बी. आय. एस. हे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डस या नावाचे संक्षिप्त रूप आहे. ही भारतीय राष्ट्रीय मानक संस्था सुरुवातीला इंडियन स्टँडर्डस (आय. एस.) या नावाने ओळखली जात असे. तिची स्थापना १९४६ मध्ये झाली. १८६० च्या सोसायटी रजिस्ट्रेशन ॲक्ट अंतर्गत या संस्थेची नोंदणी झाली होती. १९८६ मध्ये नवीन नाव घेऊन ती केंद्रिय ग्राहकहित, अन्न आणि सार्वजनिक वाटप या खात्याच्या अखत्यारीत आली.
संरचना : बी. आय. एस. या सांघिक संस्थेत राज्य व केंद्रिय सरकार, विज्ञान संशोधन संस्था, ग्राहक पंचायत यांमधून निवडलेले २५ सदस्य सहभागी असतात. या संस्थेचे मुख्यालय दिल्ली येथे आहे. कोलकता, चेन्नई, मुंबई व चंडीगढ येथे या संस्थेच्या शाखा आहेत.
कार्यक्षेत्र : या संस्थेवर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन (WTO) या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या टेक्निकल बॅरीयर टू ट्रेड या कराराची भारतात अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. २०१५ मध्ये मंजूर झालेल्या इंडियन स्टँडर्डस बिलानुसार निरनिराळी उत्पादने, विविध सेवा, भिन्न पदार्थ, प्रक्रिया आणि पध्दती यांचे मानकीकरण करण्याची जबाबदारी या संस्थेवर सोपविण्यात आली.
याशिवाय औद्योगिक संस्थांना प्रमाणपत्रे देणे, प्रशिक्षण देणे, विकसित देशांना प्रशिक्षणासाठी सहकार्य करणे आणि मानकीकरण करण्याची जबाबदारी या संस्थेवर सोपविण्यात आली.
बी. आय. एस. च्या देशात ८ प्रयोगशाळा आहेत. या प्रयोगशाळांमध्ये रसायने, अन्न, विद्युत, यंत्रे यांच्याशी निगडित नमुने संबधित मानकानुसार तपासले जातात. या संस्थेतर्फे विविध प्रयोगशाळांना दर्जा प्रमाणपत्र देण्याचे कार्यदेखील होते. ही संस्था लघुद्योगांना उत्तेजन देण्याची जबाबदारीसुध्दा घेते. ही संस्था इंटरनॅशनल स्टँडर्डस ऑर्गनायझेशन, आय. एस. ओ. (ISO) या आंतरराष्ट्रीय मानकसंस्थेची संस्थापक-सदस्य आहे आणि तिचे देशात प्रतिनिधित्वदेखील करते.
विविध क्षेत्रासाठी भारतीय मानके निर्माण करणे, त्यांची अचूकतेसंबधी शहानिशा करणे आणि प्रसार करणे हे बी. आय. एस. चे पायाभूत कार्य होय. जानेवारी २०१९ पर्यंत या संस्थेने सु. २०,००० मानके तयार केली आहेत. गुणवत्ता, पर्यावरण, अन्न, व्यावसायिक स्वास्थ्य व सुरक्षा, वैद्यकीय साधने, रस्ते, दुग्ध उत्पादने, सामाजिक बांधिलकी, आपत्ती निवारण, ऊर्जा संवर्धन अशा क्षेत्रात सुयोग्य व्यवस्थापनासाठी ही संस्था मार्गदर्शन करते. आपले उत्पादन निर्यात करणाऱ्या तसेच देशात आयात होणाऱ्या उत्पादनासाठी बी.आय.एस.ने मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत.
तसेच इंटरनॅशनल इलेक्ट्रोटेक्निकल कमिशन, आय. ई. सी. (IEC) आणि दी वर्ल्ड स्टँडर्डस सर्व्हिस नेटवर्क (WSSN) या संघटनांचे ती देशामध्ये प्रतिनिधित्व करते.
इंटरनॅशनल इलेक्ट्रोटेक्निकल कमिशन (IEC) : ही आंतरराष्ट्रीय संस्था इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक व संबंधित विषयावर मानके तयार करून प्रकाशित करत असते. ही संस्था ऊर्जानिर्मिती, ऊर्जेची वाहतूक आणि वाटप यासंबधीच्या क्षेत्रात मार्गदर्शन करते.
समीक्षक : हेमचंद्र प्रधान
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.