घरगुती सांडपाणी कोणत्या पातळीपर्यंत शुद्ध करावे हे त्याच्या पुढील उपयोगांवरून ठरते. उदा., ते नदीत सोडावयाचे असले तर त्यामधील दूषितकांची कमाल मर्यादा ही सहसा प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून किंवा स्थानिक वापर ह्यांवरून ठरविली जाते. समुद्रात सोडण्याच्या पाण्याची शुद्धतेची पातळी नदीत सोडण्याच्या पाण्याच्या पातळीपेक्षा खालची असली तरी चालते. हे पाणी शेतीसाठी वापरण्याचे असल्यास ती वरील दोन्ही पातळींच्या मध्ये असली तरी चालते. उद्योगामध्ये कोणत्या कामासाठी उदा., बॉयलरमध्ये वाफ उत्पन्न करण्यासाठी cooling towers मध्ये  Make up water म्हणून किंवा इतर कामासाठी वापरायचे झाल्यास काही विशिष्ट दूषितके अगदी कमी मात्रेमध्ये असावी लागतात. त्यानंतर हे पाणी पिण्याचा एक स्रोत म्हणून वापरणे असल्यास त्यानुसार शुद्धीकरणाची पातळी सर्वोच्च असावी लागते.

सांडपाण्यामधील दूषितके : ह्यांचे मुख्य प्रकार म्हणजे (अ) कार्बनी (आ) अकार्बनी आणि (इ) निष्क्रिय (inert; इनर्ट). अधिक वर्गीकरण करावयाचे झाले तर दूषितकांचे प्रकार असे :  १) प्राथमिक उत्पादक (Primary producers; वनस्पती, शैवाल इ.)

२) विविध पोषी सजीव (Consumers; अळ्या, मासे, प्राणी) आणि

३) अपघटन करणारे (Decomposers; वायुजीवी, अवायुजीवी आणि Facultative म्हणजे पाण्यामध्ये ऑक्सिजन असला किंवा नसला तरी कार्य करू शकणारे सजीव) ह्यांच्या जोडीला दूषितकांचा विघटनामध्ये साहाय्यक ठरणारे निर्जीव पाणी, माती, वायू, विविध रसायने.

सांडपाण्याचे पृथःकरण – घरगुती सांडपाण्याच्या नमुन्याचे पृथःकरण करावयाचे असल्यास पुढील गुणधर्मानुसार केले जाते.

  • भौतिक (Physical) – तापमान, वास, तेल व इतर ओशट पदार्थ (ऑइल अँड ग्रीज, एकूण घन पदार्थ (Total Solids; टोटल सॉलिड्स), आलंबित पदार्थ (suspended solids; सस्पेंडेड सॉलिड्स), विरघळलेले पदार्थ (Dissolved solids; डिझॉल्व्हड सॉलिड्स) संप्लवनशील पदार्थ (volatile solids; व्होल्टाइल सॉलिड्स), कलिल (colloidal; कोलॉइडल) पदार्थ. हे पदार्थ अत्यंत सूक्ष्म असून प्राथिमक निवळण टाकीमध्ये खाली बसत नाहीत. म्हणून त्याच्यासाठी secondary treatment चा वापर करावा लागतो. सेंद्रिय व निरींद्रिय/कार्बनी व अकार्बनी पदार्थ
  • रासायनिक (chemical) – सामू (पीएच्. pH) आम्लता, अल्कता, जैवरासायनिक प्राणवायूची मागणी (जैराप्रामा) (Biochemical oxygen demand B.D.D.) रासायनिक प्राणवायूची मागणी (राप्रामा) (केमिकल ऑक्सिजन डिमांड; Chemical oxygen demand C.D.D.) एकूण सेंद्रिय कार्बन (टोटल ऑरगॅनिक कार्बन; Total organic carbon T.O.C.), क्लोराईड्स, फॉस्फेटस्, नायट्रेट्स, नायट्राइट्स, सल्फेट्स इत्यादि.

घरगुती सांडपाण्यामध्ये जर औद्योगिक सांडपाणीसुद्धा मिसळत असेल, तर वर नमूद केलेल्या चाचण्याबरोबर त्या त्या उद्योगांचे वैशिष्ट्य असलेल्या दूषितकांसाठी पृथःकरण करणे आवश्यक असते. उदा., कागद उत्पादनामध्ये सेल्युलोज आणि लिग्निन (cellulose and lignin), चर्मोद्योगामध्ये टॅनिन (Tannin), विद्युत् लेपनामध्ये (Electroplating) क्रोमियम, निकेल, कॅडमियम, चांदी, सोने, जस्त ह्यांसारखे धातू आणि त्यांचे क्षार, सायनाईडस् इ. , कारण ह्यांमधील काही दूषितके शुद्धीकरण प्रक्रियेमध्ये बाधा आणू शकतात म्हणून प्रक्रियेच्या आराखड्यामध्ये प्रथम ही दूषितके काढून टाकण्याची व्यवस्था करावी लागते.

  • जैविक – सांडपाण्याच्या शुद्धीकरण क्रियेमध्ये सूक्ष्मजंतूंचा मोठा वाटा आहे. त्यांचे वर्गीकरण अ) वायुजीवी (Aerobic), ब) अवायुजीवी (Anaerobic) आणि क) वैकल्पिक (Facultative) म्हणजे पाण्यामध्ये विरघळलेला ऑक्सिजन असला किंवा नसला तरी कार्य करू शकणारे. ह्या सूक्ष्मजंतूंच्याबरोबर बुरशी (Fungi फंजाय), प्रोटोझोआ (Protozoa एकपेशीय प्राणी) कृमी, अमीबा इत्यादीसुद्धा सांडपाण्यामध्ये आढळतात. तसेच पाण्याच्या माध्यमातून रोग पसरवणारे सूक्ष्मजंतू उदा., विषमज्वर, कॉलरा, कावीळ, आमांश इत्यादी., भौतिक आणि रासायनिक गुणधर्म तपासताना त्यांची मात्रा जाणून घ्यावी लागते. तशी सूक्ष्मजंतूंच्या बाबतीत लागत नाही कारण हे सूक्ष्मजंतू घरगुती सांडपाण्यामध्ये कमीअधिक प्रमाणात असतातच. त्यांना अन्नाच्या रूपात उपलब्ध होतात ते सांडपाण्यातील कर्बोज्जित पिष्टपदार्थ (Carbohydrates कार्बोहायड्रेट्स), प्रथिने (proteins प्रोटीन्स) आणि चरबी (Fats फॅटस्) ह्यांमधून.
  • किरणोत्सर्गी ह्यांचे तीन प्रमुख प्रकार १) आल्फा किरण, २) बीटा किरण आणि ३) गॅमा किरण. ह्यांचे अस्तित्व असू शकते. जेथे किरणोत्सर्गी पदार्थ वापरले जातात. उदा., रुग्णालये, संशोधन करणार्‍या प्रयोगशाळा इत्यादी. आणि किरणोत्सर्गी खनिजे ज्या खाणींमधून काढली जातात त्या खाणी. ह्या खाणींमधून होणारा किरणोत्सार मोठ्या प्रमाणावर असू शकतो. परंतु इतरत्र होणारा किरणोत्सार इतक्या कमी प्रमाणावर असतो की सांडपाण्याचे पृथःकरण करतांना त्याची दखल घेण्याची गरज पडत नाही.

सांडपाणी शुद्धीकरणाच्या आधुनिक पद्धतींचा (modern methods of sewage treatment) अवलंब करणे आवश्यक होण्याची कारणे १) वाढती लोकसंख्या व त्यामुळे वाढलेला सांडपाण्याचा प्रवाह, २) शुद्धीकरण यंत्रणा बांधण्यासाठी उपलब्ध जमिनीची कमतरता, ३) सर्वसाधारण (conventional) शुद्धीकरण पद्धतींना दाद न देणार्‍या दूषितकांचे वाढते प्रमाण आणि त्यांचा पर्यावरणावर होणारा दुष्परिणाम, ४) नेहमीपेक्षा अधिक शुद्धता असलेले सांडपाणी उत्पन्न करण्याची गरज, ज्याचा पुनर्वापर करता येईल किंवा ज्याचे पुनर्चक्रीकरण शक्य होईल, इत्यादि. ह्या पद्धतींमध्ये आलंबित जीवाणू (suspended growth) आणि स्थिर जीवाणू (Attached growth) ह्यांचा वापर करण्यावरोवर पटल निस्यंदन (Membrane filtration) आणि अधिक शक्तिशाली ऑक्सिडीकरण (Advanced oxidation), उच्च तापमानांत दहन  (High temperature incineration/ plasma process) ह्यांचासुद्धा उपयोग केला जातो. थोडक्यात, भौतिक, रासायनिक व जैविक पद्धतींचा एकत्रित वापर करून अधिक शुद्ध पाणी उत्पन्न करणे हा हेतू ठेवलेला असतो. अशा पद्धतींची संक्षिप्त माहिती शुद्धिकरणाच्या पद्धती या नोंदीमध्ये दिली आहे.

संदर्भसूची

  1. Arceivala, S. J., S. R. Asolekar. Wastewater treatment for pollution control and reuse. Tata McGraw Hill Publishing company limited, New Delhi, First reprint 2007.
  2. Patwardhan, A. D. Waste Water Treatment – PHI learning Pvt., Ltd., Delhi Second edition 2017.

समीक्षक : सुहासिनी माढेकर