दासरथी रंगाचार्य : (२४ ऑगस्ट १९२८ – ८ जून २०१५ ).भारतीय साहित्यातील विख्यात तेलुगू साहित्यिक आणि नेते. तेलंगना चळवळीचे अग्रणी, हैद्राबादच्या निझामाच्या हुकूमशाही, दडपशाही विरूद्ध बंड करणारे, सशस्त्र सेनेत हैद्राबाद स्वतंत्र होईपर्यंत कार्य करणारे नेते म्हणून ते प्रसिद्ध आहेत. तेलंगणा राज्यातील खम्मम जिल्ह्यातील चिन्ना गुहूर (तत्कालीन वारंगल जिल्हा) या गावात त्यांचा जन्म झाला. रंगाचार्यांच्या वंशावळीवर रामायणाचा प्रभाव आहे.दासरथी म्हणजे दशरथ पुत्र (श्रीराम). त्यांच्या आडनावाबद्दल एक आख्यायिका आहे.त्यांचे पूर्वज हजार वर्षांपूर्वीचे असून ११ व्या शतकातील भागवद रामानुज बरोबरच्या शिष्यांपैकी ते होते.
दासरथी तेलंगनात वैष्णव पंथाच्या प्रचारासाठी रामानुजच्या इच्छेसाठी स्थिरावले. दासरथी वंशातील माणसे विद्वान, भक्त व शिष्य आहेत. भद्रचलम येथील श्री रामचंद्रच्या भक्तीत उत्साहाने सामील होणारे व पुजाविधी करणारे आहेत. श्री. व्यंकटचार्य हे रंगाचार्यांचे आजोबा तर्कशास्त्रातील विद्वान म्हणून तत्कालीन राजवंशाकडून गौरविले होते. त्यांचे वडीलही संस्कृतचे पंडीत होते. त्यांचे वडिल बंधू कृष्णम्माचार्य आधुनिक काळातील प्रसिद्ध कवी होते. रंगाचार्य त्यांच्या आईकडून बालपणीच व्याकरण व छंदशास्त्र शिकले होते. त्यांचा विवाह कनला यांच्याशी झाला
रंगाचार्याचे ६ वी पर्यंतचे शिक्षण खम्मम येथे झाले. ६ व्या वर्गात असताना म्हणजेच १२ व्या वर्षी निजामाने शालेय विद्यार्थ्यासाठी विशिष्ट गणवेशाची सक्ती केली होती.त्यामुळे निजामाच्या हुकुमशाही निर्णयाविरुद्ध विद्यार्थ्यांचा बंद घडविला. त्यासाठी त्यांना शाळेतून निष्कासित केले व संस्थानातील कुठल्याही शाळेत प्रवेशबंदी लावण्यात आली. वयाच्या १६ व्या वर्षी निजामविरोधी लढा तीव्र होत असताना रंगाचार्यही सक्रिय झाले. सशस्त्र सेनेत भाग घेतला म्हणून त्यांना पोलीस कारावासात राहावे लागले. बालवय असल्याने त्यांना शिक्षा न होता त्यांची सुटका झाली. १९४८ ला भारत सरकारची निजामविरुद्ध पोलीस कारवाई झाल्यावर हैद्राबाद संस्थानाचे विलिनीकरण झाले. तेव्हा रंगाचार्य यांना हैद्राबाद महानगरपालिकेच्या सिकंदराबाद ग्रंथालयात नोकरी लागली. तेथे ३२ वर्षे त्यांनी सेवा केली. तत्पूर्वी त्यांनी शिक्षकी पेशातही कार्य केले होते. नोकरी करता करता प्रयत्न व चिकाटीने त्यांनी बी. ए. आणि एल. एल. बी. च्या पदव्या संपादन केल्या. सेवेत त्यांच्या पदोन्नती मिळत राहिल्या.ते उपायुक्त या पदावरून सेवनिवृत्त झाले.
वयाच्या चाळीशीत त्यांच्या सर्जनशील लिखाणाचा आविष्कार चिल्लारा देवूलू (१९६९) या पहिल्या कादंबरीच्या रूपाने झाला. ह्या कादंबरीने तेलगू वाचकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवले. ह्या कादंबरीला आंध्रप्रदेश साहित्य अकादमी पुरस्कार (१९७०) प्राप्त झाला होता. त्यांचे लेखनकार्य पुढीलप्रमाणे : कादंबरी – चिल्लारा देवूलू (१९६९),मोडूगू पुल्लू (१९७१),माया जलातरू (१९७३),रानुनंदी इदी निजाम (१९७४),जनपदम (१९७६), सरतलपम (१९७८),पावनी ; कथासंग्रह – नल्लानगु,रानारंगम (१९६७),केरातलु ; कवितासंग्रह – जनरंगम (१९६७),रणभेरी ; समीक्षा- परिशीलन,अक्षरमंदाकिनी, कलम बोम्मलु,वेदिका;अनुवाद – उमराव जान अदा,केदारम,तेलुगु अफसाना,सोनार बांगला नातीकलु इत्यादी. त्यांचे आत्मचरित्र जीवनऱ्यानम जीवोतम हे होय तर यात्रा जीवनम हे त्यांचे प्रवासवर्णन आहे. ते तेलुगू, उर्दू व हिंदी भाषेचे जाणकार असल्याने त्यांनी काही प्रमुख साहित्याचे भाषांतरेही केलेली आहेत. १९६२ च्या भारत चीन युद्ध प्रसंगी त्यांनी कवितांचे संपादनही केलेले आहे. रामायण, महाभारत या महाकाव्यांचा अनुवादही त्यांनी तेलुगूत केला आहे. तेलुगूत चार वेद व उपनिषदांचेही अनुवाद त्यांनी केले आहेत. बालवाङ्मयातही रंगाचार्यांनी साहित्य निर्माण केले आहे.
मोडूगू पुल्लू या त्यांच्या कादंबरीत तेलंगणातील जागीरदारांच्या अंमलाखालील दु:खचित्रण केले आहे. जनपदम (१९७६) या कादंबरीत तेलंगणातील १९४८-६० मधील राजकीय, आर्थिक व सामाजिक जीवन वर्णन केले आहे. तिचे दोन खंड प्रकाशित आहेत. त्यांची चौथी कादंबरी रानुनंदी इदी निजाम ही आशावादी व आदर्शवादी जीवनपद्धतीचे विवेचन करते. त्यांच्या सरतालपम, माया जलातरु आणि पावनी जातव्यवस्थेच्या उथळपणाचे दर्शन घडवितात.
रंगाचार्यांचे साहित्यिक काम हे विविध साहित्य प्रकारांत झालेले आहेत. पारंपारिकता व आधुनिकता यांना जोडणारा समन्वयवादी सेतू म्हणजे रंगाचार्य यांचे साहित्य होय. आदर्शवादी समाजरचनेचे कार्ल मार्क्स व म. गांधी यांनी भिन्न मार्ग निर्देशित केले असले तरी त्यांच्या उद्दिष्टांत विरोधाभास नव्हता असे रंगाचार्यांचे मत होते. आधुनिक तेलुगू साहित्याचा कालखंड १०० वर्षांपूर्वीचा आहे. ह्या इतिहासात साहित्यप्रकारातील कादंबरी या प्रकाराने वाचकांचे मोठे वर्तुळ निर्माण करून लोकप्रियता प्राप्त केली आहे. इतर साहित्य प्रकारांच्या तुलनेत त्यांची कादंबरी खास शैली, कल्पनाशकती, वर्णने, योजनाबद्ध प्रसंग सादर करण्याची क्षमता, समकालीन मांडणीने समृद्ध आहे. दासरथी रंगाचार्य प्रतिभावंत कादंबरीकार म्हणून विख्यात आहेत. ते वैष्णव पंथाचे वंशपरंपरेचे समर्थक व प्रचारक आहेत. सीतापरिचय या रुपात त्यांनी वाल्मीकी रामायणाची महागीत रचना केली आहे.
रंगाचार्यांच्या साहित्याबाबतचा विश्वास असा होता की साहित्यातून बंडखोर चळवळी निर्माण होत नाहीत. उलट ह्या क्रांतीकारी/बंडखोर चळवळींतून उच्च दर्जाच्या साहित्याचा जन्म होतो. रंगाचार्यांच्या कादंबरींचा मुख्य आशय हा तेलंगणातील चळवळींच्या अवतीभोवती फिरतो. हैद्राबाद स्वातंत्र्यपूर्वीच्या व नंतरच्या दोन दशकातील सामान्य जीवन, क्रांतीकारी प्रवाह, अधिकारी, सत्ताधाऱ्यांची दडपशाही व खोटारडेपणा त्यांनी मांडला आहे. जिवंत पात्र, प्रसंग, परिस्थिती त्यांच्या कादंबरीत आढळतात. जे वाचकांच्या हृदयाजवळ जातात. ग्रामीण जीवन, व्यक्तीरेखा मांडत त्यांनी कादंबरीतून सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक पैलूंना न्याय दिला आहे. शहरीकरण व औद्योगिकरणाचे परिणाम यांसह सशस्त्र क्रांती, तिचे यश-अपयश, हिंसक प्रयत्न इ. मर्यादांवरही त्यांनी कादंबरीत चित्रण केले आहे.
त्यांच्या साहित्य योगदानाबाबत त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. आंध्रप्रदेश साहित्य अकादमी पुरस्कार (चिल्लारा देवूलू, १९७०), गुरसडा पुरस्कार, विशाखापट्टणम (१९९७), युवा कलावाहिनी अक्षरा वाचस्पती पुरस्कार (१९९९), अन्नपूर्णा गोजपेंडारा पुरस्कार, विजयवाडा (२००१), सिद्धार्थ पुरस्कार, विजयवाडा (२००१), पोट्टी श्रीरामलू तेलूगू विद्यापीठ विशेष सन्मान (२००१), अण्णाभैय्या अध्यात्मिक आंध्ररत्न पुरस्कार (२००४), आंध्रप्रदेश राज्य हंसा पुरस्कार (२००६), आंध्रप्रदेश राज्य प्रतिभा सन्मान (२००९) इत्यादी पुरस्कारांचा त्यात समावेश आहे.
संदर्भ : http://sahitya-akademi.gov.in/library/meettheauthor/dasarathi_rangacharya.pdf