संस्कृतकोशप्रकल्प : संस्कृत-इंग्लिश कोशप्रकल्प. प्रमुख संस्कृत शब्द आणि त्या शब्दाचे अर्थविश्लेषण करणाऱ्या संदर्भ नोंदी संकलित करून हा कोशप्रकल्प प्रकाशित करण्यात आला आहे. सुमित्र मंगेश कत्रे या भाषाशास्त्रज्ञाने पुण्यातील दक्षिणा महाविद्यालयातील  पदव्युत्तर  संशोधन संस्थेत  या कोशप्रकल्पाचे कार्य १९४८ साली प्रारंभ केले होते. या कोशासाठी दहा हजार प्रमुख शब्दांच्या सुमारे नव्वद हजाराहून अधिक संदर्भ नोंदी एकत्रित करण्यात आल्या आहेत. मोनियर – विल्यम्स यांच्या संस्कृत-इंग्लिश तसेच राथ आणि बोथलिंक्ग् यांच्या संस्कृत जर्मन कोशापेक्षा या कोशाचा आवाका मोठा आहे. या कोशप्रकल्पासाठी ख्रिस्तपूर्व १४०० मधील ऋग्वेदसहिंतेपासून अठराव्या शतकातील हास्यागर्व या पुस्तकापर्यंत ६२ विद्याशाखांमधील सुमारे  १५०० पुस्तके, टीकाग्रंथ, संस्कृत भाषेचे वैशिष्ट्य असलेल्या एक भाषिक श्लोकात्मक कोशांचा आधार घेण्यात आला आहे. या कोशप्रकल्पात विविध मान्यवर भाषातज्ञांनी योगदान दिले आहे.

या कोशातील शब्दांचा अर्थ देताना विश्लेषणात्मक तसेच ऐतिहासिक पद्धतीचा अवलंब केला असून, शब्दांचे प्रथम लिप्यंतर, तसेच व्याकरण दिले जाते. शब्दाचा स्वर, त्याची व्युत्पत्ती, मूलस्रोत याचा विचार करून त्याचे अर्थदृष्ट्या विश्लेषण केले जाते. कोशातील शब्दांच्या अर्थनिश्चीतीसाठी उपलब्ध सर्व कोशांचीही मदत घेतली जाते. विश्लेषण केलेल्या अर्थांमध्ये त्या शब्दाच्या सर्व संदर्भनोंदी त्यांच्या अवतरणांसह, तसेच पूर्ण संदर्भासह कालक्रमाने देण्यात येतात. ज्यामुळे संस्कृत भाषेचा सांस्कृतिक इतिहास, त्या त्या शब्दांमधील ध्वन्यात्मक तसेच अर्थदृष्ट्या झालेले बदल, भाषाशास्त्रीय घडामोडी यांचा ऐतिहासिक मागोवा घेणे शक्य होते. आजपर्यंत कोशाचे ३१ खंड प्रकाशित झाले असून, अप्रामान्यव्यतिरिक़्त या शब्दापर्यंत अर्थनिश्चिती पूर्ण झाली आहे. या सर्व शब्दनोंदींचे  संगणकीकरण झाले असून राष्ट्रीय संस्कृत संस्थान, दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य सरकारच्या अनुदानातून या प्रकल्पाचे काम चालते.