सर्व पृष्ठवंशी प्राण्यांच्या तोंडात (मुखगुहिकेत) स्नायूयुक्त जीभ असते. काहींमध्ये जीभ चल म्हणजे हलणारी, तर मासे व व्हेल यांमध्ये अचल असते. विविध प्राण्यांमधील जिभेच्या कार्याप्रमाणे तिची लांबी व त्यावरील ग्रंथी यांमध्ये बदल होतो. जिभेचा ८०% भाग ऐच्छिक स्नायूंनी बनलेला असतो. मानवी जिभेमध्ये असलेल्या आठ बाह्य व आठ अंतस्थ स्नायूंमुळे जीभ आत-बाहेर तसेच वर-खाली वळवता येते. स्नायूंच्या भोवती असलेल्या संयोजी ऊती (Connective tissue) थरावर श्लेष्मल आवरण (Mucosa) असते. या आवरणामध्ये ग्रंथी, रुचिकलिका व लाळ ग्रंथी असतात.
मानवी जीभ ही तोंडाच्या पोकळीच्या (मुखगुहिकेच्या) तळाशी असते. जिभेच्या पुढील बाजूच्या सुमारे दोन तृतीयांश मोकळ्या (Oral) जिभेस ताळूकडील (तालुभाग) आणि मागील बाजूस सुमारे एक तृतीयांश इतका घशाकडील (Pharyngeal) भाग जोडलेला असतो. दोन्ही भाग जिभेवरील एका उलट्या इंग्रजी ‘V’ अक्षरासारख्या खाचेने (अंतिम सीमा खाच, Terminal sulcus) वेगळे ओळखू येतात. जिभेचा पुढील भाग तोंडामध्ये दात आणि हिरड्या यांचेपासून सुटा असल्याने जिभेची हालचाल अतिशय सुलभतेने होते. जीभेच्या मुळाकडील बाजू खालच्या जबड्याच्या (अधोहनु) अस्थी व घशाच्या स्नायूंनी वेढलेल्या एका सुट्या अस्थीशी (कंठास्थीशी, Hyoid bone) स्नायूंनी जोडलेली असते. जिभेच्या मध्यभागी असलेल्या उभ्या तंतुमय ऊतींमुळे (Fibrous tissue) जिभेचे डाव्या आणि उजव्या भागांत विभागणी होते. जिभेच्या मध्यावर एक उभी खाच असते, तिला मध्य खाच म्हणतात.
जिभेच्या वरील बाजूस जिव्हापृष्ठ (Dorsum) म्हणतात. या भागावरील मध्यरेषेव्यतिरिक्त इतर सर्व भागांवरील अंकुरामध्ये (Papillae) रुचिकलिका किंवा चव ग्रंथी असतात. अन्नाच्या चवीची जाणीव करून देणाऱ्या पेशींचा गोलाकार समूह म्हणजे रुचिकलिका होय. अंकुरकांच्या रचनेप्रमाणे त्यांचे पानासारखे (पार्णिल), छत्राकार व एका कडेस असणाऱ्या परिवृत्त असे प्रकार पडतात. जिभेच्या विशिष्ट भागावर असणाऱ्या रुचिकालिका वेगेवेगळ्या चवीची जाणीव करून देतात अशी वैज्ञानिकांची समजूत होती. त्यानुसार जिभेच्या टोकाकडे गोड, मागील बाजूस कडवट, दोन्ही बाजूस आंबट व खारट चव समजते असे वाटत होते. परंतु, आता संशोधनाने सर्व चवींची जाणीव जिभेच्या पृष्ठभागावर सगळीकडेच होते असे सिद्ध झाले आहे. चव ग्रंथीमध्ये आधारक आणि संवेदक अशा दोन प्रकारच्या पेशी असतात. यांची रचना संत्र्याच्या फोडींप्रमाणे असून त्यांची पोकळी एका नलिकेद्वारे ग्रंथीवर उघडते. चव ग्रंथीना पुरेसा रक्तपुरवठा होतो. या ग्रंथीच्या आतील टोकाभोवती चेतापेशींचे जाळे असते. जेव्हा अन्नपदार्थ चावले जातात तेव्हा त्यामध्ये लाळ मिसळते. लाळेत मिसळलेले अन्न जिभेवर पसरते व चव ग्रंथीपासून मेंदूपर्यंत अन्नाची चव पोहोचवली जाते. लाळेमध्ये न विरघळल्या जाणाऱ्या पदार्थांची चव समजत नाही.
जिभेला रक्तपुरवठा जिव्हा धमनीमधून (Artery) होतो. घशास रक्तपुरवठा करणाऱ्या शिरेची (Vein) एक शाखा जिभेतील रक्त गोळा करते. अन्न चावण्यास मदत करणे (Mastication), अन्नाचा घास बनवणे (Bolus formation), गिळणे (Swallowing), मुख्यत: अन्नाचा स्वाद ओळखणे, दातांवर चिकटलेले अन्नकण बाजूला काढून दातांची स्वच्छता करणे तसेच शब्दोच्चारांमध्येही जीभ महत्त्वाची भूमिका बजावते. जिभेच्या खाली अनेक रक्तवाहिन्यांचे जाळे असते. त्यामुळे काही औषधे जिभेखाली ठेवल्यास त्याचा त्वरित परिणाम होतो. उदा., हृदयविकार झाल्यावर होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी दिले जाणारे सॉर्बिटॉल जिभेखाली ठेवल्यास त्याचा काही सेकंदात परिणाम होतो. जीभ तोंडात स्त्रावणाऱ्या लाळेमुळे सतत ओलसर राहते. ताप, काही आजार, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे अशा आजारांचे निदान जिभेचा पोत (Texture) पाहून करता येते.
पहा : जीभ; दंतधावन व जिव्हानिर्लेखन; रुचि; शारीर, आयुर्वेदीय (रसनेंद्रियाधिष्ठान); स्वाद.
संदर्भ :
- https://en.wikipedia.org/wiki/Tongue
- Gray’s anatomy
समीक्षण : नंदिनी देशमुख