वडार देव्हाऱ्यावरील चित्रकला : गावगाड्याच्या परिघाबाहेर भटक्या जातिजमाती हजारो वर्षे समाजाकरिता विविध भूमिका बजावताना दिसतात. त्यांतील वडार ही एक कष्टकरी जात. आंध्र, कर्नाटक आणि महाराष्ट्र या भूभागांत ते भटके जीवन व्यतीत करीत. हे धार्मिक प्रवृत्तीचे पापभीरू लोक. त्यांच्यामध्ये प्रामुख्याने मातृदेवतांचे पूजन होते. दुर्गामाता ही त्यांतील प्रमुख देवता. ते बांबूच्या टोपलीमध्ये देव आणि प्रतिमा ठेवत. चित्रांकित लाकडी देव्हारा हे त्यांचे प्रगत स्वरूप असले, तरी १८ व्या शतकापर्यंत त्यांचा मागोवा घेता येतो. वडार लोक घराजवळ देवाचा देव्हारा स्थापन करतात. त्याला ते गुडी म्हणतात. अशा देव्हाऱ्यांचे अनेक आकार-प्रकार आहेत. त्यांतील एक प्रकार म्हणजे पेटीनुमा चित्रमय देव्हारा. देव्हाऱ्याच्या चारही बाजूंना चित्रे काढलेली असतात. असे देव्हारे लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, गुलबर्गा, पुणे, चिकोडी, अक्कलकोट येथे आढळले आहेत.
वडार देव्हारा चित्रशैलीचे मूळ आंध्रमधील पटचित्र परंपरेत सापडते. आंध्रमधील पटचित्र कथनपरंपरेला जातिपुराण असे म्हणतात. समाजातील सर्व जातींमध्ये आत्मगौरव, अस्मिता आणि आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम जातिपुराणाद्वारे केले जाते आणि एका अर्थाने जातीय व्यवस्था दृढ करण्याचे काम जातिपुराणाद्वारे होते असेही म्हणता येते. या जातिपुराणात पटचित्र आणि मूर्तीच्या आधारे गायन, वादनासह जातीच्या मूळ पुरुषाची कथा सादर केली जाते. प्रत्येक जातीचे स्वतंत्र जातिपुराण असते आणि कथन करणारी स्वतंत्र उपजात असते. महाराष्ट्रात मांग लोकांचे जातिपुराण पटचित्राद्वारे सांगणारी जात म्हणजे डक्कलवार. वडारांचे जातिपुराण नसले, तरी देव्हाऱ्यावरील चित्रांत त्याचे प्रतिबिंब दिसून येते.
आपल्या श्रमिक जीवनामुळे काही वडार भगीरथाला आपला पूर्वज मानतात, तर काही वडारांचे कुलदैवत मारुती आहे. प्रामुख्याने मातृदेवता पूजणाऱ्या वडारांनी पौराणिक देवतांचा स्वीकार कालांतराने केला असावा. मारुतीला वडारांनी स्वीकारणे त्यांच्या श्रमिकतेमुळे स्वाभाविक आहे. मारुतीचे चित्र काही देव्हाऱ्यांवर आढळते. वनवासामध्ये सुवर्णमृगाच्या कातडीचा मोह सीतेला पडतो. त्या कातडीची चोळी शिवावी, असे तिला वाटते. चोळीच्या मोहापोटी सीतेच्या पदरी जे दुःख पडले, ते नको म्हणून वडार स्त्रियांमध्ये चोळी न घालण्याची प्रथा होती. वडार देव्हाऱ्यांवर सुवर्णमृगाचे चित्र फारसे दिसून येत नाही; तर सीतास्वयंवर तसेच वनवासातील राम, लक्ष्मण, हनुमान असे चित्र बऱ्याच देव्हाऱ्यांवर आढळते.
स्वतःच्या जातीच्या मूळ पुरुषाची कथा उद्धृत करण्याची जातिपुराणाची प्रेरणा वडार देव्हाऱ्यावर अनेक पद्धतींनी येते. छ. शिवाजी महाराजांच्या किल्लेबांधणी आणि देखभालीत वडार समाजाचा मोठा सहभाग होता. महाराजांच्या बाबतीतील एक प्रचलित कथाचित्र वडार देव्हाऱ्यावर दिसून येते. यात छ. शिवाजी महाराज, रामदास स्वामी आणि दगड फोडणारे वडार दिसतात. तसेच फोडलेल्या दगडातून जिवंत बेडूक बाहेर येत असल्याचे चित्रण आहे. या कथेतून स्वराज्याच्या किल्लेबांधकामातील वडारांचे योगदान अप्रत्यक्षपणे अधोरेखित होताना दिसते.
वडार ज्या प्रदेशांत राहिले, तेथे ते एकजीव झाले. तेथील परंपरा, श्रद्धा, उपासना त्यांनी स्वीकारल्याचे दिसते. काही गावांत देवाचा रथ असतो. यात्रेच्या वेळेला या रथातून या देवदेवतांची मिरवणूक काढली जाते. या भव्य रथांची चाके सात-आठ फूट इतकी उंच असून काही वेळा ती दगडाची असतात. अशा रथांना ओढण्याचा मान वडारांचा असतो. लातूर भागातील काही वडार देव्हाऱ्यांवर अशा रथाचे चित्र आढळते. प्रत्येक जातीच्या कामाला प्रतिष्ठा आणि आत्मसन्मान देण्याचे काम जातिपुराणाने केल्याचे दिसते. तीच प्रवृत्ती वडारांच्या चित्रांकित देव्हाऱ्यांतून दिसून येते.
आज भारतात एकही खेडे असे नाही की, जेथे ग्रामदेवता, मातृदेवता यांची मंदिरे नाहीत. मातृसत्ताक पद्धती दक्षिण भारतात तुलनेने बराच काळ रेंगाळलेली दिसते. मातृसंस्कृतीची जसजशी पीछेहाट होत गेली, तसतशा पौराणिक देवता लोकप्रिय होत गेल्या. पण समाजातील ज्या जातिजमातींनी मातृदेवतांचे पूजन चालू ठेवले, त्या जातिजमाती प्रायः मागासलेल्या दिसून येतात. आर्यांच्या पुरुषदेवतांची उपासना न स्वीकारणाऱ्या जातिजमातींत शूद्र, भटके यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात आढळतो. वडारांच्या उपासनेचे हे व्यवच्छेदक लक्षण दिसते. या देवतांच्या लाकडी मूर्ती वडार देव्हाऱ्यात असतात. सिंह, हत्ती, वाघ, घोडा अशा वाहनांवर बसलेल्या देवता असतात. देवतांच्या वाहनावरून देवतेचे निश्चित असे नाव असेलच, असे नाही. काही ठिकाणी त्या सप्तमातृका स्वरूपात असतात, तर बहुधा छोटी आई, मोठी आई अशा स्वरूपांत जोडीने असतात. काही देव्हाऱ्यांत या देवतांबरोबर तिची मुले व भाऊ यांच्या मूर्ती असतात. पुरुषसहकारी अथवा पतीशिवाय असणाऱ्या या देवता मातृसंस्कृतीतीलच आहेत, असे ठामपणे म्हणता येते. या मूर्तींबरोबरच या देवतांची चित्रेदेखील देव्हाऱ्यावर असतात. वडारात नदीकाठी अथवा जलाशयाकाठी जलदी सोहळा होतो. या जलपूजनात वडार कुलातील स्त्रीच्या अंगात देवी येते. तिच्या डोक्यावरून हा देव्हारा वडार वस्तीत नेला जातो. वडार उपासनेचा तो आविष्कार आहे. वडार कुलातील ज्या पुरुषाच्या अंगात येते, तो देवऋषी तसेच पोतराज म्हणून ओळखला जातो. या पोतराजाचे चित्र वडार देव्हाऱ्यावर असते.
वडार लोक अंगमेहनतीची कामे करतात. थकलेल्या शरीराला विश्रांतीसाठी मद्याचे सेवन केले जाते. मद्याचे स्थान केवळ श्रमपरिहारापुरते नसून प्रत्येक सणउत्सवात मद्याचा अंतर्भाव असतो. पितरांनादेखील मद्य अर्पण केले जाते. मद्यप्राशनाचे चित्र वडार देव्हाऱ्यावर क्वचित दिसते. आंध्र प्रदेशात मात्र ग्रामदेवतांच्या देवळांच्या भिंतींवर मद्यप्राशनाची चित्रे सर्रासपणे आढळतात. सकाम भक्ती करणाऱ्या वडार समाजात देवीला बकरे, कोंबडे अर्पण केले जाते. या विषयावरील चित्रे देव्हाऱ्यावर चित्रित केलेली असतात.
१८६० पासून इंग्रजांनी भारतात पायाभूत सुविधांचा विकास करायला सुरुवात केली. रेल्वे, रस्ते, टपाल कार्यालय (पोस्ट ऑफिस) यांचे जाळे सुरू केले. या कामाकरिता त्यांना मजुरांची आवश्यकता होती. वडार हे भारतातील बांधकाममजूर तसेच दगडकामातील तज्ज्ञ होते. या नव्या आर्थिक संधीमध्ये काही वडारांना कामे आणि रोजगार मिळाला. या साऱ्याचे प्रतिबिंब वडार देव्हाऱ्यावरील काही चित्रांत दिसते. काही चित्रांत टपालवाहक (पोस्टमन), पोलीस, सायकलस्वार असे चित्र काढलेले दिसते, तर काही चित्रांत इंग्रज अधिकारी शिकार करीत आहे आणि त्याला साहाय्य करणारा भारतीय माणूस दाखविला आहे. बहुधा तो वडार असावा. तसेच काही चित्रांत इंग्रज सैनिकांची कवाईत (परेड) आणि वाद्यपथक (बँड) यांचे चित्र असते.
१८७१ च्या इंग्रजांच्या गुन्हेगार कायद्यानुसार अनेक भटक्या जातींना जन्मजात गुन्हेगार ठरविण्यात आले. या कायद्यामुळे वडार जातीवर जन्मजात गुन्हेगारीचा शिक्का बसला. त्यातून त्यांनी किती जुलूम सोसले असतील, याचा आपण अंदाज करू शकतो. त्याचे प्रत्यंतर येणारे एक चित्र वडारांच्या देव्हाऱ्यावर आढळते. या चित्रात न्यायालयात खटला चालू आहे. पोलीस, पट्टेवाला, कारकून, वकील इ. पात्रे यथोचितपणे दाखविली आहेत. एक वडार माणूस आरोपीच्या पिंजऱ्यात आहे. त्याचे हात दोरीने बांधले आहेत. हा वडार माणूस हात जोडून नमस्कार करतो आहे, असे चित्रण केलेले दिसते. अशा रीतीने वडार देव्हाऱ्यावरील विविध चित्रांतून या समाजाचे दर्शन होते.
संदर्भ :
- Enthoven, R. E. The Tribes and Castes of Bombay, Vol : 3, Bombay, 1920.
- पवार, सतीश वडार समाज आणि संस्कृती, कोल्हापूर, २०१०.
- मांडे, प्रभाकर गावगाड्याबाहेर, औरंगाबाद, १९८३.
- सामंत, मंगला स्त्री-पर्व, पुणे, २०००.