इटली-ॲबिसिनिया युद्ध :  (१९३५-३६). इटली-ॲबिसिनिया (इथिओपिया) ह्यांमध्ये झालेले युद्ध. १८९६ मध्ये ॲबिसिनियाच्या सैन्याने आडूवा येथे इटलीच्या सैन्याचा पराभव केला होता. त्यावेळी आपले साम्राज्य आफ्रिकेत वाढविण्याचा इटलीचा प्रयत्न फसला होता. पहिल्या महायुद्धानंतर इटलीने इथिओपियाशी स्नेहसंबंध प्रस्थापित केले आणि त्यास राष्ट्रसंघात प्रवेश मिळण्यास मदत केली. परंतु मुसोलिनीने अधिकारावर आल्यावर हे धोरण बदलून इथिओपिया पंचमस्तंभी कारवायांनी पोखरून काढला.

इटली-इथिओपिया युद्धादरम्यान इटालियन सैनिकांची ट्रकमधून होणारी वाहतूक.

इथिओपिया-सोमालीलँड येथील सीमेवरून इथिओपिया व इटली ह्यांच्या सैन्यामध्ये ५ डिसेंबर १९३४ रोजी चकमक उडाली. इटलीने हा प्रश्न राष्ट्रसंघाकडे नेण्यास नकार दिला. जर्मनीविरुद्ध इटलीचा पाठिंबा मिळविण्यासाठी फ्रान्सने इटलीला इथिओपियात जवळजवळ मोकळीक दिली होती. इथिओपियाच्या सरकारने हा प्रश्न राष्ट्रसंघाकडे सुपुर्द केला. परंतु राष्ट्रसंघाने त्याबाबत दिरंगाई केली. मध्यंतरी लष्करी तयारी पूर्ण करून ३ ऑक्टोबर १९३६ रोजी इटलीच्या सैन्याने इथिओपियावरील स्वारीस सुरुवात केली. राष्ट्रसंघाने इटलीस आक्रमक म्हणून जाहीर केले आणि इटलीविरुद्ध कारवाई करण्यास सुरुवात केली. इटलीच्या सैन्याने ५ मे १९३६ रोजी अदिसअबाबा काबीज केले. राष्ट्रसंघाने इटलीची आर्थिक नाकेबंदी करण्याचा आदेश दिला. इंग्लंड आणि फ्रान्स यांनी सबुरीचे धोरण स्वीकारले. शिवाय राष्ट्रसंघातील सभासद-राष्ट्रांना इथिओपियाविषयी आस्था नव्हती; मात्र जर्मनीच्या वाढत्या वर्चस्वाला आळा घालण्यासाठी त्यांना इटलीच्या सहानुभूतीची आवश्यकता होती. त्यामुळे आर्थिक नाकेबंदीविषयी राष्ट्रसंघातील राष्ट्रे उदासीनच होती. त्याचप्रमाणे तेलपुरवठ्यावर बंधन घालण्यास त्यांची तयारी नव्हती, त्यामुळे आर्थिक नाकेबंदी निष्फळ ठरली. ९ मे १९३६ रोजी इटलीने इथिओपिया आपल्या राज्यात सामील करून घेतल्याची घोषणा केली. ४ जुलै १९३६ रोजी राष्ट्रसंघाने आर्थिक नाकेबंदी उठविल्याची अधिकृत घोषणा केली. ह्यामुळे दुसऱ्या महायुद्धाची पार्श्वभूमी तयार झाली आणि राष्ट्रसंघ ही आंतरराष्ट्रीय संस्था असमर्थ असल्याचे सिद्ध झाले.