आरोपीस उपलब्ध बचावाची एक कायदेशीर तरतूद. ‘गुन्ह्याच्या वेळी अन्यत्र उपस्थिती’ असा या संज्ञेचा शब्दश: अर्थ आहे. ॲलिबी हा मूळ लॅटिन शब्द असून त्याचा अर्थ ‘अन्यत्र कोठेतरी’ (अन्यत्र उपस्थिती) असा होतो. फिर्यादीने जर आरोपीवर एका विशिष्ट स्थळी व विशिष्ट वेळी एखादा गुन्हा केल्याचा आरोप केला, तर त्या ठिकाणी त्या वेळी आपण नव्हतो, हा आरोपीचा उत्कृष्ट बचाव होय. ॲलिबीचा ‘ॲलिबाय’ असाही उच्चार होतो.

ॲलिबीचा बचाव हा भारतीय दंड संहितेमध्ये नाही; परंतु भारतीय पुरावा अधिनियम, १८७२ च्या कलम ११ मध्ये हा बचाव अप्रत्यक्षपणे मान्य केला गेला आहे. फौजदारी व काही दिवाणी दाव्यांमध्ये एरवी सुबद्ध (Relevant) नसलेली तथ्ये विशिष्ट परिस्थितीमध्ये संबद्ध होतात. अशा तथ्यांवर भाष्य करणे हा कलम ११ चा उद्देश आहे. कलम ११, पोटकलम (२) हे शक्य व असंभाव्यता यांवर टिप्पणी करते.

वस्तुस्थिती शाबीत करण्याची जबाबदारी कोणाची व कधी असते, यावर भारतीय पुरावा अधिनियम, १८७२ चे कलम १०३ प्रकाशझोत टाकते. सदरील कलमाचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, अभियोग (फिर्यादी) पक्षाने जर ॲलिबीचा बचाव शाबीत करण्याच्या जबाबदारीचे संतोषकारक रीत्या निर्वाहन केले असेल, तर सदरील ॲलिबीचा बचाव कर्तव्य म्हणून शाबीत अथवा सिद्ध करण्याची जबाबदारी ही आरोपी पक्षाची असते. ॲलिबीचा बचाव सिद्ध करण्याची जबाबदारी ही पूर्णत: आरोपी पक्षावर असते. गुन्हा घडलेल्या ठिकाणी आरोपीची अनुपस्थिती पुराव्याने सिद्ध झाली, तर तो निर्दोष ठरतो; पण यासाठी सबळ व चांगला पुरावा द्यावयास पाहिजे.

तत्संबंधी खालील बाबी महत्त्वाच्या होत :

  • ॲलिबीचा बचाव सिद्ध करताना सुरुवातीसच दक्षता घ्यावी लागते; कारण नंतर केल्यास त्याची विश्वासार्हता कमी होण्याची शक्यता असते.
  • ॲलिबीचा बचावासाठीचे पुरावे विश्वासार्ह व सबळ असावेत. ज्यामुळे बचावप्रकरणास बळकटी येईल.
  • जर आरोपी पक्षाने सरकारी, निमसरकारी अथवा सार्वजनिक दस्तऐवज सादर केले, तर ॲलिबीच्या बचावाला एक नवीन दिशा प्राप्त होते.
  • ॲलिबीच्या बचावाचा पुरावा शाबीत करण्याची जबाबदारी ही आरोपी पक्षाची असते.
  • आरोपी पक्षाचा पुरावा प्रतिवादी पक्ष पूर्णपणे खोडून काढत नसेल, तर अशा वेळेला संशयाचा फायदा आरोपी पक्ष घेऊ शकतो.
  • ॲलिबी बचावाचा चुकीचा पुरावा आरोपी पक्षाने मांडला, तर तो सकारात्मक रीत्या गुन्ह्यास जबाबदार असतो, असे नाही.

संदर्भ :

  • Sethi, J. R. P. Supreme Court on Words and Phrases 1950 ̶ 2008, New  Delhi, 2008.

                                                                                                                                                                     समीक्षक : दीपा पातुरकर