प्राचीन काळापासून मृत्तिकेचा (मातीचा) उपयोग विविध कलावस्तू बनविण्याकरिता होत आहे. त्यांचा समावेश प्राचीन मृत्तिका कला या संज्ञेमध्ये होतो.  निसर्गात आढळणारे मातकट, अतिसूक्ष्मकणी द्रव्य म्हणजे मृत्तिका. यास सामान्यत: माती असे संबोधतात. मातीत मर्यादित प्रमाणात पाणी मिसळल्यास लवचिक झाल्यामुळे, तिला हवा तो आकार देता येतो. म्हणजेच माती आकार्य होते. आकार्यता हा मातीचा आवश्यक गुणधर्म आहे. मातीच्या वस्तूचा आकार सुकल्यावर घट्ट होऊन तसाच टिकून राहातो. तसेच दीर्घकाळ अग्नीच्या संपर्कात आल्यास दगडासारखा टणक होतो.

माती ह्या माध्यमात कलानिर्मितीची उर्मी मानवाला अगदी प्राचीन काळापासून असल्याचे दिसते. कलानिर्मितीसाठी हातांना न चिकटणारी तसेच विविध आकार लवकर धारण करू शकणारी माती लागते. या मातीला सर्वसामान्यपणे ‘चिकणमाती’ (Clay) तसेच शास्त्रीय दृष्ट्या ‘मृत्तिका’ (Ceramic) असे संबोधतात. प्राचीन काळी जेव्हा मानवाच्या लक्षात आले की, ओल्या मातीला दिलेला आकार ती धरून ठेवते तेव्हापासून मानवाने तिला विविध आकार देऊन तिच्यापासून दैनंदिन जीवनासाठी बहुपयोगी भांडी व कालांतराने कला-वस्तू बनविण्यास सुरुवात केली. या मातीच्या कला-वस्तूंना ‘मृत्तिकाशिल्प’ (Ceramics) तर भांड्यांना ‘मृद-भांडी’, ‘मृत्तिका-पात्र’ अथवा ‘मृत्पात्री’ (Pottery) असे म्हणतात.

कलानिर्मिती – पूर्वपीठिका :

मातीच्या माध्यमातून वस्तू बनविणे ही मानवाच्या कुतूहल आणि गरजेतून निर्माण झालेली हस्तकला आहे. प्रागैतिहासिक काळातील मानव मातीपासून दैनंदिन जीवनात वापरायोग्य अशा विविध प्रकारच्या वस्तू बनवायला शिकला. मातीला दिलेला आकार सुकल्यावर तसाच राहतो ह्याचे आकलन झाल्यावर मातीचे लेपन केलेल्या अथवा मातीच्या वस्तू हाताने दाबून दाबून बनवून उन्हात सुकवून वापरल्या गेल्या. आगीच्या संपर्कात आल्यावर माती भाजली जाऊन दगडासारखी टणक होते व जास्त काळ टिकते ह्याचा शोध लागल्यावर मानवाने भट्टीचा शोध लावला व त्याचा वापर सुरू झाला. चिकणमातीला विविध आकार देण्याचे तंत्र जसजसे मानव शिकायला लागला तसे हाताने, हळू व जलद फिरणाऱ्या चाकाचाही शोध लावला. गरजेनुसार विविध वस्तूंच्या साहाय्याने दैनंदिन जीवनात वापरायोग्य मृत्पात्री, विटा, कौले व इतर अलंकारिक व कलात्मक वस्तू मानवाच्या वापरात आल्या.

माती हे शिल्पकलेतील सर्वांत प्राचीन नव्हे, तर प्राथमिक माध्यम आहे. मानवी अभिव्यक्तीसाठी प्रागैतिहासिक काळापासूनची चिकणमातीच्या माध्यमातील लहान-मोठ्या आकारांतील शिल्पे केलेली आढळतात. द्विमित व त्रिमित निर्मितीसाठी विविध क्लृप्त्यांच्या अवलंबाने शिल्पकलेच्या अनेकविध तंत्रांचा जन्म झाला. चिकणमातीसारख्या प्रसरणशील, मऊ पदार्थांच्या हाताळणीतून आकार घडविणे आणि आधीच उपलब्ध असलेल्या त्रिमित वस्तूंमधून चपखल आकार निवडून त्यांची कल्पकतेने पुनर्रचना करणे, अशा अनेक प्रमुख प्रक्रिया या निर्मितीसाठी वापरल्या गेल्या. मणी, पदके, छापील मुद्रा, मुर्त्या इ. वस्तूंपासून ते अतिशय संश्लिष्ट किंवा गुंतागुंतीच्या अशा शिल्पपटापर्यंतची निर्मिती मातीपासून करण्यात आली. मृत्पात्रांबरोबर चिकणमातीतील बनवलेली शिल्पे नुसतीच उन्हात सुकवण्यात आली, तर कधी त्यांना जास्त टिकाऊ स्वरूप देण्यासाठी भाजण्यातही आली. जगातील सर्वच संस्कृतींच्या उद्भवकालात भाजलेल्या मातीच्या अनेकविध आकृत्या सापडतात.

मृदकलेचा प्रारंभ आणि मातीच्या वस्तूंचे प्रकार :

मातृदेवता, दोलनी व्हेत्सोनित्स, मोरेव्हिया

मृत्तिका वस्तूंचे गुणधर्म अथवा उपयोग, बनवण्याची प्रक्रिया, त्यांचे दर्शनी रूप यांनुसार त्यांना व्यवहारात निरनिराळी नावे प्रचारात आहेत. उदा., मृत्पात्री ही संज्ञा सामान्यत: रंगीत व कमी तापमानात भाजलेल्या अकाचीय, अपारदर्शक व झिलई तसेच जलशोषक असलेल्या किंवा नसलेल्या पात्रांना लावली जाते. मृत्तिकाशिल्पांना ‘मृण्मूर्ती’ अशीही संज्ञा वापरली जाते. आताच्या चेक प्रजासत्ताकामधील (Czech Republic) मोरेव्हिया येथील दोलनी व्हेत्सोनिस (Dolní Věstonice) येथे १९२५ साली केलेल्या उत्खननात काळ्या रंगातील मातृदेवता (Venus) सापडली. हे ४.४ इंच उंचीचे शिल्प यूरोपमधील ग्रॅविटीयन (Gravettien) म्हणजे साधारण इ. स. पूर्व २९००० ते २५००० या कालावधीतील आहे. हे शिल्प माती आणि हाडांचा बारीक चुरा यांच्या मिश्रणामध्ये बनविलेले असल्याने त्याला भाजल्यानंतर स्वयंझिलई प्राप्त झालेली दिसते. आतापर्यंत जगभरात सापडलेल्या शिल्पांपैकी सर्वांत जुनी मृण्मूर्ती मनाली जाते.

पक्वमृदा : (Terracotta)

मूळ लॅटिन  terracocta या शब्दावरून ‘टेराकोटा’ हा शब्द आलेला असून इटलीमध्ये त्याला ‘भाजलेली माती’ असे म्हणतात. पूर्वी सर्व तापसह मृत्तिकांसाठी ही संज्ञा वापरीत; आता मुख्यत: अशा बऱ्याचशा भरड व सच्छिद्र प्रकाराला आणि त्यापासून बनविण्यात येणाऱ्या वस्तूंनाही ‘टेराकोटा’ म्हणतात. भाजल्यावर या मातीच्या वस्तू दगडाप्रमाणे टणक व कठीण होतात आणि तीत असलेल्या लोहाच्या प्रमाणानुसार त्यांना सामान्यपणे गुलाबी, तपकिरी, मंद नारिंगी किंवा तांबडी छटा येते. या वस्तूंना काचीय झिलई नसते. पक्वामृदेच्या  वस्तू साधारण ६०० डि. से. ते १००० डि. से. पर्यंत भाजल्या जातात.  शिल्प-मूर्ती, उठाव-शिल्पफरश्या, मृत्पात्री, दागिने, फुलदाण्या, कुंड्या यांसारख्या गृहोपयोगी;  शोभेच्या वस्तू, धार्मिक वापराकरिता तसेच इमारतीच्या बांधकामासाठी लागणाऱ्या विटा, कौले, फरश्या इ. वस्तूंसाठी  पक्वामृदा वापरली  जाते.

पक्वामृदा सर्वत्र सहज उपलब्ध असल्याने प्रागैतिहासिक काळातील मानव ते आजच्या काळातील पारंपरिक कुंभार हेही प्रामुख्याने पक्वामृद्-वस्तूंचे उत्पादन करत आले आहेत. पुरातत्त्वशास्त्रात व कलेतिहासात टेराकोटा शब्द चाकावर न बनविलेल्या वस्तूंसाठी म्हणजे दागिने, मृण्मूर्ती तसेच शिल्पफलक फरशी इत्यादींसाठी वापरला जातो.

जपानमधील ओदाई यामामोतो १ (Odai Yamamoto I) येथील उत्खननात १९९८ मध्ये जगातील सर्वांत प्राचीन (साधारण इ. स. पू. १०,०००) पक्वमृदेची पात्रे सापडली. ही मृत्पात्री मातीच्या वळ्या बनवून एकावर एक रचून व जोडून बनवलेली आहेत.  ‘जोमोन मृत्पात्री’ म्हणून ती ओळखली जातात. जपानमध्ये ‘जोमोन’ (Jomon) म्हणजे ‘वळ्यांची केलेली रचना’ (Cord Pattern) असा अर्थ होतो.

जोमोन पक्कमृदेतील मृत्पात्र, ओदाई यामामोतो १, जपान

पाकिस्तानात असलेल्या मेहेरगड येथे नवाश्मयुग व ताम्रपाषाणयुगातील (इ. स. पू. ५५००–३५००) पक्वामृदेच्या मूर्ती व भांडी  मिळाली  आहेत. उत्तर भारतातील बूर्झाहोम येथील उत्खननांत गवसलेल्या भांड्यांच्या अवशेषांवरून नवाश्मयुगीन संस्कृतीच्या दुसऱ्या टप्प्यात मृत्पात्रे घडविण्यासाठी लागणाऱ्या चाकाचा वापर सुरू झाला असावा.

मातीच्याच विटांचा वापर करून उभारलेली भारतातील प्राचीन नागरी संस्कृती म्हणजे हडप्पा संस्कृतीच्या (इ. स. पू. ५५००–१७००) उत्खननात मातीत बनवलेल्या अनेकविध वस्तूंचा समावेश होतो. उत्कृष्ट चिकणमातीत बनवलेल्या तांबूस, पक्क्या भाजलेल्या आणि वजनाला जड असलेल्या हया मृत्पात्रांमध्ये साठवणीचे मोठे रांजण; मोठी  भांडी ठेवण्याकरिता बनविलेल्या गोल बैठका, छिद्रयुक्त उंच-सरळ बाजू असलेली भांडी, दोरीच्या साहाय्याने टांगून ठेवता यावे म्हणून छिद्रांची सोय असणारे उतरंडीचे घट, थाळ्या, आलंबयुक्त थाळ्या व उथळ भांडी,  जाळीच्या भिंती असणाऱ्या दंडगोलाकार चुली, धान्य मोजण्याची मापे, पेले, पणत्या आणि इतर अनेक वैशिष्ट्यपूर्ण आकार सापडतात. लाल, गुलाबी, करड्या रंगाच्या ह्या मृत्पात्रांवर पिवळसर अथवा गुलाबी, काळ्या अथवा लाल रंगामध्ये नैसर्गिक घटकांचा वापर करून नक्षी काढलेली दिसते. मातृदेवतांसारख्या धार्मिक वस्तूंबरोबर खेळणी, मणी, कानातल्या कुड्या, बांगड्या, अंगठ्या, बटणे, ताईत व कंठहारासारखे टेराकोटामध्ये बनविलेले दागिने हेही ह्या संस्कृतीचे वैशिष्ट्य मानले जातात.

पक्वमृदेतील बर्ने उठावशिल्प

लंडन येथील ब्रिटिश संग्रहालयातील प्राचीन मेसोपोटेमिया (इ. स. पू. १८००) येथील  पक्वामृदेतील  बर्ने उठाव-शिल्प (Burney Relief) विशेष उल्लेखनीय आहे. हे  २ ते ३ सेंमी. जाडीच्या फरशीवर बनवलेले असून २० इंच X १५ इंच इतके मोठे आहे, त्यावरील स्त्री-प्रतिमेचे शिर फरशीच्या पृष्ठापासून ४.५ सेंमी. इतके उठावदार केलेले आहे.

भारतातही सिंधू संस्कृतीपासून सगळ्याच संस्कृतींनी पक्वमृदेमध्ये मृण्मूर्ती बनविल्याचे आढळते. महाराष्ट्रात इनामगाव, नाशिक, पैठण, नेवासे, तेर अशा अनेक स्थळीं इतिहासपूर्व ते पूर्वेतिहास काळातील मृण्मूर्ती मिळाल्या आहेत. तेर येथे उत्तर सातवाहन काळातील पक्वमृदेच्या व केओलिनच्या अनेक मृण्मूर्ती मिळाल्या आहेत. यांत दोन वेगळ्या साच्यात बनवून जोडलेल्या स्त्री-पुरुषांच्या पोकळ व भरीव मूर्ती, दागिने, जनावरांच्या दिवे-प्रतिमा अशा वस्तूंचा समावेश होतो.

काचिद् मृत्पात्रे :  (Glazed Earthenware)

गुलाबी-पिवळसर ते गडद तपकिरी रंगाची तसेच करड्या ते काळसर रंगाची मृत्पात्रे, ज्यांना काचीय झिलईदार व किंचित जलशोषकता असते व १०५० डि. से. तापमानापर्यंत भाजली जातात. त्यांना काचिद् ‘अर्दनवेयर’ (Earthenware) म्हणतात. ही मृत्पात्रे पारंपरिक पद्धतीने बनविली जातात. वस्तूचा सच्छिद्रपणा कमी होण्यासाठी व ती आकर्षक दिसावी म्हणून  तिच्यावर विविध मृत्तिका व खनिजे, मृत्तिका व काचेची भुकटी, मीठ व विविध मिश्रणांचा लेप लावून ती परत भाजली जाते. दुसऱ्यांदा भाजताना हे पदार्थ वितळून त्यांनी छिद्रांची जागा व्यापून त्या वस्तूला चकाकी येते. या चकाकीला झिलई असे म्हणतात.

ईजिप्तचा राजा मेनेस (इ. स. पू. ३०००) याच्या थडग्यात मिळालेल्या झिलईदार फरशीचा तुकडा सर्वांत प्राचीन मानला जातो. शास्त्रज्ञांच्या मते ही काचीय झिलई भट्टीतील पोटॅश व रेतीच्या थरांमुळे अपघाताने आलेली असावी. कारण नंतरच्या काळात ईजिप्तच्या कलाकारांनी अल्कलीयुक्त काचीय झिलई असलेल्या भिंतीवरच्या फरश्या, प्राण्यांच्या लहान शिल्पमूर्त्या, उषाब्ती (Ushabti) मूर्ती मृत्तिका वस्तूंची निर्मिती केल्याचे आढळते. उषाब्ती ह्या ममी  (mummy) सारख्याच लहान प्रतिकृती होत, ज्या थडग्यांमध्ये मृताच्या ममीबरोबर ठेवत असत. ईजिप्तचा थीब्ज येथील राजा सेती १  (इ. स. पू. १३१३ ते १२९२) ची उषाब्ती साधारण ३० सेंमी. ची असून ती फिरोजा (turquoise) रंगाच्या अल्कली-सिलिकेच्या मिश्रणाची झिलई असलेली आहे.

राजा सेती पहिला, उषाब्त्ती मूर्ती, थीब्ज, इजिप्तिशियन संस्कृती

उत्तर भारतात सुरवातीच्या ऐतिहासिक काळात चित्रित राखी  (इ. स. पू. १२०० ते ६००) व चमकदार काळी अथवा निळसर झाक असलेली (इ. स. पू. ७०० ते २००)  उच्च दर्जाची  मृत्पात्री मुबलक प्रमाणात मिळाली आहेत.

माजोलिका थाळी, इटली

मानवाने कथिलाचे (Tin) क्षार वापरण्यास सुरवात केल्यानंतर झिलईमध्ये उत्क्रांती होत गेली. ह्या वस्तूंना अपारदर्शक परंतु शुभ्र धवल आवरण निर्माण झाले. १५ ते १८ व्या शतकातील माजोलिका (majolica) हा त्यातलाच एक झिलई प्रकार. हा झिलई प्रकार प्रथम इटलीत निघाला व नंतर इतर देशांमध्ये पसरला. कथिल ऑक्साइड वापरून ती पांढरी शुभ्र केलेली असल्यामुळे भाजल्यानंतर पात्रांची माती जरी लाल किंवा मळकट रंगाची असली, तरी झिलईनंतर ती पांढरी शुभ्र दिसतात. ही झिलई फ्रान्समध्ये ‘फायआन्स’ (faience) म्हणून ओळखली जाते. इंग्लिश ‘अर्दनवेयर’ हा त्यातलाच एक प्रकार आहे. त्यासाठी पांढरी माती वापरली जाते.

पर्शियन लोकांनी चिकणमातीपासून भांडी बनवून त्यांवर पिवळ्या व निळ्या रंगांची क्षारीय (अल्कलाइन) झिलई केलेली आढळते. पर्शिया व तुर्कस्तान या देशांतून मातीच्या भांड्यांना झिलई करण्याची कला स्पेनमध्ये गेली. बॅबिलोनियन आणि अँसिरियन (इ. स. पू. १२०० ते ५००) या संस्कृतींमध्ये बहुरंगी झिलई असलेल्या उठावदार भाजलेल्या विटांचा वापर प्रासाद व भिंती आकर्षक दिसाव्यात म्हणून केलेला दिसतो.

अश्मपात्र : (Stoneware)

मृत्तिकावस्तूंपेक्षा मजबूत, किंचित सच्छिद्र, अत्यल्प पाणी शोषण करणाऱ्या काचीकृत व रासायनिक द्रव्यांचा परिणाम होणार नाही अशी झिलई असलेल्या मृत्तिका-वस्तूंना अश्मपात्र असे म्हणतात. यांत कमी तापमानांस वितळणाऱ्या, ज्यांना गालक (उदा., फेल्डस्पार) म्हणतात अशी खनिजे मृत्तिका-वस्तूंसाठी वापरल्यास त्या वस्तूंना कठीणपणा व अपारदर्शित्व येते. जेव्हा चिकण मृत्तिका (चिकणमाती) व गालक यांचे मिश्रण १२०० डि. से. तापमानांस नेतात, तेव्हा चिकण मृत्तिकेच्या कणांवर काहीही परिणाम न झाल्याने ते वस्तूंचा आकार टिकवून धरतात व गालक पदार्थ वितळल्याने द्रवरूप होतो अथवा त्याचे काचीकरण होते. हा द्रव छिद्रांची जागा व्यापून वस्तूंना अच्छिद्र व अपारदर्शी बनवतो.

अपारपदर्शी लाल बांगड्या, हडप्पा संस्कृती

या प्रकारातील सर्वांत प्राचीन बांगड्या पूर्ण विकसित झालेल्या सिंधू संस्कृतीतील (इ. स. पू. २६००-१९००) हडप्पा येथे मिळाल्या आहेत. त्यांच्या मिळण्याच्या संख्येवरून तेथे मोठ्या प्रमाणात ह्या बांगड्या बनविल्या जात असाव्यात, असे तज्ञांचे मत आहे.

अश्मपात्र, हान वंश, चीन

केओलिनाइट ह्या पांढऱ्या मृत्तिकेतील अश्मपात्रे चीनमधील शांग (इ. स. पू. १४००) वंशाच्या कालावधीत बनवली गेली. चीनमधल्या अश्मपात्रांचा हा प्राथमिक काळ होता, ही १०५० ते ११५० डि. से. इतक्या तापमानावर भाजली असावीत. परंतु उच्च प्रतीची अश्मपात्रे बनवण्याचे यश चिनी लोकांना हान वंशामध्ये (इ. स. पू. २०६ ते इ. स. २२०)  प्राप्त झाल्याचे आढळते. पहिली शिसेयुक्त झिलई हान वंशाच्या अश्मपात्रांना दिसते आणि ह्या वंशाच्या शेवटापर्यंत कलाकारांनी अश्मपात्रांवर चुनायुक्त अथवा राखयुक्त फेल्डस्पारचे काचीकरण झालेली झिलई मिळवण्यात यश मिळवलेले दिसते.

हिरवी झिलई असलेले अश्मपात्र, हान वंश, चीन

पोर्सलीन : (Porcelain)

कठीण, अर्धपारदर्शक, प्रतिध्वनी निर्माण करणारे, धवल रंगातील बनवलेले आणि काचेसारख्या पदार्थात रूपांतरीत झालेले म्हणजे ‘पोर्सलीन’. हे नाव पोर्सलीना या शिंपल्याच्या अर्धपारदर्शकता या गुणावरून आले आहे. यांसाठी १२०० डि. से. ते १४५० डि. से. इतक्या तापमानाची आवश्यकता असते. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानात मात्र ‘पोर्सलीन’ ही संज्ञा झिलईदार किंवा बिनझिलईच्या, अर्धपार्य (अर्धपारदर्शक), बिनरंगी व उद्योगधंद्यात उपयोगी पडणाऱ्या वस्तूंसाठी वापरली जाते.

हान वंशानंतर जवळजवळ ४०० वर्षांनी म्हणजे थांग वंशात (इ. स. ६१८ ते ९०७) चिनी कुंभारांना प्रथमच पोर्सलीन बनवण्यात यश मिळाले. थांग वंशाच्या सुरवातीस पोर्सलीन मधल्या ‘डिंग वेअर’चे उत्पादन झाले. युआन वंशात तर (इ. स. १२७९ ते १३६८) शुभ्र चिनी पारदर्शक पोर्सलिनाच्या प्रगतीने उच्चांक गाठला. त्यासाठी त्यांनी केओलीन व पेतुन्स्त (फेल्डस्पारचा एक प्रकारचा दगड) यांची बारीक भुकटी करून तिचे मिश्रण वापरले. नंतरच्या काळात चिनी कलाकार विविध शैलीतील पोर्सलिनाचे उत्पादन करत राहिले.

पोर्सलीन वाडगा, चीन

मिंग वंशाच्या काळात निळ्या रंगातील नक्षीकाम असलेले म्हणजे निळ्या व पांढऱ्या रंगातील पोर्सलीनचे उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात झाले. मिंग वंशाच्या काळात व्यापाऱ्यांनी ही पांढरी शुभ्र भांडी आशिया, आफ्रिका व यूरोपमध्ये नेली. व्हेनिसचे प्रसिद्ध व्यापारी मार्को पोलो यांनी १२९८ मध्ये केलेल्या प्रवासवर्णनात या भांड्यांकरिता पोर्सलीन हा शब्द प्रथम वापरला. पोर्सलीन रेशीम मार्गाने (Silk Route), समुद्र मार्गाने आणि खुष्कीच्या मार्गाने उत्तर भारतात दिल्ली, नेवासे (महाराष्ट्र), पेरियापट्टणम्, मनलमडू अरिकामेडू (तामिळनाडू) पर्यंत पोचले.

संदर्भ :

  • Czechoslovakia, Science, vol. 246, no. 4933, 1989, p.p 1002-1008.
  • Habu, J., Ancient Jomon of Japan, Cambridge University Press, 2004.
  • Kenoyer Mark, J., Ancient Cities of the Indus Valley Civilization, Oxford University Press, 1998.
  • Mukhtar, Ahmed, Ancient Pakistan – An Archaeological History : Volume II : A Prelude to Civilization, Amazon, 2014.
  • Nelson, Glenn, Ceramics A Potter’s Handbook, Holt, Rinehart and Winston, Inc., 1971.
  • Sankalia, H. D. Prehistory and Protohistory of India and Pakistan, Bombay, 1963.
  •  Vandiver, Pamela B., et al. The Origins of Ceramic Technology at Dolni Vestonice.
  • ढवळीकर, म. के. कोणे एकेकाळी सिंधु संस्कृती,  पुणे, २००९.

समीक्षक : मनीषा पोळ

#terracocta#Terracotta##Porcelain#अश्मपात्र#Stoneware#पक्कमृदा#पोर्सलीन#काचिद् मृत्पात्रे#Glazed Earthenware#Pottery#Clay Art#मातीच्या वस्तू