इ. स. पू. ११०० ते इ. स. पू. १०० च्या दरम्यानच्या इटलीतल्या पो नदीच्या खोऱ्यातील व इट्रुरिया या प्रांतातील संस्कृतीला इट्रुस्कन या नावाने ओळखले जाते. टिरिनियन समुद्राला लागून असलेल्या इट्रुरियाच्या विस्तृत भागामुळे टिरिनियन संस्कृती या नावानेही ती ओळखली जाते.

इट्रुस्कन कला मुख्यतः दोन कालखंडांत विभागली जाते : १) आर्षकाळ (Archaich) आणि २) परिपक्वतेचा व विनाशाचा काळ. आर्ष कालखंडाचेही दोन भाग मानले जातात : १) इट्रुस्कन कलानिर्मितीवरचा अतिपूर्वेकडील प्राचीन कलावैशिष्ट्यांचा प्रभाव. इ. स. पू. ८०० ते ५००  आणि २) प्राचीन ग्रीक कलेचा प्रभाव. धातुशिल्पे, अलंकार, भित्तिलेपचित्रे, थडग्यांवरील मानवाकृती शिल्पे, पक्वमृदा (टेराकोटा) पात्रे असे प्रमुख कलाप्रकार या संस्कृतीत आढळतात.

इ. स. पू. सातव्या शतकात इट्रुस्कनांचा शेती हा प्रमुख ग्रामीण व्यवसाय होता. पुढील काळात त्यांनी सोने, चांदी, कथिल, कांस्य, तांबे, लोखंड हे धातू खाणींतून यशस्वी रीत्या मिळवून त्यांद्वारे निर्मिलेल्या वस्तू व आभूषणे यांचा समुद्री व्यापारातून मोठ्या प्रमाणात प्रसार केला. त्यावरून त्यांचे सामाजिक जीवन समृद्ध असल्याचे दिसून येते. रेगोलिनी ग्लासीनामक थडग्यामध्ये साठवलेली मोठमोठी धातूंची पात्रे व मुबलक प्रमाणात सापडलेली सोन्याची आभूषणे यांवरून याची प्रचिती येते.

इट्रुस्कन लोक समुद्री प्रवास व जहाजनिर्मितीत निष्णात असल्याने, इटलीनजीकच्या परदेशी समुद्री व्यापारावर त्यांनी नियंत्रण मिळवले. राजकीय दृष्ट्या इट्रुस्कन राष्ट्रनिर्मिती कधीच झाली नाही. तार्क्वीन्या (प्राचीन Tarquinii), चेर्व्हेटरी (सीरी), व्हल्सी (Vulci) आणि व्हीआई (Veii) अशी मुक्त शहरे तयार झाली, जी केवळ धार्मिक आणि भाषिक रीत्याच एक दिसतात. या राजकीय भिन्नत्वामुळेच रोमन आक्रमणाला ते बळी पडले आणि या संस्कृतीचा लोप झाला. ल्यूशस तार्क्वीनिअस प्रिस्कस हा रोमवर राज्य करणारा मूळचा पहिला इट्रुस्कन राजा.

सुमारे ४०० वर्षे प्रकर्षाने प्रगत होऊन संपुष्टात आलेल्या इट्रुस्कन संस्कृतीचा परिचय तेथील वास्तुकलेच्या प्रकारांवरून निदर्शनास येतो. ग्रीक स्तंभरचना, अलंकरण यांचा विशेष प्रभाव इट्रुस्कनांच्या मंदिररचनेत आढळून येत असला, तरी त्यांच्या धार्मिकतेनुसार त्यांनी त्यांत बदल केलेले दिसतात. अर्धवर्तुळाकार कमानी, चौथऱ्यावर बांधलेले देवालय ही त्यांच्या वास्तुकलेतील काही वैशिष्ट्ये होत. प्राचीन रोमन स्थपती वितृवियसने लिहून ठेवलेल्या वर्णनांवरून आणि उपलब्ध पुरातत्त्वीय अवशेषांच्या आधारे मंदिराचे स्वरूप पुढील चित्राप्रमाणे असावे :

वरील मंदिराच्या छतावर आणि मुख्यत्वे दर्शनी मध्यभागावर पक्वमृदेपासून बनवलेल्या शिल्पाकृतींची रचना दिसते. प्रवेश निमुळत्या पायऱ्यांचा असून खांबांची उंची साधारण तीन पुरुष (अंदाजे १८ फूट) असे. प्राचीन यूरोपातील बहुतेक स्थापत्याची ओळख तेथील खांबांच्या रचनेच्या आधारे होते. येथील खांब टस्कन शैलीचे असून ग्रीसच्या डोरिक शैलीशी साम्य साधणारे आहेत. टस्कन शैलीचे खांब लाकडापासून बनविलेले, खांबांवरील सबंध वजन पेलण्यासाठी अधिक रुंद असलेले, तळखडेयुक्त, नक्षीसाठी खाचणी न पाडलेले असतात. टीनीआ (Tinia), उनी (Uni), मिनर्व्हा (Minerva) या देवतांचे तीन कोनाडे मंदिरात प्रामुख्याने आढळतात.

इट्रुस्कन संस्कृतीमध्ये मृत, त्यांची उत्तरक्रिया व त्यांचा परलोकप्रवास यांसंदर्भात विशेष आदरभाव दिसतो. आरंभीच्या काळातील इट्रुस्कन वास्तुकलेच्या बहुतांश कलाप्रकार-वास्तू प्रामुख्याने थडग्यांच्या स्वरूपात आढळतात. चेर्व्हेटरी (बन्डिताचिया) येथे मृतांचे शहर आहे. त्यास नेक्रोपोलीस असे म्हटले जाते. ते लोकवस्तीपासून लांब असून एखाद्या सुनियोजित नगराप्रमाणे तेथील थडग्यांची रचना केली आहे. जमिनीखालील अंतर्गृहांची रचना जीवित लोकांच्या घरांप्रमाणे आहे. निमुळत्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर मध्य अक्षाला अनुसरून भव्य दालन व भोवताली छोटी दालने आहेत. त्यांत रोजच्या जीवनाला आवश्यक अशा वस्तू – पलंग, गादी, उश्या, खुर्च्या, रंगीबेरंगी भांडी, सोन्याचे अलंकार इ.– असून भिंतींवर चित्रकाम आढळते. भिंतींवर विविध अवजारांची चित्रे, उत्थित शिल्पे असून दाराची चौकट सालंकृत आढळते. काही थडगी भव्य आकारांची असून ती ट्यूफा (tufa) नामक गडद छटा असलेल्या चुनखडीच्या दगडापासून बनवलेली आहेत. सीरी व तार्क्वीन्या येथील स्मशानभूमीतील मृतांची थडगीसुद्धा सुसज्ज गृहांप्रमाणे आहेत. इट्रुस्कन संस्कृतीतील काही प्रमुख कलाप्रकार व त्यांची ओळख खालीलप्रमाणे :

सुखासीन जोडप्याची शवपेटिका (इ. स. पू. ५२०).

सुखासीन जोडप्याची शवपेटिका : चेर्व्हेटरी येथील हे पक्वमृदा शिल्प असून रोम येथील वस्तुसंग्रहालयात आहे. ग्रीक कलेमध्ये याची कुठलीही समांतर प्रतिमा दिसत नाही. शिल्पकाराने व्यक्तींच्या धड या भागावर लक्ष केंद्रित केले असून त्यांच्या हातांचे, चेहऱ्यांचे संवेदनशील हावभाव हे इट्रुस्कन कलेचे वैशिष्ट्य होय.

उत्थित शिल्पांची थडगी (इ. स. पू. तिसरे शतक).

उत्थित शिल्पांची थडगी : या थडग्याचे वैशिष्ट्य म्हणजे भिंती आणि कठड्यांवर संदला-शिल्पन (Stucco Work) पद्धतीने निर्माण केलेले नित्य उपयोगाचे साहित्य, जे जीवित स्थानिकांच्या घरातील दैनंदिन व्यवहाराचे प्रतीक आहे. या उत्थित (relief) आकारांमध्ये उश्या, शिरस्त्राण, ढाल, पेले, सुरी, आरसे इत्यादींचा समावेश आहे.

बिबट्यांचे चित्र असलेले थडगे

बिबट्यांचे चित्र असलेले थडगे : या थडग्याच्या पार्श्वभूमीवर असलेल्या संरक्षक पशूंच्या चित्रणावरून याला बिबट्यांचे थडगे असे नाव पडले. मेडुसानामक पौराणिक देवतेच्या भोवती असणाऱ्या चिन्हांपैकी असलेले हे पशू या ठिकाणी मात्र तिचे थेट प्रतिनिधित्व करताना दिसत नाहीत.

मासेमारीचे प्रसंगविवरण असलेले भित्तिचित्र.

मासेमारीचे प्रसंगविवरण असलेले भित्तिचित्र : तार्क्वीनिया येथील या थडग्यामधील सर्व भिंतींवर स्थानिक लोक निसर्गाचा पुरेपूर उपभोग घेतानाची दृश्ये मोठ्या प्रमाणावर चित्रित केलेली आहेत. एका खडकावरून पाण्यात उडी घेणारा युवक, काही लोक होडीतून मासेमारी करताना, पक्ष्यांनी वेढलेले आभाळ, गुलेल घेऊन शिकार करणारे तरुण अशा विषयांनी नटलेले हे दालन समकालीन जीवनाची ओळख करून देते.

कॅपिटोलीन लांडगी.

कॅपिटोलीन लांडगी : जागतिक कलेतिहासातील प्राण्यांचे चित्रण असणारे एक प्राचीन व महत्त्वाचे इट्रुस्कन धातुशिल्प. आजच्या रोमन राज्याचे प्रतीक असणारी ही प्रतिमा वास्तव आकाराहून अधिक मोठी असून रोमुलूस आणि रेमुस नावाच्या जुळ्या भावंडांचा सांभाळ करतानाचे हे दृश्य आहे. दोन्ही तान्ह्या बाळांची प्रतिमा १५ व्या शतकाशी जोडलेली आहे. या लांडगिणीच्या हावभावावरून तिच्या संरक्षक वृत्तीची प्रचिती येते.

फिकोरोनी सिस्ता.

फिकोरोनी सिस्ता : कांस्य पत्र्यापासून बनविलेल्या भांड्यांचा वापर स्त्रियांची प्रसाधने ठेवण्याकरिता होत असे. त्यांवर कोरलेल्या आकृत्यांवरून रोमनांचा वाढता पगडा जाणवतो. कांस्य आरसे व ही भांडी आहेरस्वरूपांतून देण्यात येत असत. केवळ जीवितच नाही, तर मृतांच्या थडग्यांतही अशा वस्तूंचा समावेश दिसतो.

 

 

 

 

समीक्षक – नितीन हडप

प्रतिक्रिया व्यक्त करा