कंबार,चंद्रशेखर : (२ जानेवारी १९३७). राष्ट्रीय ख्यातीचे प्रसिद्ध कन्नड नाटककार, कवी, कादंबरीकार. भारतात साहित्यविषयक सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी. जन्म कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील घोडगेरी या गावी, एका गरीब लोहार कुटुंबात झाला. घोडगेरी हे गाव लोककला सादर करणाऱ्या कलावंतांचे गाव आहे. गावातील या लोककलावंतांचा प्रभाव कंबार यांच्या पुढील आयुष्यावर पडलेला दिसतो. गावातील लोक त्यांना शिवपूर कंबार मास्टर नावाने ओळखतात. अत्यंत गरीबीच्या परिस्थितीमुळे त्यांना शाळा सोडावी लागली. पण सावलगीच्या जगद्गुरु सिद्धरामस्वामी आणि इतरांच्या मदतीमुळे ते शालेय शिक्षण पूर्ण करू शकले.

धारवाड येथील कर्नाटक विश्वविद्यालयातून बी.ए. आणि एम्.ए. ह्या पदव्या त्यांनी प्राप्त केल्या. ‘उत्तर कर्नाटकची जानपद रंगभूमी’ (The Folk Theatre of North Karnaltaka) या विषयावर संशोधन करून त्यांनी पी.एच्.डी.प्राप्त केली.अनेक वर्षे ते बंगलोर विश्वविद्यालयात प्राध्यापक होते.लहानपणापासूनच कंबार यांना लोककला, लोकसंस्कृती आणि परंपरा, कर्मकांडांमध्ये रूची होती. त्यामुळेच त्यांनी जानपद रंगभूमी, साहित्य, शिक्षण यावर अभ्यासपूर्ण लेखन केले आहे. कुमारव्यास, बसवा, कुवेंपु हे त्यांचे आवडते कन्नड लेखक तर शेक्सपीअर, फेडरिको, गार्सिया आणि लोरका हे पाश्चात्त्य लेखक आवडते आहेत.शालेय शिक्षण कन्नड या मातृभाषेतूनच असावे याबद्दल ते आग्रही आहेत. त्यांच्या मते मातृभाषेतील शिक्षण ‘अनुभव’ देते तर इतर भाषेतून घेतलेले शिक्षण ‘माहिती’ देते.

कंबार यांची  २३ नाटके, ११ कवितासंग्रह, ७ कादंबऱ्या, १६ समीक्षाग्रंथ इत्यादी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. जानपद रंगभूमी, साहित्य, शिक्षण या विषयावरील अभ्यासपूर्ण संशोधकीय लेखनही त्यांनी केले आहे. त्यांच्या पुस्तकांमध्ये मुगुलु (१९५७), हेलातेना केला (१९६४), ताकारारीनावारू (१९७१), सविरादा नेरालु (१९७९), अयदा काव्यांगलु (१९८०), बेल्ली मिनु (१९८९), हे काव्यसंग्रह ; बेंबटीदा कान्नु (१९६१), नार्सिसस (१९६९), रीष्यश्रींगा (१९७०), जोकुमारस्वामी (१९७२), चालेशा (१९७३), संगय्या बालया अनाबेको नादालागा (१९७५), किट्टीया काथे (१९७४), जयसिदनायक (१९७५), अलिबाबा (१९८०), नयी काथे (१९७६), माथांतरा (१९७८), सम्बाशिवा प्रहसना (१९८७), श्रीसमपिगे (१९८०), बोलेशांकारा (१९९१), महामाई (१९९९) इत्यादी नाटके ; अण्णा तंगी (१९५६), करीमायी (१९७५), जि.के.मास्तररा प्रणयप्रसंग (१९५६), सिंगरव्वा मट्टू अरामाने (१९८२) हे दीर्घकथासंग्रह आणि कन्नड लोकसाहित्य शब्दकोश (१९८५), संगया बालया (१९६६) आणि बानिसी हद्व्वा ना बलगा (१९६८) या शोधसमिक्षा ग्रंथांचा समावेश होतो.

१९५८ मध्ये कंबार यांचा मुगुलु हा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला. या सुमारास आधुनिकतावाद प्रबळ होता. अशा विचारांचा कवींच्या संपर्कात ते असले, तरी त्यांच्यापासून थोडे वेगळेही आहेत.त्यांच्या या पहिल्या काव्यसंग्रहातील कवितेत बोलीभाषा आणि लोकसंगीताचा ठेका आहे. गावाकडच्या मातीचा चेहरा आहे. १९६४ मध्ये प्रकाशित हेलातेना केला या काव्यसंग्रहानंतर त्यांना एक महत्त्वाचे कवी म्हणून ओळख मिळाली. त्यानंतर कन्नडच्या अनेक भाषिक छटांचं दर्शन घडविणाऱ्या लोकसंगीताच्या लयीत कविता लिहिण्यात कंबार यशस्वी झालेले दिसतात. ग्रामीण पार्श्वभूमी असल्याने त्यांच्या लेखनात लोकप्रतीके, दंतकथा भरपूर प्रमाणात येतात. गावाकडचे निसर्ग  सौंदर्य, वातावरण आणि शहरी जीवन, कला आणि तंत्रज्ञान, बोलीभाषा आणि लेखनाची भाषा हे द्वंद्व त्यांच्या काव्यलेखनात आढळते.

कंबार यांची एकूण २३ नाटके प्रकाशित झाली आहेत. १९६१ मध्ये त्यांचे पहिले नाटक प्रकाशित झाले आणि त्यांना राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली. त्यांच्या नाटकाची वैशिष्ट्ये म्हणजे गंभीर आणि विनोदाची असलेली सरमिसळ, बोलीभाषेतील वाक्प्रचार, पौरोणिक कथा आणि दंतकथांचा उपयोग, नृत्य आणि संगीत यांचा मेळ. लोकनाट्याच्या तंत्राने लिहिलेली आणि आजचा संदर्भ असलेली त्यांची नाटके विलक्षण लोकप्रिय झाली. त्यांच्या नाट्यलेखनातही आभास आणि वास्तव, परंपरा आणि आधुनिकता यामधील द्वंद्वाचे दर्शन घडते.त्यांची नाटके एकाच घटनेवर नाही तर दोन-तीन संकल्पनांवर आधारित असतात. याला अपवाद फक्त त्यांची शेवटची दोन नाटके महामाई (१९९९) आणि शिवरात्री (२०११) यापैकी पहिले रूपकात्मक तर दुसरे १२व्या शतकातील कर्नाटकातील वीरशैव चळवळीविषयीचे आहे. परंपरा आणि आधुनिकता यांमधील विसंवाद, वसाहतवादाची कायम असलेली मनोभूमिका, सरंजामशाहीचे संकट, अस्तित्वहीनता, लिंगभेद, अविश्वासार्ह्यता, दैवत संकल्पनेचा विलोप ही विचारसूत्रे कंबार यांच्या काव्य आणि नाटकामध्ये अभिव्यक्त झाली आहेत. त्यांच्या अनेक कविता ह्या दीर्घ अशा आख्यानात्मक आहेत. अनेक कविता ह्या संगीतबद्ध करण्यात आल्या आहेत.

कंबार यांनी भारतातील अनेक मान्यवर संस्थांमध्ये महत्त्वाची पदे भूषविली आहेत. अध्यक्ष, कर्नाटक नाटक परिषद (१९८०-८३); अध्यक्ष, कर्नाटक साहित्य परिषद ; कुलगुरू, कन्नड विद्यापीठ, हम्पी; अध्यक्ष, राष्ट्रीय नाट्य संस्था (NSD,१९९६-२०००); अध्यक्ष, साहित्य अकादेमी (२०१८ पासून).त्यांच्या जयसिदनायक या प्रसिद्ध नाटकाला १९७५ चे कर्नाटकातील बेस्ट बुक ऑफ दि ईयर ही वर्धमान प्रशस्ती मिळाली आहे. श्रीसमपिगे या नाट्यलेखनासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला असून, या नाटकाचे इंग्रजी, हिंदी, मराठी, राजस्तानी,‍ तमिळ, तेलुगु, मल्याळम् इ. भाषात अनुवाद झाले आहेत. त्यांच्या नाटकावर आधारित अनेक चित्रपटांचे कंबारांनी दिग्दर्शन केले आहे. त्याच्या दोन नाटकांवर दूरदर्शन मालिकाही प्रसारित झाल्या आहेत. भारत सरकार आणि कर्नाटक राज्यासाठी त्यांनी अनेक माहितीपट  बनवले असून, ‘काडु कुडुरे’ हा माहितीपट इंडियन पॅनोरामामध्ये समाविष्ट झाला आणि त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या गाजलेल्या नाटकाला १९७५ चे सर्वोत्कृष्ट नाटक म्हणून नाट्यपरिषदेचा कमलादेवी चट्टोपाध्याय पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या पाच पुस्तकांना कर्नाटक साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. याव्यतिरिक्त कुमारन आसन पुरस्कार, मास्ति पुरस्कार, कबीर सन्मान, कालिदास सन्मान, संगीत-नाटक अकादमी पुरस्कार (२००१) भारत सरकारचा पद्मश्री (२००१) साहित्यातील सर्वश्रेष्ठ ज्ञानपीठ पुरस्कार (२०१०) असे अनेक सन्माननीय पुरस्कार असे अनेक पुरस्कार कंबार यांना मिळाले आहेत.

संदर्भ :