अविद्येमुळे चैतन्यस्वरूप पुरुष (आत्मा) चित्ताशी तादात्म्याचा अनुभव करतो व स्वत:ला चित्ताद्वारे केल्या जाणाऱ्या सर्व क्रियांचा कर्ता समजतो. या कर्तृत्वाच्या अभिमानामुळे केल्या जाणाऱ्या क्रियांचे फळ आत्म्याला अनुभवावे लागते व तो जन्म-मृत्यूच्या चक्रात अडकतो, यालाच बंध असे म्हणतात. योगदर्शनामध्ये पुरुषाला (आत्म्याला) दृक् शक्ती म्हणजे ज्ञान होण्याची योग्यता आहे असे मानले आणि बुद्धीला किंवा चित्ताला दर्शनशक्ती म्हणजे ज्ञानाचे साधन होण्याची योग्यता आहे असे मानले आहे. परंतु, जोपर्यंत ज्ञानाचे साधन (चित्त) नसेल तोपर्यंत पुरुषाला ज्ञान होऊ शकत नाही आणि चित्तही पुरुषाच्या संयोगाशिवाय ज्ञान प्राप्त करण्याचे साधन होऊ शकत नाही. त्यामुळे पुरुष आणि चित्ताला परस्परांची आकांक्षा असल्यामुळे उभयतांचा संयोग होतो ; परंतु या संयोगामुळे जे चित्त वस्तुत: आत्म्यापेक्षा वेगळे आहे, त्यालाही आत्मा स्वत:चा अभिन्न भाग समजतो, यालाच ‘अस्मिता’ असे म्हणतात व यामुळेच आत्म्याला बंधन निर्माण होते. जोपर्यंत पुरुष आणि चित्त वेगळे आहेत, असे विवेकज्ञान होत नाही, तोपर्यंत बंधन राहते व ते ज्ञान झाल्यावर जीवाला मोक्ष किंवा कैवल्य प्राप्त होते.

योगदर्शनानुसार बंध तीन प्रकारचा असतो.

(१) प्राकृतिक बंध : सांख्ययोग दर्शनांमध्ये मानलेल्या तत्त्वांपैकी मूलप्रकृती, महत्, अहंकार आणि पाच तन्मात्र ही आठ तत्त्वे अन्य तत्त्वांच्या उत्पत्तीसाठी कारणे आहेत. त्यामुळे त्यांना प्रकृती (कारण) म्हणतात. या आठ तत्त्वांपैकी कोणत्याही एका तत्त्वाला आत्मा समजून त्यावर ध्यान केल्यास जीव प्राकृतिक बंधात अडकतो. तन्मात्र इत्यादी तत्त्वांवर ध्यान करणे योगदर्शनानुसार इष्ट आहे, परंतु तन्मात्र इत्यादी तत्त्वांनाच आत्मा समजून त्यांचे ध्यान करणे इष्ट नाही. जे आत्मा नाही त्याला आत्मा समजणे, यालाच अविद्या असे म्हणतात. अशा प्रकारे तन्मात्र इत्यादि आठ तत्त्वांपैकी एकाला आत्मा समजून जे ध्यान करतात, त्यांना ‘प्रकृतिलय’ योगी असे म्हणतात. अशा योग्यांचे चित्त ध्यानामुळे एकाग्र तर होते, परंतु देहपात झाल्यानंतर त्याचे चित्त त्या त्या तत्त्वामध्ये विलीन होते आणि यथार्थ ज्ञानाची प्राप्ती होईपर्यंत त्यांना मुक्ती प्राप्त होत नाही आणि पुनर्जन्म प्राप्त होतो. आत्म्याचे यथार्थ ज्ञान न झाल्यामुळे त्यांचे चित्त बंधनात राहते. यालाच प्राकृतिक बंध असे म्हणतात.

(२) वैकृतिक बंध : पाच महाभूते, पाच ज्ञानेंद्रिये, पाच कर्मेंद्रिये आणि मन ही सोळा तत्त्वे अन्य कोणत्याही तत्त्वाच्या उत्पत्तीसाठी कारणे नाहीत, तर ती तत्त्वे विकृती (कार्य किंवा उत्पन्न होणारी तत्त्वे) आहेत. या सोळा तत्त्वांपैकी कोणत्याही एका तत्त्वाला आत्मा समजून त्यावर ध्यान केल्यास जीव वैकृतिक बंधनात अडकतो. ज्यांना स्थूलदेह नाही आणि जे सूक्ष्मदेहाच्या रूपात अस्तित्वात आहेत असे योगी ‘विदेह’ या संज्ञेने ओळखले जातात. हे योगी वरीलप्रमाणे ध्यान करतात. या योग्यांचे चित्तही एकाग्र होते; परंतु आत्म्याचे यथार्थ ज्ञान न झाल्यामुळे देहपातानंतर त्यांचे चित्त त्या त्या तत्त्वामध्ये विलीन होते. पूर्वकर्मांचे संस्कार जागृत झाल्यावर हे योगी मुक्ती प्राप्त होण्यासाठी पुन्हा जन्म घेतात.

(३) दक्षिणादि बंध : विविध विषयांचा अनुभव घेतल्यावर अनुकूल विषयांप्रती आसक्ती (राग) आणि प्रतिकूल विषयांप्रती द्वेष उत्पन्न होतो. राग-द्वेष किंवा अन्य क्लेशांच्या प्रभावामुळे जीव विविध कर्मे करतो. त्या कर्मांचे संस्कार चित्तात उत्पन्न होतात आणि त्या कर्मांचे फळ जीवाला उपभोगावे लागते. केलेल्या सर्व कर्मांचे फळ एकाच जन्मात उपभोगता येणे शक्य नसते त्यामुळे अवशिष्ट कर्मफलाचा उपभोग घेण्यासाठी जीवाला अनेक जन्म घ्यावे लागतात. अशा प्रकारे जन्म-मृत्यूच्या चक्रात अडकल्यामुळे जीवांना जे बंधन उत्पन्न होते त्याला दक्षिणादि बंध असे म्हणतात. दक्षिणाबंध म्हणजे गृहस्थांना दक्षिणा, दान आणि अध्ययन इत्यादींविषयी असलेली ओढ, असे स्पष्टीकरण विज्ञानभिक्षूंनी योगवार्त्तिकात दिले आहे. (तृतीयो गृहस्थानां कर्मदक्षिणादानाध्ययनादिष्वनुराग: | योगवार्त्तिक १.२४)

या तीन प्रकारच्या बंधनांचे वर्णन योगदर्शनात, विशेषत: वाचस्पति मिश्रांनी व्यासभाष्यावरील तत्त्ववैशारदी  या टीकेमध्ये विस्ताराने केले आहे.

पहा : अविद्या, तन्मात्र.

संदर्भ :

  • कर्णाटक विमला, पातञ्जलयोगदर्शन, वाराणसी, १९९२.

समीक्षक : कला आचार्य