसार इ. ज्योतिषविदयाविषयक ग्रंथ लिहिले. त्यांपैकी जातकपद्धती हा ग्रंथ श्रीपतिपद्धती या नावाने आणि ज्योतिषरत्नमाला हा श्रीपतिरत्नमाला या नावाने उल्लेखिलेला आढळतो.

या ग्रंथांपैकी ज्योतिषरत्नमाला हा मुख्यत्वे मुहूर्तग्रंथ असून त्यात ६०५ संस्कृत श्लोक आणि ४७६ मराठी परिच्छेद आहेत. त्याची एकूण २१ प्रकरणांत विभागणी केलेली आहे. या मुहूर्तग्रंथात सामान्यत: तिथी, वार, नक्षत्रे, योग, संक्रांती इत्यादींचे शुभाशुभ योग वर्णिलेले आहेत. वास्तुरचना, गृहप्रवेश, विवाह, मौंजीबंधन इ. प्रसंगी सामान्य माणसास हरघडी मुहूर्त पाहण्याची गरज भासते, हे ओळखून मराठी भाषिक लोकांसाठी त्यांनी हा महत्त्वाचा ग्रंथ सिद्ध केला. याशिवाय यात गर्भाधानादी संस्कारांचा व त्यांच्या मुहूर्तांचा संदर्भ येतो. त्यात विवाहात वधूवरांचे घटित हे एक मोठे प्रकरण आहे. त्याशिवाय वास्तू , यात्रा ( गमन ), राज्याभिषेक व दुसरी काही किरकोळ प्रकरणे आहेत. ह्या ग्रंथावर संस्कृत भाषेमध्ये महादेव, वैदयनाथ, रघुनाथ, माधव, परमकारण, पंडित वैदय, कृष्ण दैवज्ञ, उमापती इ. आठ जणांनी व स्वत: श्रीपतिभट्टांनी मराठीत अशा एकूण नऊ टीका लिहिल्या असून त्या प्रसिद्ध झाल्या आहेत. श्रीपतींची मराठी गदयटीका असून, ती त्यांनी इ. स. १०५० मध्ये लिहिली. हा प्राचीनातील प्राचीन मराठी गदय टीकाग्रंथ असावा, असे भाषातज्ज्ञ मानतात. या ग्रंथापासून मुहूर्त हा ज्योतिषशास्त्रात एक स्वतंत्र स्कंध मानला गेला.

ज्योतिषरत्नमाला ह्या ग्रंथावरील मराठी टीकेची आरंभीची फक्त ७४ पृष्ठे प्रथम वि. का. राजवाडे यांना नेवासे येथे जोश्यांच्या पोथ्यांत सापडली. ती त्यांनी भारत इतिहास संशोधक मंडळाच्या व्दितीय संमेलन-वृत्तांतात प्रसिद्ध केली (१९१४). ही पोथी शके १३६९ मध्ये नकललेली होती. यानंतर संपूर्ण ज्योतिषरत्नमाले ची नकलून काढलेली (हस्तलिखित) पोथी परभणी येथील परतुडकर नामक सद्‌गृहस्थांकडे सापडली. ती इ. स. १७२१ मधील असून, पुण्यातील डेक्कन कॉलेज पोस्टग्रॅज्युएट अँड रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये ठेवली आहे व प्रसिद्धही झाली आहे. या गंथासाठी श्रीपतिभट्ट यांनी लल्ल या ज्योतिर्विदांचा रत्नकोश हा ग्रंथ प्रामुख्याने संदर्भ म्हणून आधारभूत धरला आहे आणि ह्या इ. स. ६३८ मधील प्राचीन ग्रंथाचा पदोपदी उल्लेखही तथाच रत्नकोशे किंवा रत्नकोशात असा केला आहे.

श्रीपतिभट्टांनी लिहिलेल्या पाटीगणित या ग्रंथावरही सिंहतिलक नावाच्या एका जैन आचार्यांनी विव्दत्ताप्रचुर टीका लिहिली आहे. त्यांच्या उर्वरित गंथांतून ज्योतिषशास्त्रातील एकेका स्वतंत्र अंगावर विवेचन आढळते. तसेच ज्योतिषाच्या प्रत्येक शाखेवर त्यांनी एकेक ग्रंथ रचला आहे. फल-ज्योतिषाबरोबरच श्रीपतिभट्ट हे ग्रहवेधाचेही चांगले जाणकार असल्याचे त्यांच्या विविध ग्रंथांतील तद्विषयीच्या उल्लेखांवरून जाणवते.

संदर्भ :

  • Hariyappa, H. L. Patkar, M. M. Ed. Gode, P. K. Commemoration Volume, Poona, 1960.
  • पानसे, मु. ग. यादवकालीन महाराष्ट्न, पुणे, १९६३.३. प्रसाद, गोरख, भारतीय ज्योतिष का इतिहास, १९५६.

Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.