आवेष्टित जलशुद्धीकरण संयंत्र (उभा काटच्छेद)

काही विशिष्ट परिस्थितीमध्ये पाण्याचे शुद्धीकरण करून देऊ शकणारी आटोपशीर आणि सहज हलवता येण्यासारखी यंत्रणा म्हणजे आवेष्टित जल संस्करण संयंत्र (Package Water Treatment Plants).  ह्या यंत्रणेचा उपयोग पूर, भूकंप किंवा इतर नैसर्गिक आपत्तींमध्ये, तसेच शहरापासून दूर असणाऱ्या छोट्या मानवी वस्त्यांमध्ये आणि खेडेगावांमध्ये पिण्याचे पाणी उत्पन्न करण्यासाठी होतो. अशा यंत्रणेला कमी जागा लागत असल्यामुळे ती शहरांमधील झोपडपट्ट्यांमध्ये सुद्धा वापरून काही अंशी पाणी पुरवठ्याचे विकेंद्रीकरण करता येते.  तसेच कुंभमेळा, सिंहस्थ, वारी इत्यादी प्रसंगी, जेथे थोड्या काळासाठी मोठ्या लोकसंख्येला पेयजल पुरविणे आवश्यक असते,  अशा ठिकाणी ही यंत्रणा अतिशय उपयुक्त ठरते.  तिच्यामधील शुद्धीकरणाच्या प्रक्रिया मोठ्या यंत्रणेमधील प्रक्रियेसारख्या असतात.  उदा., वायुमिश्रण (Gas transfer), द्रुतमिश्रण (Flash mixing), किलाटन (Coagulation), कणसंकलन (Flocculation), निवळण (Settling), निर्जंतुकीकरण (Disinfection) इत्यादी, परंतु पाण्यामधील इतर दूषितके उदा., फ्ल्युओराईडे, आर्सेनिक, लोह, मँगॅनीज इ. काढण्यासाठी अतिरिक्त प्रक्रिया वापराव्या लागतात.  युद्धकाळात आणि आघाडीवर असणाऱ्या सैन्याला सुरक्षित पेयजल पुरविण्याची महत्त्वाची कामगिरी ही यंत्रणा करू शकते.  कोणत्या अतिरिक्त प्रक्रिया वापरायच्या हे पाण्याच्या रासायनिक पृथःकरणावरून ठरवले जाते, त्यामुळे सर्व ठिकाणी एकच प्रकारचा आराखडा (Design) वापरता येत नाही.  ही संपूर्ण यंत्रणा सहसा पोलादाच्या पत्र्यापासून बनविली जाते, पण ती कायम एकाच जागी वापरायची असेल तर R.C.C. आणि पोलादी पत्रे वापरता येतात.

ह्या प्रकारच्या संयंत्रांची बांधणी करताना लक्षात घेण्याच्या महत्त्वाच्या गोष्टी – १) हे वजनाला हलके असावे, २) चालवण्यास सोपे असावे, ३) ह्यामध्ये यांत्रिक भाग कमीतकमी असावेत, ४) ह्याला चालविण्यासाठी कमीतकमी वीज लागावी, ५) कच्च्या पाण्याच्या बदलत्या प्रतीनुसार ह्यामध्ये शुद्धीकरण प्रक्रिया सहजपणे बदलता यावी. थोडक्यात, ह्यामध्ये शक्यतो सर्व शुद्धीकरण प्रक्रिया उपलब्ध असाव्यात, जेणेकरून शुद्धीकरण प्रक्रिया सहजपणे बदलता येईल आणि पिण्यालायक पाणी सातत्याने मिळत राहील.

संदर्भ :

  • Manual on water supply and treatment – 3rd Revised and updated Central Public Health and Environment Engineering Organisation, Ministry of Urban Development, New Delhi, May 1999.
  • Waste water Engineering Treatment and reuse, 4th ed., Metcalf and ed., Tata McGraw Hill Publishing Co., Ltd., New Delhi 2003

समीक्षक : सुहासिनी माढेकर