सृष्ट्युत्पत्तीची एक प्रक्रिया. त्रिवृत्करण ही संकल्पना छांदोग्योपनिषदात स्पष्टपणे मांडलेली दिसून येते. याच उपनिषदात या संकल्पनेचा उगम झालेला दिसतो. जगाच्या आरंभी सर्वत्र फक्त ‘सत्’ असून ते एकमेवाद्वितीय होते. या मूळ ‘सत्’पासून ‘त्रिविध प्रकृती’ निर्माण झाली. या प्रकृतीस ‘तेजोबन्नात्मिका’ असे संबोधिले जाते. याचा अर्थ तेज, आप, पृथ्वी या तीन महाभूतांपासून तयार केलेली किंवा निर्माण झालेली प्रकृती. म्हणून तिला ‘त्रिविध प्रकृती’ असे म्हणतात.
त्रिवृत्करण म्हणजे तेज, आप आणि पृथ्वी या तीन महाभूतांचे विशिष्ट प्रमाणात घडून आलेले असे मिश्रण की, ज्यामुळे त्यांच्या अतिसूक्ष्म तन्मात्रांना अभिव्यक्त होणे शक्य होते. सामवेदात त्रिवृत्करण या संकल्पनेचा प्रथम संदर्भ आहे. छांदोग्योपनिषदातल्या सहाव्या अध्यायातील तिसऱ्या खंडात ऋषी उद्दालक आरुणी आणि श्वेतकेतू यांच्यातील संवादात या संकल्पनेचा उल्लेख आढळतो.
तदैक्षत् बहु स्याम प्रजायेयेति तत्तेजोsसृजत। (छांदोग्योपनिषद ६:२:३)
छांदोग्योपनिषदातील सहाव्या अध्यायातील दुसऱ्या खंडात असे वर्णन आहे की, हे दृश्य जगत निर्माण होण्यापूर्वी सर्वत्र केवळ ‘एकमेवाद्वितीय तत्त्व’ भरून राहिले होते. त्या ‘सत्’ने इच्छा केली की, मी अनेक व्हावे, मी प्रजा निर्माण करावी. त्या ‘सत्’मध्ये बुद्धी, अस्तित्व, ज्ञान आणि क्रियाशक्ती होती. त्याने प्रथम तेज उत्पन्न केले. या तेजापासून आप आणि अन्नदात्या पृथ्वीची निर्मिती झाली. त्यानंतर ‘सत्’ने या तीन महाभूतांमध्ये जीव बनून प्रवेश करून सगुण रूपात प्रकट होण्याचे ठरवले. तेज, आप, पृथ्वी या तीन देवता त्या वेळी अतिसूक्ष्म रूपाने म्हणजे तन्मात्रा स्वरूपातच अस्तित्वात होत्या. त्या व्यक्त झाल्या नव्हत्या. पण निर्गुण निराकाराला सगुण अभिव्यक्तीनंतर प्रकट होण्यासाठी आधी त्यांचे एकत्रीकरण किंवा मिश्रण होणे आवश्यक होते. हे जाणून त्याने –
तासां त्रिवृतं त्रिवृतमेकैकामकरोद्यथा तु खलु सोम्येमास्तिस्त्रो
देवतास्त्रिवृत्तिवृदेकैका भवति तन्मे विजानीहीति ।।४।। (छांदोग्योपनिषद ६:३:४)
या तीन तत्त्वांचे त्रिवृत्करण म्हणजे विशिष्ट प्रमाणात एकत्रीकरण केले. म्हणजे त्याने एकेका महाभूतांच्या तन्मात्रांना त्रिवृत केले. ते केल्यानंतर ती तिन्ही महाभूते व्यक्त स्वरूपात आली. मग ‘सत्’ तत्त्व (आत्मतत्त्व) त्यात प्रकटते झाले. अशाप्रकारे या तीन तत्त्वांची निर्मिती करून नंतर विशिष्ट प्रमाणात जे एकत्रीकरण केले, त्याला त्रिवृत्करण असे म्हणतात.
तेज, आप आणि पृथ्वी या मूळ तीन महाभूतांचे मिश्रण कसे होते, म्हणजेच त्रिवृत्करण कसे होते? तर या महाभूतांचे प्रत्येकी दोन समान भाग करून त्यांपैकी अर्धा भाग कायम ठेवायचा आणि राहिलेल्या अर्ध्या भागाचे दोन समान पोटभाग करावयाचे.
कोणतेही एक मूळ ‘महाभूत’ विचारात घेताना त्याचा अर्धा भाग आणि उरलेल्या दोन महाभूतांचा प्रत्येकी एकचतुर्थांश असे तिन्ही मिळून एक मूळ ‘महाभूत’ तयार होते, असे या संकल्पनेत मानले जाते.
उदाहरणार्थ : अ) ‘पृथ्वी’ या महाभूताचे त्रिवृत्करण : १/२ पृथ्वी + १/४ आप + १/४ तेज = पृथ्वी हे महाभूत.
ब) ‘आप’ या महाभूताचे त्रिवृत्करण : १/२ आप + १/४ पृथ्वी + १/४ तेज = ‘आप’ हे महाभूत.
क) ‘तेज’ या महाभूताचे त्रिवृत्करण : १/२ तेज + १/४ पृथ्वी + १/४ आप = तेज हे महाभूत.
थोडक्यात, आपल्याला अनुभवता येतील अशी इंद्रियग्राह्य असलेली जी तीन महाभूते आहेत, ती एकमेकांच्या कमीअधिक पण निश्चित प्रमाणांच्या संमिश्रणातून तयार झालेली आहेत.
पृथ्वी, आप, तेज या महाभूतांचे अनुक्रमे काळा, पांढरा आणि तांबडा हे रंग आहेत, असे छांदोग्योपनिषदात सांगितलेले आहे. या तीन रंगांचा संदर्भ घेऊन सांख्यकारांनी प्रकृतीच्या सत्त्व-रज-तम या तीन गुणांशी मेळ घातला आहे. या तीन रंगांची ही तीन महाभूतेच तेवढी खरी असे सांख्यकार मानतात. आद्य शंकराचार्य आणि रामानुजाचार्य यांनीही सृष्टीच्या उत्पत्तीसंदर्भात स्पष्टीकरण देताना या संकल्पनेचा आधार घेतला होता, असे दिसून येते. या मूळ आधार असलेल्या अशा तीन महातत्त्वांपासूनच सूर्य, चंद्र, विद्युत इत्यादी अनेकविध नामरूपात्मक, विकारात्मक आणि भासमय पदार्थ उत्पन्न झालेले आहेत, असे छांदोग्योपनिषदात प्रतिपादित केले आहे.
दृष्यमान असलेली प्रत्येक वस्तू अशा रीतीने मुळात ही तीन महाभूतेच आहेत. भविष्यात सृष्टीच्या उत्पत्तीची कारणे शोधताना या संकल्पनेचा उपयोग होऊ शकतो.
संदर्भ :
- फडके, पुरुषोत्तमशास्त्री; दुनाखे, अंशुमती, सार्थ छांदोग्य उपनिषद, पुणे, २०१४.
- रानडे, रा. द.; अनु. गजेंद्रगडकर, कृ. वें. उपनिषद्रहस्य, निंबाळ, २००३.
समीक्षक : ललिता नामजोशी