कीर्तने, नीळकंठ जनार्दन : (१ जानेवारी १८४४–१८९६). मराठ्यांच्या इतिहासाचे आद्य टीकाकार, चिकित्सक आणि साक्षेपी संशोधक. त्यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण कोल्हापूर आणि माध्यमिक (मॅट्रिक) शिक्षण मुंबईमध्ये झाले. त्यांनी पुणे येथील डेक्कन कॉलेजमधून पदवी प्राप्त केली (१८६८). उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर तत्कालीन इंदूर संस्थानच्या शिक्षण खात्यामध्ये नोकरीस लागले. त्यानंतर ते देवास (धाकटी पाती), जावरा, वढवाणी व मंगळूर (काठेवाड) या ठिकाणी विद्यागुरू (शिक्षक) व दिवाण या पदावर काही वर्षे कार्यरत होते. देवास संस्थानच्या अधिपतींनी त्यांना एक गाव इनाम दिले होते.

डेक्कन कॉलेजमध्ये शिक्षण चालू असताना ग्रँट डफ याने लिहिलेला हिस्टरी ऑफ द मराठाज (१८२६) हा ग्रंथ त्यांच्या वाचनात आला. पाश्चिमात्य इतिहासकारांनी मराठ्यांच्या इतिहासाचे केलेले लेखन अज्ञानमूलक, अपूर्ण, पूर्वग्रहदूषित आणि बखरवजा असल्याचे कीर्तने यांच्या लक्षात आले. कीर्तने यांनी त्यावर डफकृत मराठ्यांच्या बखरीवर टीका अथवा मराठ्यांच्या इतिहासाविषयी थोडेसे निरूपण (१८६८) या आशयाच्या आपल्या शोधनिबंधात डफच्या इतिहासाची समीक्षा करून ‘ग्रँट डफचा इतिहास म्हणजे मराठ्यांच्या स्वाऱ्यांचा वृत्तान्त असून त्यात इतिहास असा काहीच नाहीʼ असा निष्कर्ष व्यक्त केला. ‘पूना यंग मेन्स असोसिएशन’ या संस्थेमध्ये कीर्तने यांनी हाच निबंध पुन्हा वाचला, तेव्हा कृष्णशास्त्री चिपळूणकर हे अध्यक्ष होते व श्रोते म्हणून शंकर पांडुरंग पंडित हे होते. दोन्ही विद्वानांनी कीर्तने यांच्या लेखाची खूप प्रशंसा केली. शंकर पांडुरंग पंडित यांनी हा निबंध आग्रहपूर्वक मागून घेऊन इंदुप्रकाशमध्ये प्रकाशित केला (१८६८).
कीर्तने यांनी इतिहासलेखनाकरिता डफ यांनी घेतलेले कष्ट, इतिहासलेखनाची त्यांची नवी दृष्टी व पद्धत यांचा गौरवपूर्ण उल्लेख करून त्यातील उणिवा त्यांनी प्रथमच परखडपणे निदर्शनास आणून दिल्या. डफचा ग्रंथ अपुरा आहे, असे ब्रिटिश काळात अतिशय निश्चयपूर्वक आणि धीटपणे त्यांनी सांगितले. परिणामी तत्कालीन सुशिक्षित वर्गाच्या लोकांचे लक्ष मराठ्यांच्या इतिहासाकडे केंद्रित झाले. कीर्तने यांच्या निबंधांने मराठी इतिहास संशोधन-लेखनास नवी दिशा दाखवण्याचे कार्य या काळात केले. पुढे त्यांनी श्रीशिवछत्रपती महाराज यांचे सप्तप्रकरणात्मक चरित्र या चिटणीस बखरीचे संपादन करताना बखरीमध्ये दिसून येणारे दोष निर्देशित करून त्यांचे ऐतिहासिक मूल्य अधोरेखित केले (१८८२). कीर्तने यांनी शेक्सपिअरकृत टेंपेस्ट नाटकाचे मराठी भाषांतर (१८७४), जैन कवी जयचंद्रसूरी (१५ वे शतक) यांच्या हमीर महाकाव्य ह्या दुर्मीळ ग्रंथाचे इंग्रजीमध्ये विद्वत्तापूर्ण संपादन केले. सांप्रत प्रचारातील हिंदूधर्म व अर्वाचीन इष्ट सुधारणुकींच्या संबंधे त्याची योग्यता (१८८६) हा ग्रंथ त्यांच्या नावावर आहे. इंडियन अँटिक्वरी या नियतकालिकामधून त्यांचे इंग्रजीमधून संशोधनपर लेख प्रसिद्ध झाले. मोरोबा कान्होबा लिखित घाशीराम कोतवाल वरील कीर्तने यांचे निर्भीड व सविस्तर परीक्षण (शालापत्रक १८६३) खूपच वाखाणले गेले होते.
कीर्तने यांचे अल्पशा आजाराने वयाच्या ५२ व्या वर्षी निधन झाले.
संदर्भ :
- कुलकर्णी, अ. रा. मराठ्यांचे इतिहासकार, डायमंड पब्लिकेशन, पुणे, २००७.
- देशपांडे, सु. र. मराठेशाहीचे आधुनिक भाष्यकार, गोकुळ मासिक प्रकाशन, पुणे, १९९४.
समीक्षक : अवनीश पाटील
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.