पृथ्वीच्या विषुववृत्तापासून उत्तरेस सुमारे २३° ३०’ एवढ्या कोनीय अंतरावर व त्याला समांतर असलेल्या काल्पनिक रेषेला म्हणजे अक्षवृत्ताला कर्कवृत्त म्हणतात. कर्कवृत्ताचे अक्षांश सुमारे २३° २७’ उत्तर असेही मानले जाते. उत्तर गोलार्धात उन्हाळी किंवा जून अयनदिनी (२१ जून रोजी) पृथ्वीचा उत्तर ध्रुव सूर्याकडे कललेला असतो. त्या दिवशी कर्कवृत्तावर सूर्य खस्वस्तिकी (थेट माथ्यावर) असतो. म्हणजे त्याची किरणे तेथे लंबरूप पडतात. त्याच्या उत्तरेला ती नेहमी तिरपी पडतात. भारतातील दिल्ली हे कर्कवृत्ताच्या उत्तरेस असल्यामुळे तेथे सूर्य कधीच डोक्यावर येत नाही. म्हणजेच कर्कवृत्त ही सूर्याच्या उत्तरायणाची कमाल मर्यादा असून पृथ्वीवरील उष्णकटीबंधाची ती उत्तर सीमा आहे. सूर्य मिथुन राशीच्या तारकासमूहांत असतो; मात्र इ. स. पू. २ मध्ये जेव्हा तारकासमूहांना नावे देण्यात आली, तेव्हा सूर्याचे स्थान कर्क राशीच्या तारकासमूहांत होते.

कॅन्सर (Cancer) या लॅटिन शब्दाचा अर्थ खेकडा (Crab) म्हणजे कर्क असून त्यावरून या वृत्ताला कर्कवृत्त हे नाव पडले. पृथ्वीच्या भ्रमणाक्षाची दिशा हळूहळू बदलत असल्यामुळे सुमारे २४,००० वर्षांनंतर सूर्य पुन्हा कर्क राशीच्या तारकासमूहांत दिसेल. कर्कवृत्तावरील निरीक्षकाला ध्रुवतारा क्षितिजांच्या वर २३° ३०’ या कोनीय अंतरावर दिसतो.

पृथ्वीचे कर्कवृत्त मेक्सिको, फ्लॉरिडा व क्यूबा यांच्या दरम्यानचा प्रदेश, तसेच सहारा वाळवंट, अरबस्तान, मध्य भारत व दक्षिण चीन आणि पॅसिफिक महासागरातील हवाई बेटांमधील प्रमुख बेटांलगतच्या उत्तर भागांतून गेलेले दिसते. खगोलावरील याच्याशी तुल्य वृत्तालाही कर्कवृत्त म्हणतात. खगोलीय विषुववृत्ताच्या उत्तरेकडील २३° ३०’ एवढी क्रांती असणारे बिंदू कर्कवृत्तावर येतात व ही सूर्याची सर्वाधिक उत्तर क्रांती आहे.

समीक्षक : वसंत चौधरी