यॅलो, रोझॅलीन सुसमान : (१९ जुलै १९२१ — ३० मे २०११).
अमेरिकन वैद्यकीय भौतिकीविज्ञ. त्यांनी प्रारण-प्रतिरक्षा-आमापन (रेडिओ इम्युनोअॅसे; Radio Immunoassy; RIA) हे तंत्रज्ञान विकासित केले. या तंत्रज्ञानामुळे रक्तातील संप्रेरकासारख्या गोष्टींचे अल्प अंश मोजता येणे शक्य झाले. या कार्याबद्दल त्यांना १९७७ सालाचे शरीरक्रियाविज्ञान किंवा वैद्यक विषयाचे नोबेल पारितोषिक रॉझे गेयमँ (Roger Guillemin) व अँड्र्यू व्ही. शॅली (Andrew V. Schally) यांच्याबरोबर विभागून मिळाले. प्रारण-प्रतिरक्षा-आमापन तंत्रज्ञानामुळे मधुमेह टाईप-२ अपुऱ्या इन्शुलिनमुळे होतो, हे सिद्ध झाले. तसेच संप्रेरक, वितंचक, जीवनसत्त्व, औषधी द्रव्य, संप्रेरक नसलेली प्रथिने, विषाणू अशा १०० पेक्षा जास्त जैविक पदार्थांचे अत्यल्प अंश शोधण्यास मदत झाली .
यॅलो यांचा जन्म ब्राँक्स, न्यूयॉर्क येथे झाला. वॉल्टन हायस्कूल मध्ये असताना त्यांना रसायनशास्त्र विषयाची आवड निर्माण झाली. परंतु हंटर कॉलेज मध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्यांना भौतिकशास्त्रात रस वाटू लागला. हंटर कॉलेज मधून त्यांनी पदवी (१९४१) आणि पदव्युत्तर पदवी (१९४२) या पदव्या संपादन केल्या. त्यानंतर त्यांनी इलिनॉय विद्यापीठातून भौतिकी या विषयातील पीएच.डी. पदवी मिळविली (१९४५). १९४६-५०च्या दरम्यान त्यांनी हंटर येथे भौतिकी विषयाचे अध्यापन केले. १९४७ मध्ये त्यांची ब्राँक्स व्हेटेरन्स ॲडमिनिस्ट्रेशन हॉस्पिटल येथील अणुकेंद्रीय भौतिकी विभागात सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर १९५०─७० पर्यंत तेथेच त्या किरणोत्सारी सेवा विभागाचे भौतिकीविज्ञ आणि मुख्य सहायक म्हणून कार्यरत होत्या. पुढे त्यांनी संशोधक-प्राध्यापक म्हणून सीनाय वैद्यकीय संस्थेत (Mount Sinai Hospital) काम सुरू केले आणि काही वर्षांनी त्यांना या रुग्णालयात अणू औषधांचे प्रमुख करण्यात आले. त्यांना अल्बर्ट लास्कर पारितोषिक मिळाले. यॅलो येशिवा विद्यापीठाच्या (Yeshiva University) ॲल्बर्ट आइनस्टाइन वैद्यकीय महाविद्यालयात विशेष प्राध्यापिका होत्या.
मधुमेह असणाऱ्या लोकांना प्राण्यांपासून मिळविलेले इन्शुलीन दिले असता, शरीरात या इन्शुलीन विरुध्द प्रतिपिंड (अँटीबॉडीज; Antibodies) तयार होतात. कारण हे इन्शुलीन प्रथिन प्राण्यांचे असल्यामुळे शरीर इन्शुलिनाचा स्वीकार करत नाही आणि ते प्रतिजनासारखे (Antigen; अँटीजेन) वागते. या प्रतिजनाला परके समजून शरीर त्याच्या विरुद्ध प्रतिपिंडे तयार करतात. ही प्रतिपिंडे त्या इन्शुलीन प्रथिनाला प्रतिजन समजून निष्प्रभ करतात. त्यामुळे मधुमेह झालेल्या लोकांना दिलेले इन्शुलीन त्यांच्या पेशीपर्यंत पोहोचत नाही, असे यॅलो आणि सॉलोमन ए. बर्सन यांना प्रयोगातून दिसून आले.
यॅलो यांचे १९३ शोधनिबंध प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांना इली लिली पुरस्कार (१९६१), गेर्डनर पुरस्कार (१९७१), कॉख पुरस्कार (१९७२), क्रेसी मॉरिसन पुरस्कार (१९७५), लास्कर पुरस्कार (१९७६) व बँटिंक पदक (१९७८) हे विशेष उल्लेखनीय पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. यांशिवाय त्यांना बारा सन्माननीय डॉक्टरेट पदव्या मिळाल्या. त्यांची नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसच्या सदस्य म्हणून १९७५ मध्ये व अमेरिकन ॲकॅडेमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सेसच्या सदस्य म्हणून १९७८ मध्ये निवड झाली.
यॅलो यांचे न्यूयॉर्क येथे निधन झाले.
संदर्भ :
- https://en.wikipedia.org/wiki/Rosalyn_Sussman_Yalow
- http://www.nobelprize.org/nobel_prizes/medicine/laureates/1977/yalow-bio.html
- http://www.nobelprize.org/nobel_prizes/medicine/laureates/1977/yalow-facts.html
- https://www.encyclopedia.com/people/medicine/medicine-biographies/rosalyn-sussman-yalow
- http://www.nytimes.com/2011/06/02/us/02yalow.html
समीक्षक – रंजन गर्गे
#रेडिओइम्युनोअॅसे #रक्त #संप्रेरक #मधुमेह #वितंचक #जीवनसत्व #औषधीद्रव्य #प्रथिने #विषाणू #Radioimmunoassay #Blood #Harmone #Diabetes #Vitamins #Protein #Enzymes #viruses
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.