‘बिनाले’ (Biennale) किंवा ‘बायएनिअलʼ या शब्दाचा मराठीतील अर्थ ‘द्वैवार्षिक’ असा आहे. दर दोन वर्षांनी आयोजित होणारे कलाप्रदर्शन, दृश्यकला महोत्सव एवढेच या प्रदर्शनांचे मर्यादित स्वरूप नसून, एकूणच स्थानिक समूह आणि आंतरराष्ट्रीय मानवसमूहाला एकत्र येण्याचे व्यासपीठ, असाही अन्वयार्थ अभिप्रेत असतो.
‘बिनाले’ किंवा ‘बायएनिअलʼ या उपक्रमांना सर्वसाधारणतः ‘अस्थिर संस्था’ असेदेखील संबोधले जाते. त्याचे कारण म्हणजे जागतिकीकरण. एकूणच १९८० च्या दशकाच्या मध्यावर जगभर बिनालेचे जणू जाळे निर्माण झाले. पांढऱ्याशुभ्र भिंती व वरून झगझगीत प्रकाश असणारे आकर्षक कलादालन यांच्याबाहेर कलाकृती येण्याचा हा काळ होता. कलादालनांपेक्षा लोकांच्या रोजच्या वावरण्याच्या ठिकाणी प्रदर्शने झाली, लोकांनी सतत येता-जाता कलाकृती, प्रदर्शने न्याहाळली, त्यांचा आस्वाद घेतला, तर दालनांच्या बंदिस्त भिंतींच्या आतील प्रदर्शनांना येणाऱ्या विशिष्ट वर्गापेक्षा जास्त लोकांपर्यंत त्या कलाकृती पोहोचू शकतील, असे विचार पुढे आले आणि जणू एखाद्या क्रांतीप्रमाणे जगभर ‘बिनाले’ नावाचे कार्यक्रम आयोजित होऊ लागले. त्यांना ‘अस्थिर संस्था’ मानण्याचे कारण म्हणजे, दर दोन वर्षांनी प्रदर्शनमांडणीचे स्वरूप आमूलाग्र बदलत जाते. तात्पुरत्या स्वरूपाचे मांडव उभारणे, उपलब्ध जागांचे स्वरूप बदलणे, एखाद्या जुन्या किंवा दुर्लक्षित वास्तूचे स्वरूप तसेच ठेवून तेथे कलाकृती प्रदर्शित करणे, असे विविध बदल होत असतात. बहुतांश वेळा ज्या शहरामध्ये ‘बिनाले’ होत असत, त्या शहराचे नाव त्या महोत्सवाला दिले जाते. उदा., व्हेनिस बिनाले (१८९५), पॅरिस द बिनाले, शांघाय बिनाले इत्यादी.
दृश्यकलांच्या महोत्सवाचा एक कलासंयोजक (Art Curator) असतो. त्याचे काम मानाचे मानले जाते. महोत्सवातील कलाकृती आणि कलाकार निवडण्याचे काम हा संयोजक करीत असतो. कलांचे असे उरूस किंवा जत्रा काही महिने सुरू असतात. आजच्या कलाकृती, त्यांमागील विचार, सौंदर्याचे बदलते अर्थ, तंत्र हे सगळे लोकांपर्यंत पोहोचावे हा मुख्य उद्देश असतो. संपूर्ण शहर यामध्ये सहभागी असते. देश-विदेशांतून चित्रकार, शिल्पकार, चित्रपटकार असे नाना प्रकारच्या दृश्य माध्यमांत कलाकृती साकारणारे निवडक कलावंत बोलावले जातात. जागेची पाहणी, त्याप्रमाणे मांडणीचे नियोजन वगैरे बाबी जवळजवळ वर्षभर आधीच सुरू होतात. ही एक मोठी यंत्रणा असते. आर्थिक व्यवहार खूप मोठ्या प्रमाणावर असले, तरी उलाढाली वगैरे होणे अपेक्षित नसून, समाजभिमुखता महत्त्वाची मानली जाते. किती लाख प्रेक्षकांनी बिनाले पाहिले, अशा गोष्टी महत्त्वाच्या मानल्या जातात. प्रायोगिकता हा बिनाले-उत्सवाचा कणा मानता येईल. कलाकृतींचे स्वरूप अवाढव्य असते. चित्रपट, चित्रकला, मांडणी शिल्प, कलेविषयक व्याख्याने, चर्चासत्रे, विद्यार्थी विभाग, संगीत विभाग अशा विविध विभागांचे बिनाले म्हणजे भव्य व भरगच्च अवकाश असते. भारतात अशी बिनाले अगदी अलीकडच्या काळात सुरू झाली आहेत. १२ डिसेंबर २०१२ रोजी केरळमधील कोची येथे सुरू झालेले कोची बिनाले हे भारतातील पहिले व अग्रगण्य द्वैवार्षिक कलाप्रदर्शन होय.