प्राचीन काळापासून भारतात लढाया होत आल्या आहेत. इ.स.पू. १००० ते इ.स.पू. ४०० वर्षांपर्यंत भारतात छोटीछोटी राज्ये, टोळ्या आणि जमाती होत्या. त्यांच्यात वारंवार युद्धे होत असत. आर्यांच्या आगमनापूर्वी भारतात पायदळ आणि हत्तीदळ (गजदळ) यांचाच फक्त वापर होत असे. आर्य भारतात आल्यावर घोड्यांचासुद्धा वापर सुरू झाला. मौर्यसाम्राज्यपूर्व काळात लढायांमध्ये पायदळ, अश्वदळ, रथदळ आणि हत्तीदळ यांचा वापर होत असे.

स्वतः राजा सरसेनापती म्हणून लढाईत सैन्याचे नेतृत्व करत असे. त्याच्या हाताखाली एक सेनापती आणि प्रत्येक दलाचा अधिपती असे. दोन्ही बाजूंची सैन्यदले एकमेकांस सामोरे जाऊन लढत असत. सर्वसाधारणपणे सूर्योदयाला लढाई सुरू होऊन सूर्यास्ताला संपत असे. त्या काळात रात्रीच्या लढाया, तसेच गनिमीकाव्याच्या लढाया होत नसत. दोन्ही बाजूंची सैन्य वेगवेगळ्या विशिष्ट प्रकारच्या व्यूहरचना करीत असत.

आरंभीच्या काळात पायदळातील सैनिक (साधा शिपाई) हे उघड्या अंगाने लढाईच्या मैदानात उतरत असत, असा उल्लेख आहे. पायदळाचा उपयोग शत्रूच्या पायदळाविरोधात लढाई करण्यासाठी त्याचबरोबर रथांच्या आणि हत्तींच्या संरक्षणासाठी मुख्यत्वेकरून केला जात असे. पायदळातील सैनिक चिलखते वापरीत नसत. ग्रीकांच्या स्वार्‍यांनंतर पायदळात चिलखतांचा वापर सुरू झाला. पायदळाचे सैनिक तलवारी आणि जनावरांच्या कातड्यापासून बनविलेल्या ढाली वापरत असत.

घोडदळाचा वापर शत्रूवर वेगाने हल्ला करून त्याच्या सैन्याची वाताहात करण्यासाठी केला जात असे. घोडेस्वार तलवारी, भाले आणि क्वचित गोफण वापरत असत. घोडदळाचा काही भाग राखीव सैन्य म्हणून ठेवला जाई. ऐन मोक्याच्या वेळी हे राखीव सैन्य शत्रूवर तुटून पडत असे.

रथांचा वापर एक उंच मंच म्हणून केला जात असे. त्यावर ५ ते ६ योद्धे आरूढ होऊन वेगवेगळ्या शस्त्र व अस्त्रांनी शत्रूवर हल्ला करीत असत. रथांच्या चाकांवर तीक्ष्ण आकडे बसविले जात असत, ज्यांमुळे शत्रुसैन्यावर हल्ला चढविताना शत्रूचे सैनिक जायबंदी होण्यास मदत मिळत असे. रथ हे शत्रुसैन्यावर चाल करण्यासाठी आणि शत्रुसैन्याची घडी विस्कळीत करण्यासाठी उपयुक्त साधन होते.

हत्तीदळ हे शत्रुसैन्यावर चाल करण्यासाठी वापरात येणारे साधन असे. हत्तींच्या पायांखाली आणि सोंडांच्या फटकाऱ्याने शत्रुसैन्याची हानी करणे हे लढाईचे एक तंत्र होते. हत्तींच्या सोंडांवर आणि गंडस्थळांवर धातूची कवचे चढविली जात असत. रथावरील आणि हत्तीवरील योद्धे बांबू आणि वेत यांपासून बनविलेली ६ फूट उंचीची धनुष्ये आणि बाण वापरीत असत. बाणांना लोखंडी टोके असत. बाणांची टोके सर्पाच्या विषात भिजविण्याची प्रथासुद्धा प्रचलित होती. भालेसुद्धा बांबूपासून बनविलेले असत. त्यांची टोके धातूची असत. रथावरील आणि हत्तींवरील योद्धे दोर्‍यांच्या फासाचाही वापर करीत असत.

कधीकधी जखमी हत्ती स्वतःच्याच सैन्यात धुमाकूळ घालीत. अलेक्झांडरच्या सैन्याने पौरव राजाच्या सैन्यातील हत्तींना जखमी केल्यामुळे त्या हत्तींनी स्वतःच्याच सैन्याची हानी केली, असे इतिहासात नमूद केले आहे. कालांतराने हत्तींचा वापर फक्त नदी पार करण्यासाठी आणि सेनापतीला किंवा राजाला लढाईची प्रगती पाहण्यासाठीच केला जाऊ लागला.

अलेक्झांडरच्या सैन्याला पौरव राजाच्या सैन्याने झेलम नदीकिनारी अडवून धरले होते. अलेक्झांडरच्या मुख्य सैन्याने रात्रीच्या अंधारात नदीचा उतार पाहून नदी ओलांडली आणि पुरु राजाच्या सैन्याच्या एका बाजूने लढाईला तोंड फोडले. पौरवाच्या सैन्याने आपला मोहरा वळविल्यावर अलेक्झांडरच्या उर्वरित सैन्याने नदी ओलांडली आणि पौरवाच्या सैन्याला सापळ्यात पकडले. भारतात लढाईचा हा व्यूह (मोहरा) नवीन होता. त्यानंतर मौर्य काळात या व्यूहरचनेचा वापर केला गेला.

काही ऐतिहासिक नोंदींनुसार राजे लढाईची कुणकुण लागल्यावर आयत्या वेळी सैन्याची उभारणी करीत असत. कायमस्वरूपी सैन्यदल फारच कमी असे. शत्रू आक्रमणाची तयारी करत आहे याबाबत बातमी मिळाल्यावर सैन्याची जमवाजमव सुरू होत असे. परंतु इ.स. ५०० नंतर लढायांचे प्रमाण इतके वाढले की, बहुतेक राज्ये कायमस्वरूपी सैन्य ठेवू लागली.

संदर्भ :

  • कदम, य. ना. समग्र भारताचा इतिहास, कोल्हापूर, २००३.
  • http://ancientmilitary.com/ancient-india-military.htm

                                                                                                                                                                      समीक्षक : सु. र. देशपांडे