दुःख ही संकल्पना ‘भारतीय तत्त्वज्ञान’ या क्षेत्रात निरनिराळ्या अर्थांनी आपल्यासमोर येते. सांख्यांच्या तत्त्वप्रणालीत दुःखाचे तीन प्रकार सांगितले आहेत. सांख्यकारिकेमधील प्रारंभीची आर्या ‒
दुःखत्रयाभिघाताज्जिज्ञासा तदभिघातके हेतौ |
दृष्टे साऽपार्था चेन्नैकान्तात्यन्ततोऽभावात् || (१)
अर्थ : त्रिविध प्रकारच्या दुःखांचा अनुभव असह्य असल्याकारणामुळे त्याचे निवारण करण्याची वृत्ती व दुःखाच्या निवृत्तीचा उपाय जाणण्याची जिज्ञासा निर्माण होते. दुःखाची निवृत्ती करण्याचे लौकिक उपाय आहेतच तथापि नवे उपाय शोधू नये, असे करू नये; कारण लौकिक उपायांनी या दुःखांचे एकांतिक वा आत्यंतिक निवारण होत नाही.
सांख्यांनी दुःखाचे तीन प्रकार विशद केले आहेत. गौडपादाचार्य व विज्ञानभिक्षु यांच्या भाष्यांत याचे सविस्तर विवेचन पाहावयास मिळते. सांख्यसंमत दुःखत्रय पुढीलप्रमाणे : आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक. आध्यात्मिक दुःखाचे दोन प्रकार पडतात ‒ शारीर आणि मानस. शारीर आध्यात्मिक दुःख म्हणजे वात-पित्त-कफ या त्रिदोषांच्या विपर्यासामुळे ज्वर, अतिसार इत्यादी ज्या व्याधी होतात, त्या होत. मानस आध्यात्मिक दुःख म्हणजे प्रिय वस्तूच्या वियोगाने आणि अप्रिय वस्तूच्या संयोगाने होणारे दुःख होय. मानस दुःखात काम, क्रोध, मोह, मत्सर यांचाही समावेश होतो.
आधिभौतिक दुःख मनुष्य, पशू, पक्षी, सरपटणारे प्राणी, माशी, ऊ, ढेकूण, मासे, मगर इत्यादींपासून होते. जरायुज, अंडज, स्वेदज, उद्भिज या चार प्रकारच्या चर-अचर पदार्थांपासून आधिभौतिक दुःख उत्पन्न होते.
आधिदैविक दुःख हे विविध देवता विशेषांपासून निर्माण होणारे असते. म्हणजे शीत, उष्ण, वात, वर्षा, भूकंप, उल्कापात या नैसर्गिक आपत्ती या वर्गात येतात. येथे एकांतिक व आत्यंतिक या पदांचे स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे. एकांतिक उपाय म्हणजे असे उपाय की ज्यांनी दुःख निश्चितपणे दूर होईल आणि आत्यंतिक म्हणजे दुःखाचा कायमचा नायनाट होईल. लौकिक उपाय दुःख दूर करतीलच याची खात्री नसते आणि त्यांनी केलेला दुःखनिरास तात्पुरता असतो. आध्यात्मिक दुःख हे आंतरिक उपायांनी कमी करता येते म्हणून त्याला आध्यात्मिक दुःख म्हटले जाते.
श्रीनिवास दीक्षित यांच्या मते आपल्या सभोवार दिसणारी सुखे चिरकाल टिकत नाहीत एवढीच सांख्यांची तक्रार आहे. स्वर्गातील सुखाविषयीही सांख्य विरक्त राहण्यास सांगतात; कारण तिथेही आपल्यापेक्षा अधिक सुख कोणालातरी आहे ही भावना आपल्याला दुःख देत राहणार, अशी सांख्यांची धारणा आहे. पण या दुःखातून सुटका होऊ शकते असे आश्वासनही सांख्य देतात. म्हणून त्यांचा दुःखवाद हा आरंभिक आहे; आत्यंतिक नाही.
संदर्भ :
- Apte, Vaman Shivaram, The student’s Sanskrit-English Dictionary, Delhi, 2011.
- Jha, Ganganath, Trans., Vachaspatimisra’s Comentary on the Sankhya-Karika, Pune, 1965.
- Larson, Gerald James, Classical Sankhya : An Interpretation of Its History and Meaning, Delhi, 2005.
- कंगले, र. पं. संपा. सर्वदर्शनसंग्रह, मुंबई, १९८५.
- कुमठेकर, उदय, सांख्यदर्शन, पुणे, २००७.
- टिळक, बाळ गंगाधर, श्रीमद्भगवद्गीतारहस्य, पुणे, १९७४.
- दीक्षित, श्रीनिवास हरि, भारतीय तत्त्वज्ञान, कोल्हापूर,२०१४.
समीक्षक : ललिता नामजोशी