वचन साहित्य : भारतीय साहित्य परंपरेतील कन्नड जीवनवादी साहित्य. कर्नाटकातील कन्नड भाषेची साहित्य परंपरा अगदी प्राचीन  आहे. आठशे वर्षांपूर्वी म्हणजे इ. स. बाराव्या शतकात निर्माण झालेल्या वचन साहित्य प्रकाराने या प्राचीन व दीर्घ परंपरेत सर्वोच्च स्थान मिळविले आहे. तत्पूर्वी संस्कृत-प्राकृत पुराण ग्रंथाचे अनुवाद व त्यासोबत त्यांची जैन मतानुसार झालेली मांडणी असे कन्नड लिखित साहित्याचे स्वरूप होते. मौखिक परंपरेतून आलेले ‘रगळे’ किंवा ‘चंपूकाव्य’ जे  लिखित परंपरेतून विकसित झाले, हे कन्नड साहित्यातील आद्य साहित्यप्रकार मानता येतील. काही संशोधकांचे मत आहे की पुढे अस्तित्वात आलेला वचन साहित्य हा प्रकार त्याच्या स्वरूपावरून चंपू काव्यातील दोन पद्यामध्ये जो गद्य भाग असायचा, त्याच्या अनुकरणातून विकसित झाला असावा; परंतु एकूण वचनाचा व त्यांच्या शैलीचा विचार करता हे मत फारसे गाह्य धरले जात नाही. अनेक शैव संतांद्वारा वेळोवेळी सांगितली गेलेली वचने हेच वचन साहित्य होय. कन्नडमध्ये वचन साहित्याला वचनशास्त्र म्हटले जाते.

१२ व्या शतकात उदयास आलेल्या शरण किंवा लिंगायत चळवळीतून वचन साहित्याचा उदय व विकास झाला. शरण चळवळ ही केवळ भक्तिपरंपरा नाही ती एक समताधिष्ठित, श्रमनिर्भर अशी जीवन पद्धती असल्यामुळे तिचे केवळ ‘पंथ’ असे स्वरुप न राहता ती ‘धर्म’ म्हणून प्रस्थापित झाली. जीवन जगण्याच्या दृष्टी व मानदंडामुळे साहित्याला इतर भक्तिपरंपरेतील परमेश्वराची प्रार्थना व आळवणी करणाऱ्या साहित्याचे केवळ स्वरूप राहिले नाही. जीवन जगण्याचे, त्यातून निर्माण होणारे व्यक्तिगत, कौटुंबिक व सामाजिक व्यवहार, या व्यवहारासाठी लागणारी नैतिक मूल्ये, शोषण आणि पराधिनता त्यांना नकार देणारी समता व श्रमप्रधान वृत्ती या साऱ्यांचे थेट प्रतिपादन व आग्रह या वचनसाहित्यातून दिसतो. त्यामुळे वचनामधून दुःख मुक्तीसाठी, समस्या सोडविण्यासाठी देवाला आळवणी केलेली दिसत नाही. उलट सर्वांनी चर्चा करून निरामय समाजासाठी व आदर्श जगण्यासाठी जी जीवनमूल्ये सर्वानुमते म्हणजे ‘अनुभव मंटप’ द्वारा निर्धारित केलेली जीवनमूल्ये आपण पाळली नाहीत तर, तो परमेश्वर आपल्याला हसेल, आपल्याला लाथाडेल अशी भीती व्यक्त करतात.  एम. एम. कलबुर्गी यांनी ‘सुंदर आचरणाची सुंदर अभिव्यक्ती म्हणजे वचन’ अशी वचनांची व्याख्या केली आहे.

वचन साहित्याला आठशे वर्षांचा इतिहास आहे. वचन निर्मितीच्या प्रारंभकाळी वचनांना ‘सुक्ती’ म्हणून संबोधले जायचे.कन्नड संस्कृतीत शैवसंतांना शिवशरणरू म्हटले जाते. जेडर दासिमैयाँ व अजगण्णा हे बसवण्णाचे पूर्वसुरीचे शरण मानले जातात. यांनी दोन-चार जणांच्या आपल्या समानशील गटांमध्ये ‘सत्संग’ करीत त्यातून तीन ओळींच्या (त्रिपदी) ज्या रचना केल्या त्यांना सुक्ती किंवा वचनांचे प्राथमिक रूप म्हटले जाते. शरण आपापसात संवाद करून, त्या मंथनातून जीवनादर्श म्हणून जी मूल्ये निश्चिती करीत तेच पुढे वचन म्हणून ओळखले जाऊ लागले. याचाच अर्थ वचन म्हणजे आपल्या अनुभवाच्या जोरावर व्यक्त केलेले प्रतिज्ञापत्रच होय. अनुभव मंटप अस्तित्वात आल्यानंतर मोठ्या प्रमाणात या प्रकारच्या नीतीविचारांची निर्मिती होऊ लागली, तेव्हा त्याला वचन म्हटले जाऊ लागले होते. बसवोत्तर काळात वचनांना लिंगायत धर्माचे ‘आगम’ म्हणजे शास्त्र म्हणून मान्यता मिळाल्यावर वचनांना ‘वचनागम’ असेही संबोधले जाऊ लागले. वचन साहित्यात प्रामुख्याने मानवी मुल्यांचा आत्मस्वर आविष्कृत झाला असून त्याचबरोबर वीरशैव संप्रदायातील शक्ती-विशिष्टाद्वैत, षटस्थल, अंगलिंग- संबंध, लिंगधारणादी अष्टावरण इत्यादी उपासनात्मक बाबीही त्यात प्रकट केल्या आहेत.

वचने संस्कृत-प्राकृत पुराणग्रंथाचे अनुवाद किंवा कथा निरूपण नसल्यामुळे पारंपारिक साहित्यशास्त्रात त्यांची साहित्य म्हणून दखल घेतली नाही; परंतु वचन साहित्यातील जीवनमूल्यांची फार मोठ्या जनसमुदायाचा ताबा घेतला व त्याला लोकजीवनात अत्यंत महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले. त्यामुळे आधुनिक साहित्यात वचन साहित्याने निर्णायक पद्धतीने घडवून आणलेल्या सांस्कृतिक बदलाची दखल घेऊन आणि एकूणच कन्नड सांस्कृतिक क्षेत्रावर वचनांच्या प्रभावाचे साहित्यिक योगदान विचारात घ्यावे लागते. शैलीच्या दृष्टीने वचन साहित्य प्रकाराला कसलेही रूढ साहित्यिक निर्बंध नाहीत. वचनकारांची कथनपद्धती सूत्रात्मक आहे.यमक व वृत्त यांचा आग्रह व अडथळा नाही. वरवर पाहाता वचने गद्य स्वरूपाची वाटतात. इंग्रजीतील फ्रि व्हर्स सारखी बहुतेकदा ती मुक्तछंदात असतात. गद्यशैलीच्या या पद्यामध्ये लय, प्रास, तालबद्धता आणि लालित्य हे गुण आढळतात. यामध्ये शब्दसंख्येची व ओळीची मर्यादा अशा काही अटी नाहीत. अगदी दोन ओळींच्या वचनापासून पंचवीस-तीस ओळींचे वचनही असू शकते. शिवाय कानडी भाषेबरोबरच संस्कृत अवतरणांचाही वापर केलेला दिसून येतो. भाषेच्या अंतःस्थ असलेल्या एक सूर, ताल, लय नेमके हेरून कर्नाटकात वचन गायनाची स्वतंत्र शैलीही विकसित झाली आहे.

वचनांचे वर्गीकरण खालील प्रकारात केले जाते : १. सूत्रात्मक, २. वर्णनात्मक, ३. उपदेशात्मक, ४. प्रार्थनात्मक, ५. सती -पती भावात्मक, ६. विरक्तात्मक, ७. गूढात्मक आणि ८. आत्मगत. आशयानुसार वचनाचे आध्यात्मिक, सामाजिक व लिंगायतधर्मीय असे तीन प्रकार साधारणपणे मानता येते. अनुभव मंटपाचे पहिले अध्यक्ष अल्लमप्रभू यांची वचने ही आध्यात्मिक स्वरूपाची, बसवण्णांची वचने ही सामाजिक स्वरूपाची, तर बसवण्णांचे भाचे चन्नबसवण्णा (अनुभव मंटपाचे तिसरे आणि अखेरचे अध्यक्ष) यांची वचने लिंगायतधर्मीय अशा स्वरूपाची आढळतात. याच विभागणीमध्ये ७७० शरण-शरणींची वचने विभागता येतील. या ७७० शरणांमध्ये ७० स्त्रिया होत्या व त्याही वचननिर्मिती करीत होत्या हे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण त्या काळातील स्त्रियांची एकूण सामाजिक परिस्थिती पाहता शरण चळवळ ही किती स्त्रीमुक्तीवादी भूमिकेतून समतेची मागणी करीत होती, हे स्पष्ट दिसून येते.

उदा. शरणी गोग्गव्वे म्हणते,                                                                                                               येता स्तनांना उभारी, म्हणतात नारी                                                                                                      फुटता मिसरूड जर, म्हणतात नर                                                                                                          ज्ञान ह्या उभयाचे, नारी का नर                                                                                                            सांगा हो नास्तिनाथा !’’

पुढेही १७-१८ व्या शतकापर्यंत बसवानुयायी शरणाकडून फुटकळ स्वरूपात वचननिर्मिती होत राहिली. असे जरी असले तरी बसव काळातील शरणांनी जी वचन निर्मिती केली आहे त्याचे साहित्यिक मोल अजोड आहे. या संदर्भात कलबुर्गींनी म्हटले आहे की, ‘‘आम्ही प्रचुर केलेली भारतीय काव्यमीमांसा म्हणजे वैदिक मनाची निर्मिती आहे. भारताच्या संदर्भात सांगायचे तर आर्य संस्कृतीला प्रत्युत्तर म्हणून आर्येत्तर संस्कृतीची वाढ येथे झाली. म्हणून आर्य संस्कृतीच्या वैदिक काव्यमीमांसेशी समांतर अशी आर्येतर संस्कृतीची अवैदिक काव्यमीमांसा निर्माण झाल्यास नवल नाही. या अवैदिक काव्यमीमांसेमध्ये देहभाव व विदेहभाव असे दोन भाव आणि देहवाणी व विदेहवाणी अशी दोन प्रकारची वाणी ओळखली जाते. आठ रसांचे प्रतिपादन म्हणजे देहवाणी व शांत रसासह नऊ रसांचे प्रतिपादन म्हणजे विदेहवाणी याला जैनामध्ये लौकिक साहित्य व आगमिक साहित्य म्हटले असून, त्यालाच वचनकारांनी कायासाहित्य व आत्मसाहित्य म्हणून संबोधले आहे. ‘कायासाहित्य सर्वांना प्राप्त असे, आत्मसाहित्य अतिविरळ’ म्हणणारे शरण फक्त कायासाहित्यावादीच नसून आत्मसाहित्यवादीही होते. म्हणून असे साहित्य असलेली वचने पूर्ण जीवनसिद्धांत साहित्य म्हणून गौरवास प्राप्त ठरतात. ’’

मराठी वारकरी संत अभंगामध्ये जशी आपली नाममुद्रा ठेवतात. (उदा. नामा म्हणे, तुका म्हणे) ज्यामुळे तो अभंग कुणाचा आहे हे सर्व साधारणपणे वाचकाला ओळखू येते. वचनामध्येही शरण संतांनी आपली ओळख दाखवणारी वचनांकिते वापरली आहेत. त्यांनी थेट स्वतःचे नाव वापरले नाही. पण ते ज्या गावातून किंवा प्रदेशातील आलेले आहेत तिथल्या प्रसिद्ध शिवस्थानाचे नाव त्यांनी वापरले आहे. उदा. बसवण्णा कुडल संगमशी संबंधित होते,म्हणून ते शिवस्थान कुडलसंगमेश्वर असे वचनांकित वापरतात. बसवण्णा व त्यांचे शरण सहकारी सिद्धरामय्या, अल्लमप्रभू, माडिवाळ माचय्या, चन्नबसवण्णा, अक्कमहादेवी, नागम्मा इत्यादी शरण-शरणींची वचने अत्युच्च दर्जाची व साहित्यिक उंची दाखविणारी आहेत. विशेषतः अक्कमहादेवीची वचने ही इतर वचनकारांपेक्षाही अधिक श्रेष्ठ आहेत.

शरणांच्या कृतिशील, सामुहिक आणि आक्रमण वर्तन व्यवहारामुळे चातुवर्णी व्यवस्थेचे धाबे दणाणले. या व्यवस्थेने राजसत्तेच्या मदतीने शरणांच्यावर कठोर हल्ला चढवला. त्याचे नेतृत्व बिज्जळपुत्र सोविदेव याने केले. शरणांची कत्तल आणि वचनसाहित्याचा नायनाट हेच त्यांचे उद्दिष्ट होते. या वेळी शरणांनीही वचन साहित्य वाचविण्यासाठी कठोर संघर्ष केला. आताच्या महाराष्ट्रातील सोलापूर आणि कर्नाटकातील कारवारजवळच्या उळवी या ठिकाणी त्यांनी वचन साहित्य नेऊन वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी मार्गात सोविदेवाच्या सैन्याशी प्रचंड संघर्ष केला. त्यामध्ये बसवण्णा पत्नी गंगांबिका, मडिवाळ माचय्या इत्यादी थोर शरणांना हौताम्य पत्करावे लागले. कर्नाटक, आंध्र आणि केरळ या प्रांतात खेड्यापाड्यातून हे वचन साहित्य लपविण्याचा व जतन करण्याचा प्रचत्न झाला. वैदिक राजसत्तेच्या प्रभावामुळे हे मुख्य वचन साहित्य जवळपास १८-१९ व्या शतकापर्यंत सुप्तावस्थेत राहिले. केवळ मौखिक परंपरेतून ते प्रवाहित राहिले. पण २० व्या शतकामध्ये विजापूर येथीफकिराप्पा गुरुबसाप्पा हळकट्टी यांनी या हरवलेल्या वचन साहित्याच्या मौलिकतेचे भान आले व उर्वरित आपले सर्व आयुष्य या तीनही प्रांतात फिरून प्रसंगी आपले घरदार विकून त्यांनी वचन साहित्य गोळा केले व सर्वप्रथम एकत्रित स्वरुपात प्रकाशित केले. त्यानंतर मात्र कन्नड प्रांतात या वचन साहित्याचा अभ्यास करणाऱ्या विद्वनांची मांदियाळी तयार झाली. यात आर. सी. हिरेमठ, बी. डी. जथ्थी, एम. एम. कलबुर्गी, विरन्ना राजूर यांची नावे घ्यावी लागतील. अतिशय वैज्ञानिक शिस्तीने व तटस्थ भूमिकेतून शरण परंपरेतील आणि कन्नडच नव्हे तर भारतीय प्राचीन साहित्याची महत्ता लेवून असणारे शरण वाङ्मय अतिशय लखलखीत पद्धतीने या मंडळींनी आज अभ्यासकांसाठी आणि रसिकांसाठी उपलब्ध केले आहे.

संदर्भ : दिवाकर रं.रा.,कुमठेकर बाबुराव (अनु.), वचन साहित्य परिचय, सत्साहित्य केंद्र, दिल्ली, १९६०.