टर्नर, फ्रेडरिक जॅक्सन : (१४ नोव्हेंबर १८६१—१४ मार्च १९३२). एक प्रसिद्ध अमेरिकन इतिहासकार. पॉर्टिज (विस्कॉन्सिन) येथे जन्म. विस्कॉन्सिन विद्यापीठातून बी. ए. (१८८४) व एम्. ए. (१८८८) या पदव्या घेऊन तेथेच तो प्राध्यापक झाला. तेथे त्याची वुड्रो विल्सनसारख्या काही हुशार विद्यार्थ्यांशी ओळख झाली आणि पुढे त्यांच्याशी मैत्रीही जडली. त्याने १८९० मध्ये जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातून पीएच्.डी. ही पदवी घेतली. त्याचा विषय होता द कॅरॅक्टर अँड इन्फ्ल्युअन्स ऑफ द इंडियन ट्रेड इन विस्कॉन्सिन. शिकागो येथील कॅरोलिन या मुलीबरोबर त्यांने १८८९ मध्ये विवाह केला.

प्राध्यापक म्हणून विस्कॉन्सिन विद्यापीठात (१८८५—१९१०) अध्यापन केल्यानंतर त्याची हार्व्हर्ड विद्यापीठात प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली (१९१०—२४). १९२४ मध्ये निवृत्त झाल्यावर तो हेन्री ई. हटिंग्टन ग्रंथालयात सहसंशोधक म्हणून गेला आणि अखेरपर्यंत तेथेच राहिला. तेथे असताना त्याने इतिहास विषयात संशोधन केले. अमेरिकन इतिहासातील सीमा व त्यांचे महत्त्व ह्यांविषयी शिकागो येथील ऐतिहासिक परिषदेत त्याने मांडलेले सिद्धांत आणि त्याची नव-इतिहासाची कल्पना, ह्यांमुळे त्यास आधुनिक इतिहासकारांत विशेष स्थान प्राप्त झाले. त्याने स्फुट आणि निबंधात्मक अनेक लेख लिहिले. पॅसाडीना (कॅलिफोर्निया) येथे तो मरण पावला. त्याची काही पुस्तके मृत्यूनंतर प्रसिद्ध झाली. त्याचे महत्त्वाचे ग्रंथ : द राइज ऑफ द न्यू वेस्ट (१९०६); युनायटेड स्टेट्स, १८३०–१८५०; द नेशन अँड इट्स सेक्शन्स (१९३५); द फ्रॉन्टिअर इन अमेरिकन हिस्टरी (१९२०); द सिग्निफिकन्स ऑफ सेक्शन्स इन अमेरिकन हिस्टरी (१९३२). त्याच्या या अखेरच्या ग्रंथास १९३३ मध्ये पुलिट्झर पारितोषिक मिळाले.

 

 

 

संदर्भ :

  • Benson, Lee, Turner and Beard, Toronto, 1960.