नन्ने चोड : (बारावे शतक). प्रसिद्ध तेलुगू कवी. तेलुगू साहित्येतिहासकारांनी त्याला ‘कविराजशिखामणी’ या नावाने गौरविले आहे. तो वेलामती चोड घराण्याचा राजकवी होता. काही अभ्यासकांच्या मते तो स्वतःच राजघराण्यात जन्मला होता. पाकनाडू येथील चोलवंशी राजा चोडबल्ली हे त्याचे वडील. त्याच्या काळाविषयीही एकमत नाही तथापि तो बाराव्या शतकाच्या आरंभी म्हणजे नन्नय आणि तिक्कन्न यांच्या मधील काळात होऊन गेला असावा, हे मत सामान्यतः ग्राह्य मानले जाते. बिज्जलाने ११६२ मध्ये चालुक्य साम्राज्य बळकाविले. त्याचा मंत्री बसवेश्वर याने वीरशैव मतास जोराची चालना दिल्यानंतर शिवभक्ती, देशभाषा आणि देशी छंद यांना साहित्यात महत्त्वपूर्ण स्थान मिळाले. शैव कवींत नन्नेचोडला आद्यस्थान आहे. देशी शैलीचा आद्य प्रणेता आणि कुमारसंभव या प्रबंधकाव्याचा (महाकाव्याचा) कर्ता या नात्याने त्याचे स्थान प्राचीन तेलुगू साहित्यात महत्त्वाचे आहे.
त्याच्या कुमारसंभव या काव्यात धनुर्विद्या, आयुर्वेद, गजपरीक्षा आणि इतर कलाविद्यादिकांचा उल्लेख येतो. यावरून तो बहुश्रुत होता. त्याने कालिदास व उद्भट यांच्या प्रसिद्ध कृतींचाच हा अनुवाद स्वतंत्र पद्धतीने केला. त्याने आपले हे काव्य आपला गुरू श्रीशैलम् येथील जंगम मल्लिकार्जुनदेव शिवयोगी यास अर्पण केले आहे. मल्लिकार्जुनदेव शिवयोगी हा एक महापंडित होता. आपल्या काव्यात तो अन्य कुणाही तेलुगू पुर्वसूरी कवींचा उल्लेख करीत नाही मात्र वाल्मीकी, कालिदास, उद्भट, भारवी या संस्कृत कवींचा उल्लेख करून त्यांचे ऋणही मान्य करतो. बारा पर्वे व सु. २,००० पद्ये असलेल्या या चंपू शैलीतील ग्रंथात शृंगार आणि वीर या रसांचा परिपोष साधला आहे. रतिमन्मथ प्रसंग स्वतंत्रपणे रंगविला आहे. यातील तारकासुरवधाच्या प्रसंगीचे युद्धवर्णन तर तिक्कन्नासही अनुकरणीय वाटले असावे. त्याची निसर्गवर्णने आणि व्यक्तिचित्रणे प्रभावी आहेत. कल्पनावैभव, भावमाधुर्य व तत्कालीन आचारविचारांचे प्रतिबिंब या दृष्टीने पाहता या पहिल्या प्रबंधकर्त्याची प्रतिभाशक्ती समर्थ वाटते. शिष्टू रामकृष्णशास्त्री या समीक्षकाने नन्नेचोडास कालिदासतुल्य मानले आहे.
नन्ने चोडने लोकव्यवहारातील भाषा आणि वाक्प्रचार यांचाच आपल्या रचनेत उपयोग केला. तमिळ आणि कन्नड भाषांतील तत्कालीन उपलब्ध वाङ्मयाचे अनुकरणही त्याने केलेले दिसते. बंधकविता (एक तेलुगू काव्यप्रकार), विविध वृत्ते आणि शब्दार्थालंकारांचा उपयोग त्याने आपल्या काव्यात कौशल्याने केला आहे. त्याच्या ग्रंथांतील गद्यही कर्णमधुर आहे, हे विशेष होय. नन्नेचोडच्या शैलीचा उत्कृष्ट पुरस्कार पाल्कुरिकी सोमनाथाने केला.
संदर्भ :
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.