पॅरिस येथील ग्रॅंड कॅफेमध्ये २८ डिसेंबर १८९५ रोजी चार्ज ऑफ द ड्रॅगन्स या चित्रपटाचा पहिला खेळ ल्यूम्येअर बंधूंनी सिनेमॅटोग्राफ (सिनेमतोग्राफ) या आपल्या उपकरणाद्वारे सादर केला. हा दिवस  सिनेमाचा जन्मदिवस म्हणून गणला जातो. परंतु हालती चित्रे सादर करण्याचे  काही प्रयत्न त्यापूर्वीही  झाले होते. एकोणिसाव्या शतकातील सुमारे सात दशकांच्या कालखंडाला ‘सिनेमापूर्व कालखंड’ म्हटले जाते.

ब्रिटिश वैज्ञानिक पीटर मार्क रॉझे याने दृष्टिसातत्याचा सिद्धांत मांडला (१८२२).  त्यानंतर त्या तत्त्वाचा उपयोग करणाऱ्या अनेक खेळणीवजा वस्तू बाजारात आल्या. हालत्या प्रतिमा पाहण्याची भूक त्यामुळे अंशतः पूर्ण होऊ लागली. प्रतिमांची निर्मिती  करण्यासाठी यंत्र वापरण्याची कल्पना यूरोपात ⇨ प्रबोधनकालात (Renaissance) अस्तित्वात आली. ⇨ योहानस केप्लर या जर्मन वैज्ञानिकाने या उपकरणास उद्देशून ‘कॅमेरा ऑब्स्क्यूरा’ हा शब्दप्रयोग सतराव्या शतकात वापरला  होता. त्यास सूचिछिद्र कॅमेरा (पिनहोल कॅमेरा) असेही म्हणत. या कॅमेऱ्याला असलेल्या सूक्ष्म छिद्रातून प्रकाशकिरण आत येऊन समोरच्या पटलावर प्रतिमा निर्माण करत असत. पुढे छिद्राच्या जागी भिंगाचा प्रयोग होऊ लागला. भिंगामुळे प्रतिमा जरी नेमकी झाली, तरी ती तात्कालिक स्वरूपाची होती. त्या प्रतिमेला कायम स्वरूप देण्याचे काम सिल्वर हॅलाइड्स या माध्यमाने केले. या संयुगांचा वापर करून प्रकाशचित्रणाची मूळ फिल्म तयार करण्यात आली. फ्रान्समध्ये दगेर आणि निपचे यांनी स्थिर प्रकाशचित्रणाचे  (स्टिल फोटोग्राफी) तंत्र १८३९ साली विकसित केले. त्यामुळे माणसे, निसर्ग, वस्तू यांच्या  हुबेहूब प्रतिमा निर्माण करणाऱ्या या यंत्राची लोकांना मोहिनी पडली. परंतु यातील नावीन्य ओसरल्यावर लोकांच्या अपेक्षा वाढल्या आणि मग त्यातून ही चित्रे हालती करण्याचे प्रयत्न सुरू झाले.

१८७७ साली फ्रान्समध्ये चार्ल्स एमिल रेनो याने  प्रॅक्झिनोस्कोप (Praxinoscope) हे उपकरण निर्माण केले. त्यात यंत्राच्या मध्यभागी असलेल्या एका सिलिंडरवर प्रकाशचित्रांची मालिका होती.  यंत्राचा  बाहेरचा भागही  वर्तुळाकार होता.  या दोन भागांच्या मध्ये आतील बाजूला आरसे नेमके लावलेले होते. जेव्हा हे दोनही भाग वर्तुळाकार फिरत, तेव्हा  त्या आरशांत पाहणाऱ्या माणसाला त्या प्रतिमा हालत्या भासत.

फ्रेंच वैज्ञानिक एट्येन झ्यूल मारे याने १८८२ साली क्रोनोफोटोग्रॅफिक गन (Chronophotographic gun) या यंत्राची निर्मिती केली. लांब नळीच्या बंदुकीसारखी त्याची रचना होती. मात्र दस्त्याच्या जागी सिलिंडरच्या आकाराची एक पेटी होती. त्या  पेटीत ऋणपट्ट (negative film) होत्या आणि एखाद्या दृश्याच्या दिशेने बंदूक रोखून कळ दाबली की, एका सेकंदाला बारा प्रकाशचित्रे उपलब्ध होत असत. त्यांच्याद्वारे पक्षी, प्राणी यांच्या हालचाली पाहता येत. बंदूक रोखून प्रकाशचित्रीकरण करण्याच्या प्रक्रियेमुळे चित्रीकरणाला ‘शूटिंग’ असे संबोधले जाऊ लागले.
१८७२ सालापासून अमेरिकेत एडवर्ड मायब्रिज हा तंत्रज्ञ झूप्रॅक्झिस्कोप या यंत्राद्वारे हालत्या प्रतिमांचे प्रक्षेपण करण्याचा प्रयत्न करीत होता. कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर स्टॅनफर्ड यांच्या पदरी मायब्रिज काम करत होता. त्याने एक फोटोग्राफर म्हणून उत्तम नाव कमावले होते. स्टॅनफर्डने एक दावा केला होता, की घोडा जेव्हा चौखूर धावतो, तेव्हा काही क्षणांकरता त्याचे चारही खूर हवेत असतात. ही गोष्ट प्रयोगानिशी सिद्ध करण्याची जबाबदारी त्याने मायब्रिजवर सोपवली. अनेक प्रयोगांनंतर, सुमारे बारा वर्षांच्या काळानंतर, १८८४ साली मायब्रिजला यात यश मिळाले. या प्रयोगाकरता त्याने बारा कॅमेरे वापरले होते. स्टॅनफर्डच्या अश्वशाळेतल्या एका  घोड्याची दौड विविध दृष्टिकोनांमधून स्थिरचित्रांच्या  रूपात चित्रित केल्यानंतर, तांत्रिक कौशल्य वापरून त्याने प्रक्षेपणाद्वारे हे सिद्ध केले, की चौखूर धावणाऱ्या घोड्याचे चारही खूर मधूनमधून एकाच वेळेस हवेत असतात. सायंटिफिक अमेरिकन या प्रतिष्ठित नियतकालिकाने त्याची ही चित्रे  प्रसिद्ध करून या उपक्रमाची नोंद घेतली.

हे सर्व प्रयोग स्थिर चित्रांचा उपयोग करून त्यांमधून हालचालीचा आभास निर्माण करणे या पठडीतले होते.  खऱ्या अर्थाने चलच्चित्रण म्हणता येईल, असे करणारा कॅमेरा अजून निर्माण व्हायचा होता. तसा कॅमेरा निर्माण करण्यात ⇨ टॉमस एडिसनला यश आले.  १८९३ साली एडिसनने वेस्ट ऑरेंज येथे त्याच्या मालकीच्या जागेवर ब्लॅक मारिआ नावाचे चित्रपटनिर्मितिगृह (स्टुडिओ) निर्माण केले.  खास अंतर्गृह चित्रीकरणाकरता निर्माण केलेले हे जगातील  पहिले चित्रपटनिर्मितिगृह होते. तेथे मिनिट- दोन मिनिट लांबीचे काही चित्रपट सुरुवातीला निर्माण करण्यात आले. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न ते चित्रपट दाखविण्याची व्यवस्था करण्याचा होता. डिक्सन हा एडिसनच्या सहकाऱ्यांमध्ये सर्वाधिक प्रज्ञावंत होता. त्याच्याकडे एडिसनने ही जबाबदारी सोपवली. डिक्सनने कायनेटोस्कोप हे यंत्र तयार केले.  कडेला भोके पाडलेली फिल्म (perforated film) यात धावती करण्याची व्यवस्था होती आणि सातत्याने उघडझाप करणारा प्रकाशाचा झोत त्या धावत्या फिल्मवर सोडला होता.  दृष्टिसातत्याच्या  सिद्धांताचा उपयोग करून स्थिरचित्रांच्या चालनातून हालचालींचा आभास निर्माण करणे हे या  विशिष्ट प्रकाशयोजनेमागचे कारण होते. या यंत्रात जरी प्रक्षेपणयंत्रणा असली, तरी ह्या प्रतिमा पडद्यावर किंवा भिंतीवर प्रक्षेपित करण्याची सोय नव्हती. त्या यंत्राला डोळा भिडवून एका वेळी एक माणूसच आतला देखावा पाहू शकत असे.

याच काळात जर्मनीमध्ये माक्स आणि एमिल स्क्लादनोवस्की या बंधूंनी बायस्कोप या यंत्राची निर्मिती  केली. चित्रीकरण आणि  प्रक्षेपण या दोनही गोष्टी करण्याची क्षमता या यंत्रात होती. त्यांनी १ नोव्हेंबर १८९५ रोजी आपला पहिला सार्वजनिक खेळ बर्लिनमधील सेंट्रल हॉटेलच्या बॉलरूममध्ये सादर केला. ‘बायस्कोप – एक अतिशय मनोरंजक आणि उत्कंठापूर्ण खेळʼ अशी जाहिरात केलेल्या त्यांच्या या खेळाला अमाप लोकप्रियता लाभली आणि काही सेकंदांच्या लांबीचे हे चित्रपट पाहायला चार आठवड्यांपर्यंत गर्दी लोटत राहिली.

ल्यूम्येअर बंधूंनी जेव्हा आपला चार्ज ऑफ द ड्रॅगन्स हा खेळ सादर केला, तेव्हा त्यांच्या चित्रपटांचा तांत्रिक दर्जा आणि प्रक्षेपणाचा दर्जा तत्पूर्वी सादर झालेल्या इतर सर्व चित्रपटांपेक्षा श्रेष्ठ होता. या कारणाकरिता चित्रपटांचे जन्मदाते म्हणून त्यांनाच मान  दिला जातो.

समीक्षक – निखिलेश चित्रे

प्रतिक्रिया व्यक्त करा