भास्करराय : (सु. इ. स. सतरावे ते अठरावे शतक). एक भाष्यकार आणि तंत्रशास्त्रातील श्रीविद्या-संप्रदायाचा अधिकारी व विद्वान. भास्कररायाचा उल्लेख स्वरराय, भास्करानंद, भासुरानंद इ. नावांनीही केला जातो तसेच त्यास ’भास्कररायमखिन्’ असे उपाधीसह संबोधिले जाते. विविध शास्त्रांचा व्यासंग असणा-या भास्कररायास श्रीविद्येचा प्रवर्तक मानले जाते. भास्कररायाने आपल्या काही ग्रंथांमध्ये त्या रचनांच्या काळाचा निर्देश केला आहे. त्यावरून भास्कररायाचा काळ सतराव्या शतकाचा शेवट आणि अठराव्या शतकाचा उत्तरार्ध असा मानता येईल. भास्कररायाच्या जगन्नाथ नामक शिष्याने लिहिलेल्या भास्करविलास  या ग्रंथामध्ये भास्कररायाच्या जीवनाविषयी आणि साहित्यिक योगदानाविषयी माहिती मिळते. विजयनगरातील भागा नावाच्या गावामध्ये भास्कररायाचा जन्म झाला. भास्कररायाच्या वडिलांचे नाव गंभीरराय आणि आईचे नाव कोनमांबा असे होते. गंभीरराय विजयनगरच्या राज्यसभेमध्ये महाभारताचे निरूपण करत. तसेच ते मान्यवर विद्वान होते. भास्कररायाने नरसिंह, गंगाधर वाजपेयिन् अशा गुरुंकडे अठरा विद्या तसेच गौड तर्काचे अध्ययन केले. शिवदत्त गुरु यांच्याकडे श्रीविद्येचे अध्ययन केले. अथर्ववेदाच्या परंपरेच्या रक्षणासाठी भास्कररायाने स्वतः अथर्ववेदावर प्रभुत्व मिळवून अनेकांना अथर्ववेद शिकवला. त्याकाळातील अनेक राजांना भास्कररायाने श्रीविद्येची दीक्षा दिली, असे मानले जाते. भास्कररायाच्या पत्नीचे नाव आनंदी असे होते व भास्कररायाने आपल्या पत्नीलाही श्रीविद्येचे ज्ञान दिले. भास्कररायाने विविध प्रांतांमध्ये प्रवास तसेच अनेक तीर्थयात्रा केल्या. या प्रवासादरम्यान भास्कररायाने अनेक विद्वानांना शास्त्र चर्चांमध्ये हरवले. असेही मानले जाते की, त्याकाळी देवीभागवत महापुराण तसेच रामायणातील अद्भुत कांड भास्कररायामुळॆ लोकप्रिय झाले. अनेक ग्रंथ रचनांबरोबरच भास्कर रायाने आपल्या पत्नीसह अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला तसेच वाराणसी, कोकण, रामेश्वर अशा विविध ठिकाणी नविन मंदिरे बांधली. नंतर तंजावरच्या राजाने बक्षीस म्हणून दिलेल्या भास्कर राजपुरम या गावी भास्कररायाने वास्तव्य केले व तिथून जवळच असणाऱ्या मध्यार्जुनक्षेत्री त्याचे देहावसान झाले. भास्कररायाविषयी अनेक आख्यायिका सापडतात.

जगन्नाथाच्या भास्करविलास  ग्रंथामध्ये भास्कररायाच्या चाळीसहून अधिक ग्रंथांचा उल्लेख आहे. दुर्दैवाने ह्या सर्व रचना आज उपलब्ध नाहीत. भास्कररायाची ग्रंथसंपदा पुढील विषयांनुसार विभागता येते – वेदान्त – चण्डभास्कर, नीलाचलपेटिका; मीमांसा – वादकौतूहल, भाट्टचन्द्रोदय; व्याकरण – वरदराजाच्या मध्यसिद्धांत कौमुदीवरील रसिक रञ्जनीटीका; न्याय – न्यायमण्डन; छन्दःशास्त्र – पिङ्लकृतछन्दसूत्रांवरील छन्दोभास्कर हे भाष्य, छन्दःकौस्तुभ, वृत्तचन्द्रोदय, वार्त्तिकराज, मृतसंजीवनी; काव्य- चन्द्रशाला, मधुराम्ल, भास्करसुभाषित; स्मृति – स्मृतितत्त्व, बौधायन धर्मसूत्रावरील सहस्रभोजन खण्डटीका, शङ्खचक्राङ्कन प्रायश्चित्त, एकादशीनिर्णय, प्रदोषनिर्णय, तृचभास्कर, कुण्डभास्कर ; स्तोत्र – शिवस्तव, देवीस्तव, शिवदण्डक, शिवाष्टोत्तरशतनामस्तोत्र व्याख्या; तंत्र – गणपतिसहस्रनामावरील चन्द्रलाम्बा माहात्म्य टीका, नाथनवरत्नमालामञ्जुषा, भावनोपनिषद्भाष्य, श्रीसूक्तभाष्य, कौलोपनिषद्भाष्य, त्रिपुरोपनिषद्भाष्य, ललितासहस्रनामावरील टीका सौभाग्यभास्कर, सौभाग्य रत्नाकरावरील सौभाग्य चन्द्रोदय ही टीका, प्रकाशटीकेसह वरिवस्यारहस्य, त्रिपुरासुन्दरीबाह्यवरिवस्या, परशुरामकृत कल्पसूत्रावरील रत्नालोकटीका, दुर्गासप्तशतीवरील गुप्तवतीटीका, षट्श्लोकी, मालामन्त्रोद्धार, वामकेश्वर तन्त्राच्या काही भागावरील सेतुबन्धटीका; वैदिक- वैदिककोश. या ग्रंथांव्यतिरिक्त भास्कररायाच्या ग्रंथांची काही हस्तलिखितेही सापडतात, जसे सिद्धान्त कौमुदीवरील विलास ही टीका आणि मीमांसेवरील मत्वर्थलक्षणाविचार.

भास्कररायानी विविध शास्त्रविषयक लिखाण केले असले तरी तंत्रशास्त्रामध्ये त्याचे मौलिक योगदान आहे आणि श्रीविद्यापरंपरेमध्ये भास्कररायाला उच्चतम स्थान आहे. देवीवरील प्रस्थानत्रय म्हणजे वरिवस्यारहस्य, ललितासहस्रनामभाष्य आणि सेतुबन्ध ह्या भास्कररायाच्या तीन रचना त्यातील तत्त्वज्ञानामुळे श्रेष्ठ मानल्या जातात. भास्कररायाचे तंत्रावरील ग्रंथ शाक्त संप्रदायाच्या तसेच श्रीविद्या ह्या ज्ञानशाखेच्या गूढतत्त्वांची उकल करण्यास आणि त्यांचे सखोल अध्ययन करण्यासाठी प्रमाण आहेत.

संदर्भ:

• Sastri, S. S., Varivasyā-rahasya, Madras, 1976.

• Sastri, R. A., Lalitāsahasranāma, Madras, 1988.

समीक्षक : ग. उ. थिटे