इंग्रज-शीख युद्धे : (१८४५–१८५०). इंग्रज व शीख यांच्यात झालेली युद्धे. भारतातील साम्राज्यविस्ताराच्या दृष्टीने ब्रिटिशांनी शिखांविषयी अवलंबिलेले धोरण व त्यातून उद्भवलेली दोन युद्धे भारताच्या इतिहासात प्रसिद्ध आहेत. रणजितसिंगाच्या कारकीर्दीत इंग्रज-शीख संबंध मित्रत्वाचे होते. रणजितसिंग व इंग्रज यांच्यात १८०९ साली झालेल्या तहानुसार सतलज नदी ही ब्रिटिश व शीख ह्यांच्या राज्यांमधील सरहद्द म्हणून मान्य झाली व पुढे सु. तीस वर्षे हीच व्यवस्था कायम राहिली. पहिल्या इंग्रज-अफगाण युद्धात रणजितसिंगाने इंग्रजांना सहकार्यही दिले; तथापि रणजितसिंगाच्या मृत्युनंतर (१८३९) इंग्रज-शीख संबंध बिघडण्यास सुरुवात झाली व त्याचेच पर्यवसान इंग्रज-शीख युद्धांत झाले.
पहिले युद्ध : (१८४५). १८४५ मध्ये रणजितसिंगाचा सर्वांत लहान मुलगा दलीपसिंग यास गादीवर बसवून त्याची आई जिंदन हिने मंत्र्याच्या साहाय्याने राज्यकारभार चालविला. तथापि राजकीय अस्थिरतेमुळे लष्करी व्यवस्था पूर्णपणे बिघडून गेली. फौजेला काबूत ठेवण्यासाठी सैनिकांना लष्करी कामगिरीत अडकविणे भाग होते, यासाठी राणी जिंदनने आपल्या सरदारांच्या सल्ल्यानुसार ब्रिटिशांच्या मुलखावर स्वारी करण्याचा बेत आखला. त्याच वेळी ब्रिटिश गव्हर्नर हार्डिंग याने सिंध प्रांतावरील स्वारीनंतर इंग्रजी सैन्य फिरोझपूरजवळ आणून ठेवले. त्यामुळे इंग्रज सैन्य आपल्या सैन्यावर स्वारी करणार असा शीख सैन्याचा ग्रह होऊन, त्यांनी ११ डिसेंबर १८४५ रोजी सतलज नदी ओलांडून इंग्रजांच्या प्रदेशावर स्वारी केली. त्यामुळे हार्डिंगने १३ डिसेंबर १८४५ ला शिखांबरोबर युद्ध घोषित केले. मुडकी, फिरोझशाह, अलीवाल व सोब्राओन येथील लढायांत शिखांचा पराभव झाला. इंग्रजांनी लाहोर जिंकल्यामुळे शिखांना तह करणे भाग पडले. इंग्रज व शीख ह्यांच्यात झालेल्या लाहोर तहानुसार सतलजच्या दक्षिणेकडील शिखांचा प्रदेश म्हणजेच सतलज व बिआस यांमधील प्रदेश कायमचा इंग्रजांना मिळाला. इंग्रजांना युद्धखर्च म्हणून दीड कोट रुपये द्यावे असे ठरले. पैकी पन्नास लाख रुपये रोख आणि एक कोटीसाठी जम्मू व काश्मीर हा प्रदेश देण्यात आला. वीस हजार पायदळ व बारा हजार घोडदळ एवढीच फौज असावी, असे बंधन शिखांवर घालण्यात आले. दलीपसिंगाला गादीवर बसवून पालक म्हणून त्याची आई जिंदनने लालसिंगाच्या सल्ल्याने राज्यकारभार करावा, असे ठरविण्यात आले. तसेच ब्रिटिश सैन्य लाहोरला एक वर्ष रहावे, हे मान्य करण्यात आले.
लाहोर तहानंतरही पंजाबमधील राजकीय अस्थिरता कमी झाली नाही. १८४६ मध्ये शीख सरदारांनी इंग्रजांबरोबर दुसरा तह केला. या तहानुसार पंजाबची राज्यव्यवस्था आठ शीख सरदारांच्या रीजन्सी कौन्सिलने पहावी व त्यावर ब्रिटिश रेसिडेंट अध्यक्ष असावा, असे ठरले. दलीपसिंग वयात येईपर्यंत इंग्रजी फौज लाहोरला ठेवावी व त्याबद्दल शिखांनी ब्रिटिशांना प्रतिवर्षी आठ लक्ष रुपये द्यावे असे ठरले. ह्या तहामुळे लाहोर दरबारावर इंग्रजी पकड घट्ट होऊन पुढील काळात पंजाब ताब्यात घेण्यास इंग्रजांचा मार्ग सुकर झाला.
दुसरे युद्ध : (१८४९). १८४६ च्या तहाप्रमाणे ब्रिटिश रेसिडेंटचे वर्चस्व शीख दरबारावर कायम झाले. सेनाधिकाऱ्यांच्या विरुद्ध सैन्यात असंतोष धुमसत होता. त्यातच मुलतानचा शीख अधिकारी मुळराज याच्याकडून लाहोर सरकारने हिशेब मागितले. मुळराजाने राजीनाम दिला व तो मान्य करण्यात आला. मुलतानला नवीन शीख प्रशासक नेमण्यासाठी डलहौसीने पाठविलेल्या दोन्ही ब्रिटिश अधिकाऱ्यांचे खून झाले. मुळराजने ब्रिटिश सत्तेविरूद्ध बंड पुकारले. त्याच वेळी राणी जिंदनने पंजाब प्रांत स्वतंत्र करण्याची खटपट सुरू केली. त्यामुळे राणीला इंग्रजांनी हद्दपार करताच बंड फैलावले. १८४९ मध्ये शिखांनी इंग्रजांविरुद्ध प्रचंड उठाव केल्यामुळे डलहौसीने शिखांविरुद्ध युद्ध पुकारले. ह्या युद्धात पेशावर परत घेण्यासाठी अफगाणांनी शिखांशी सहकार्य केले. तथापि मुळराजाचा पाडाव झाला. लाहोरच्या रेसिडेंटने मुलतानला वेढा घालण्यासाठी शेरसिंगाबरोबर सैन्य पाठविले, पण तो शिखांनाच मिळाला. १८४९ मध्ये चिलिआनवाला येथे शीख व ब्रिटिश सैन्यांत लढाई झाली. ती निर्णायक न झाल्याने चिनाब नदीकाठी गुजराथ शहराजवळ दोन्ही सैन्यांत घनघोर संग्राम झाला. त्यात शिखांचा पराभव होऊन शेरसिंग व खालसा सैन्य ब्रिटिशांना शरण गेले.
ब्रिटिशांनी दलीपसिंगाला ५०,००० पौंड वार्षिक तनखा देऊन शिक्षणासाठी इंग्लंडला पाठविले. पुढे तो ख्रिस्ती झाला. त्यानंतर पंजाबचे राज्य खालसा करण्यात आले. पंजाब प्रांत मिळाल्यामुळे ब्रिटिश साम्राज्याची सरहद्द अफगाणिस्तानच्या सरहद्दीपर्यंत भिडली. पंजाब स्वतंत्र प्रांत करण्यात आला. पुढील काळात ब्रिटिशांच्या सनदशीर धोरणामुळे शीख ब्रिटिशांचे कायम मित्र बनले. त्यांनी दुसरे इंग्रज-अफगाण युद्ध व १८५७ चा उठाव यांत ब्रिटिशांना सहकार्य दिले.
संदर्भ :
- Singh, Khushwant, A History of the Sikhs, Vol. 2, London, 1966.
- गाडगीळ, न. वि. शिखांचा इतिहास, पुणे, १९६३.