भारतातील एक प्रसिद्ध कलागृह / कलामंदिर. हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते राज कपूर यांनी भारताच्या स्वातंत्र्यानंतर एकाच वर्षाने १९४८ साली आर. के. स्टुडिओ या कलागृहाची स्थापना केली. मुंबईच्या पूर्व उपनगरातील चेंबूर येथे सुमारे २. २ एकर जमिनीवर याची संकल्पना पूर्णत्वास आली. १९५० साली याच्या मुख्य इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. राज कपूर यांच्याच नावाने जरी याची स्थापना केली गेली असली, तरी त्यांचे तीन वारसदार कलाकार / अभिनेते रणधीर कपूर, ऋषी कपूर आणि राजीव कपूर यांची नावेसुद्धा नंतर या कलागृहाचे मालक / हक्कदार म्हणून नोंदली गेली.

आर. के. स्टुडिओच्या दर्शनी भिंतीवरील बोधचिन्ह

सर्वप्रथम आर. के. स्टुडिओत आर. के. फिल्म्सच्याच आग  या चित्रपटाचे काही चित्रीकरण करण्यात आले (१९४८). या चित्रपटाला तिकीटबारीवर फारसे यश मिळाले नाही.आग पासून थेट १९९९ च्या आ अब लौट चले  या चित्रपटापर्यंत आर. के. फिल्म्सने निर्मिलेल्या तब्बल २१ चित्रपटांचे बरेचसे चित्रीकरण या कलागृहात झालेले आहे. आगनंतर आलेल्याबरसात (१९४९) या चित्रपटाला खूप प्रसिद्धी मिळाली. त्याचा फायदा या कलागृहासही झाला. पुढे आलेले आवारा (१९५१), आह (१९५३), बूट पाॅलीश (१९५४), श्री ४२० (१९५५), जागते रहो (१९५६), जिस देश मे गंगा बहती है (१९६१), संगम (१९६४), मेरा नाम जोकर (१९७०), बॉबी (१९७३), सत्यम शिवम सुंदरम् (१९७८), प्रेमरोग (१९८२), राम तेरी गंगा मैली (१९८५) हे चित्रपट हिंदी चित्रपटांच्या इतिहासात मैलाचा दगड ठरले. आर. के. च्या वतीने त्याशिवाय कल आज और कल (१९७१), धरम करम (१९७६), बिवी ओ बिवी (१९८१) इत्यादी चित्रपटांचीही निर्मिती करण्यात आली. त्याशिवाय दिग्दर्शक मनमोहन देसाई, प्रकाश मेहरा, जे. ओम प्रकाश इत्यादी अनेक दिग्दर्शकांनीही येथे आपल्या काही चित्रपटांचे चित्रीकरण केले. या कलागृहात एका मोठ्या फ्लोअरसह आणखीन काही फ्लोअर (सेट लावण्यासाठी जागा) होते. त्या काळी आशियातील हे सर्वांत मोठे फ्लोअर होते.

आर. के. स्टुडिओची निर्मिती झाल्यानंतर आर. के. फिल्म्सने ज्या चित्रपटांची निर्मिती केली, त्यांतील सहा चित्रपटांत नर्गिस या अष्टपैलू अभिनेत्रीचा सहभाग होता. नर्गिस आणि राज कपूर यांनी आर. के. च्या चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी रशिया आणि अन्य काही देशांत एकत्र प्रवासही केला. आर. के. स्टुडिओमध्ये आर. के. फिल्म्सच्या निर्मितीसाठी कलाकार आणि तंत्रज्ञ यांचा जो एक संघ तयार झाला, त्यामध्ये मुख्यत्वे अभिनेत्री नर्गिस, संगीतकार शंकर-जयकिशन, गीतकार शैलेंद्र, हसरत जयपुरी, गायिका लता मंगेशकर, गायक मुकेश, पटकथा लेखक के. ए. अब्बास आणि ‘बॉम्बे पब्लिसिटी सर्व्हिस’चे संचालक व पटकथालेखक वसंत साठे, कॅमेरामन राधू करमाकर इत्यादी नावे प्रामुख्याने घेता येतील.

आर. के. स्टुडिओमध्ये चित्रपटांशी संबंधित अनेक वस्तूंचा बराच मोठा संग्रह होता. त्यामध्ये नर्गिसचा शृंगार कक्ष (ड्रेसिंग रूम), श्री ४२०  या चित्रपटामधील ‘प्यार हुआ इकरार हुआ’ या गाजलेल्या गाण्यातील मोठी काळी छत्री, तसेच आवारा, संगम, बॉबी, जिस देश मे गंगा बहती है  या चित्रपटांतील गाजलेल्या गाण्यांमधील प्रमुख अभिनेत्रींचे पोषाख आणि एका गाण्यात राज कपूर यांनी वापरलेली डफली आणि त्यांनी विविध चित्रपटांत वापरलेल्या वेगवेगळ्या ‘टोप्या’, पियानो इत्यादी वस्तू या संग्रहात होत्या. आर. के. फिल्म्सच्या चित्रपटांतील अनेक गाजलेल्या गाण्यांचे सेट येथे जतन करण्यात आले होते. उदा., ‘घर आया मेरा परदेसी’ या गाण्याचा सेट, श्री ४२०  मधील ‘प्यार हुआ इकरार हुआ’ या गाण्याचा सेट, प्रेमरोगमधील ‘ये गलियां ये चौबारा’ या गाण्यातील हवेलीचा सेट तसेच राम तेरी गंगा मैली  या सिनेमातील बनारसच्या प्रदेशाचा सेट इत्यादी. आर. के. फिल्म्सचे प्रसिद्ध बोधचिन्ह (लोगो) हे राज कपूर यांच्या बरसात  या चित्रपटातील एका दृश्याचे प्रतिक आहे. फ्रान्सचा प्रसिद्ध चित्रकार रूत्झर सोनाटा (kreutzer sonata) याने टॉलस्टायच्या लघुकादंबरीवरून रेखाटलेल्या चित्रावर आधारलेले हे प्रतिक आहे. स्टुडिओवरील त्याची प्रतिकृती बोलकी आहे.

आर. के. स्डुडिओत पहिल्या मजल्यावर ओळीने रंगभूषा कक्ष (मेकअप रूम) होते आणि तयार होऊन प्रत्यक्ष चित्रीकरणासाठी जाताना एक खूप मोठा आरसा समोर येई. त्यात पाहताना कलाकारांची पावले थबकत असत. अनेक कलाकारांच्या आठवणीत हा आरसा आहे. कलागृहाच्या मुख्य इमारतीमध्ये राज कपूर यांचा कक्ष (केबिन) होता आणि मग ओळीने कपूर बंधूंचे कक्ष होते. याच इमारतीमधील मिनी थिएटरमध्ये आर. के. च्या अनेक चित्रपटांच्या ट्रायल होत, तसेच चित्रपटांच्या प्रसिद्धीकरिता वार्ताहरांसाठीचे कार्यक्रमही होत असत.

आर. के. फिल्म्सनिर्मित जवळजवळ सर्वच चित्रपट हे समाजातील अनिष्ट रूढीपरंपरांवर भाष्य किंवा टीका करणाऱ्या कथांवर, सामाजिक विषमता दर्शवणाऱ्या प्रेमकथांवर तसेच समाजातील दुर्लक्षित गटाच्या पुनरुत्थानासंबंधित कथा यांवर आधारित असत. सर्व चित्रपटांमध्ये हा एक समान धागा असायचा. उदा., प्रेमरोग  हा चित्रपट विधवा विवाह आणि सरंजामदारी या विषयांवर बेतलेला होता. जिस देश मे गंगा बहती है  हा चित्रपट विपरित परिस्थितीत सापडलेल्या पण तरीही स्वत:बरोबरच नायकाशी संबंधित इतरांनाही सन्मार्गावर घेऊन चाललेल्या एका भोळ्या अनाथ नायकावर आधारित आहे. 

आर. के. स्टुडिओ हा जरी मुख्यत्वे चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी प्रसिद्ध असला तरी येथे दरवर्षी होळी किंवा धुळवड आणि गणेशोत्सव हे सण येथील कर्मचारी वर्ग तसेच आर. के. फिल्म्सच्या इतर सभासदांना व कलाकारांना एकत्र येण्यासाठी म्हणून साजरे केले जात असत. साठच्या दशकात राज कपूर यांनी स्टुडिओत याची सुरुवात केली. हे सण या स्टुडिओचे वैशिष्ट्य होते. त्याकाळातील ख्यातनाम कलाकारांच्या उपस्थितीमुळे हे सोहळे रंगतदार बनत. आर. के.ची होळी ही अनेक कलाकारांच्या स्मृतीतील एक खूप मोठा आठवणींचा ठेवा आहे.

राज कपूर यांच्या निधनानंतर त्यांचे जेष्ठ पुत्र रणधीर कपूर यांनी आर. के. स्टुडिओची सूत्रे हाती घेतली. त्यावेळी राज कपूर यांनी हीना  (१९९१) या चित्रपटाचे काम येथे सुरू केले होते. ते रणधीर कपूर यांनी पूर्ण केले. या चित्रपटास समीक्षकांनी गौरविले, मात्र प्रेक्षकांकडून यास फारसा प्रतिसाद मिळाला नाही. राज कपूर यांचा धाकटा मुलगा राजीव कपूर यांनी १९९६ मध्ये प्रेमग्रंथ  हा चित्रपट येथे दिग्दर्शित केला आणि १९९९ मध्ये ऋषी कपूर यांनी आ अब लौट चले  हा चित्रपट येथे दिग्दर्शित केला. पण याही चित्रपटांना म्हणावी तशी प्रसिद्धी मिळाली नाही. आर. के. फिल्म्स या निर्मितीसंस्थेच्या नावाने निर्मिती झालेला हा अखेरचा चित्रपट ठरला. इतर काही चित्रपट तसेच वाहिन्यांचे कार्यक्रम आणि दूरदर्शन वाहिन्यांच्या मालिकांचे चित्रीकरण येथे त्यानंतरही चालू होते. अशाच एका वाहिनीच्या कार्यक्रमाच्या सेटला १९ सप्टेंबर २०१७ या दिवशी मोठी आग लागली आणि येथील एक भाग यात भस्मसात झाला. सुदैवाने यावेळी चित्रीकरण सुरू नव्हते. या आगीमध्ये येथे अनेक वर्षे जतन करण्यात आलेला चित्रपटविषयक विविध वस्तूचा संग्रहही नष्ट झाला.

राज कपूर यांच्यानंतर या कलागृहास उतरती कळा आली. इतर चित्रपट निर्माते चित्रीकरणास जास्त अनुकूल अशा इतर कलागृहांकडे वळले. आर .के. फिल्म्सकडूनही पुढे नवनवीन चित्रपटांच्या निर्मितीत सातत्य राहिले नाही. त्यामुळे इतक्या मोठ्या कलागृहाचे व्यवस्थापन डळमळले. त्यातच स्टुडिओला लागलेल्या आगीमुळे आणखी नुकसान झाले. पुढे राज कपूर यांच्या वारसदारांनी स्टुडिओची जागा विकण्यावर शिक्कामोर्तब केले. २०१८ मध्ये आर. के. स्टुडिओची ही जागा ‘गोदरेज प्रॉपर्टीज’ या गोदरेज समूहाच्या कंपनीने विकत घेतली. ३ मे २०१९ या दिवशी गोदरेज प्रॉपर्टीजने या जागेवर निवासी संकुल उभारण्याची घोषणा केली. तसा फलकही या स्टुडिओबाहेर लावलेला आहे. अशा तऱ्हेने ७१ वर्षे जुनी असलेली ही वास्तू आणि त्याच्यासोबत जोडलेल्या आठवणी फक्त चित्रपट क्षेत्रातीलच नव्हे तर सर्वसामान्य भारतीयांच्या आणि विशेषतः मुंबईकरांच्या मनातही इतिहास जमा झाल्या.

समीक्षक : दिलीप ठाकूर