जैविक उत्क्रांतीच्या एकंदर प्रक्रियेत ‘नैसर्गिक निवड’ हे महत्त्वाचे सूत्र वारंवार आढळून आले आहे. निसर्गचक्रात वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव यांचे परस्परसंबंधदेखील यांवरच आधारित आहेत. उत्क्रांतीच्या विविध टप्प्यांवर वनस्पतींचे त्यांच्या समुदायातील अन्य प्रजातींशी आणि इतर प्राणी किंवा सूक्ष्मजीव यांच्याशी नाते विकसित झाले. त्यांच्या मुळाशी आढळणारी कवके किंवा परागीभवन करणारे कीटक यांच्याबरोबर ते लाभदायी ठरले, तर वनस्पतिभक्षी किंवा रोगकारक जीवाणू, विषाणू यांच्याबरोबर ते त्रासदायक ठरले. अन्नसाखळीतील उत्पादक हे अतिशय महत्त्वाचे आणि प्रारंभिक घटक असल्याने वनस्पती जसजशा उत्क्रांत होत गेल्या; त्यांच्याबरोबरच त्यांच्यावर उदरनिर्वाह करणाऱ्या वनस्पतिभक्षी प्राण्यांचाही विकास होत गेला. या सगळ्या आक्रमक भक्षकांपासून आणि रोगकारक जीवाणू, विषाणू किंवा बुरशीवर्गीय घटकांपासून स्वत:चे रक्षण करण्याच्या अनेक पद्धती वनस्पतींनी विकसित केल्या. या सुरक्षा पद्धतींचेही आकलन उत्क्रांतीच्या अभ्यासातून करता येते.
वनस्पतिभक्षी कीटक व बुरशी यांच्या आक्रमणामुळे वनस्पतींच्या शारीरक्रियेवर एक प्रकारचा ताण येतो. त्याचा प्रतिकार करण्यासाठी वनस्पती विविध मार्ग अवलंबताना दिसतात. त्यात अगदी पाने किंवा खोडाभोवती काटेरी संरक्षक जाळे तयार करण्यापासून ते खास विषारी रसायनांची निर्मिती करण्यापर्यंतचा वापर होताना दिसतो. जॅकबीन (कॅनॅव्हालीस इंसीफोर्मीस) या वनस्पतीत ‘कॅनॅव्हीनीन’ हे प्रथिनक तयार होत असते. या कॅनॅव्हीनीनची रासायनिक रचना ही ‘अर्जीनीन’ या मूळ प्रथिनकाशी मिळतीजुळती असल्यामुळे या वनस्पतींचे भक्षण करणाऱ्या कीटकांच्या शरीरातील अनेक प्रथिनांच्या जडणघडणीत वनस्पतीतून पोहोचलेला कॅनॅव्हीनीन प्रथिनक हे मूळ अर्जीनीनची जागा घेते. त्यामुळे या प्रथिनकाद्वारे पुढे निर्माण होणा-या विविध प्रथिनांची उत्पादकता आणि कार्यक्षमता यावर विपरीत परिणाम होतो आणि पर्यायाने कीटकांचा मृत्यू होतो.
काही वनस्पती ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ या तत्त्वाचा अवलंब करतात. या प्रकारच्या संरक्षक व्यवस्थेत वनस्पतिभक्षी कीटकांच्या अळ्या वनस्पतींची पाने कुरतडायला लागतात. त्याच वेळी या अळ्याच्या लाळेतील विशिष्ट पदार्थांमुळे या वनस्पतीतून काही विशिष्ट बाष्पीभूत रसायने स्रवली जातात. या रसायनांमुळे अळ्या खाणारे इतर कीटक आकर्षित होऊन ते या अळ्यांचा फडशा पाडतात. यांशिवाय ही रसायने आसपासच्या अबाधित वनस्पतींना संभाव्य धोक्याची सूचनाही देतात. ही एकंदर प्रक्रिया सप्रमाण सिद्ध करण्यासाठी वैज्ञानिकानी ॲरेबिडॉप्सीस या प्रयोगी वनस्पतीत अशी रसायने निर्माण करणा-या जनुकांचे मुद्दाम रोपण केले. विशेष म्हणजे या रसायनांमुळे एरवी या वनस्पतीकडे आकर्षित न होणारे परभक्षी आकर्षित झाल्याचे सिद्ध झाले आहे.
समीक्षक : डॉ.बाळ फोंडके