अली सरदार जाफरी : (२९ नोव्हेंबर १९१३ – १ ऑगष्ट २०००). भारतीय साहित्यातील प्रसिद्ध उर्दू साहित्यिक. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील बलरामपूर येथे झाला. १९३३ मध्ये त्यांनी अलिगढ मुस्लिम युनिवर्सिटीमध्ये प्रवेश घेतला ; परंतु त्यांची कम्युनिस्ट विचारसरणीमुळे राजकीय कारणास्तव १९३६ मध्ये त्यांना विद्यापीठातून निष्कासित करण्यात आले होते. पुढे १९३८ मध्ये त्यांनी दिल्ली विद्यापीठातील जाकिर हुसेन महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे धनी अली सरदार जाफरी यांनी व्यक्तीस्वातंत्र्यासाठी आपल्या लेखणीचा पुरेपुर उपयोग केला. त्यांनी साहित्य लेखनाबरोबरच स्वातंत्र्य चळवळीत सक्रीय सहभाग घेतला तसेच स्वातंत्र्यप्राप्तीनंरतही समाजसेवेचे व्रत घेतले.
१९३६ मध्ये त्यांनी लखनौमधील प्रगतीशील लेखक चळवळीच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविले. २० जानेवारी १९४९ ला तेव्हा प्रतिबंधित केलेल्या प्रगतीशील उर्दू लेखकांच्या परिषदेचे आयोजन केल्याबद्दल मुंबईचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या आदेशावरुन त्यांना अटक झाली होती. १९३९ मध्ये ते प्रगतीशील लेखक चळवळीला समर्पित नियतकालिक नया अदाबचे सहसंपादक म्हणून त्यांनी कार्य केले. अग्रगण्य उर्दू साहित्यिक गुफत्गू यांचे ते संपादक आणि प्रकाशक होते. त्यांच्या साहित्य वृत्तीवर जोश मलिहाबादी, जिगर मोरादाबादी आणि फिराक गोरखपुरी या उर्दू लेखकांचा प्रभाव होता. १९३८ मध्ये मंजिल नावाचा लघुकथा संग्रहाचे प्रकाशन झाले. येथूनच त्यांच्या साहित्य क्षेत्रातील कार्याचा प्रारंभ झाला. अली सरदार जाफरी यांचे साहित्य : काव्यसंग्रह – परवाज (१९४३), धर्ती के लाल (१९४६), नई दुनिया को सलाम (१९४८), खून की लकिर (१९४९), परदेसी (१९५०), अमन का सितारा (१९५०), एशिया जाग उठा (१९५१), पत्थर की दिवार (१९५३), एक ख्वाब और (१९६४), पैरहान -इ – शहर (१९६५), लहू पुकारता है (१९७८); ललितलेखन – मंजिल (१९३८), तरक्की पसंद अदब (१९५३), लखनौ की पांच राते (१९६५) यांचा समावेश होतो. कबीर, मिर्झा गालिब आणि मीराबाई यांच्या साहित्याचे संपादन, समीक्षण आणि अनुवाद कार्यही त्यांनी केले आहे. त्यांनी इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन (आयपीटीए) साठी दोन नाटकेही लिहिली आहेत.
भारताचा स्वातंत्रलढा आणि त्याचबरोबर साम्यवाद या दोन तत्त्वांनी त्यांची कविता भारलेली आहे. प्रेम, करुणा आणि मानवी संवेदन हे त्यांच्या कवितेचे प्रधान सूत्र आहे. राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेप्रती ते कुठल्याही पातळीवर सहानुभूती बाळगत नाहीत. तह करून बक्षिशी मिळविण्यापेक्षा असेल तर शेवटच्या क्षणीही समरांगणावर श्लोक पठण करून जगण्याची धडपड करावी, ही त्यांची काव्यभूमिका आहे. त्यांच्या साहित्यिक योगदानासाठी त्यांना विशेष पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. साहित्य अकादमी पुरस्कार, मक्खदूम सन्मान, फैज मोहम्मद फैज सन्मान, इक्बाल सन्मान, संत ज्ञानेश्वर पुरस्कार (महाराष्ट्र), पदमश्री (१९६७), ज्ञानपीठ पुरस्कार (१९९८) इत्यादी पुरस्कारांचा त्यात समावेश आहे. अलिगड़ मुस्लिम विद्यापीठातर्फे डि – लिट ही पदवी त्यांना प्रदान करण्यात आली होती.
संदर्भ :
- http://sahitya-akademi.gov.in/library/meettheauthor/ali_sardar_jafri.pdf