सीमोर बेन्झर

बेन्झर, सीमोर : (१५ ऑक्टोबर १९२१ — ३० नोव्हेंबर २००७).

अमेरिकन भौतिकीविज्ञ आणि रेणवीय जीवशास्त्रज्ञ. बेन्झर यांचा जन्म बेन्सनहर्स्ट (Bensonhurst), ब्रुकलीन येथे झाला. ब्रुकलीन महाविद्यालयातून त्यांनी भौतिकी विषयामध्ये पदवी घेतली. त्यांनी पर्ड्यू विद्यापीठातून घन अवस्था भौतिकी यामध्ये पीएच. डी. मिळवली (१९४७). नंतर त्यांची पर्ड्यू विद्यापीठात भौतिकशास्त्र साहाय्‍यक म्हणून नियुक्ती झाली (१९४७).

एर्व्हीन श्रोडिंजर यांचे जनुके आणि आनुवंशिकी याबाबतच्या लेखन बेन्झर यांच्या वाचनात आले. त्यामुळे ते प्रभावित झाले आणि त्यांना जीवशास्त्राचा अभ्यास सुरू केला. सूक्ष्मजंतुभक्ष्यी आनुवंशिकी (bacteriophage genetics) या विषयावर त्यांनी संशोधन केले. बेन्‍झर यांनी अनेक प्रकारच्या उत्परिवर्तनांचा (mutation) अभ्यास केला. उत्परिवर्तनाचे बहिष्करण (deletion), कण उत्परिवर्तन (point mutation), संकरित संवेद्य उत्परिवर्तन (missense mutation) आणि निरर्थक उत्परिवर्तन (nonsense mutations) अशा प्रमुख गटांमध्ये त्यांनी वर्गीकरण केले. बेन्झर यांनी इतर संशोधन सहकाऱ्यांसोबत प्रकाशीय अक्ष (photoaxis) आणि प्रकाशउद्दीपित जैवचक्र (circadian rhythms) यांवर देखील संशोधन केले.

 

 

बेन्‍झर यांना त्यांच्या संशोधनपर कार्याकरिता अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यांपैकी काही पुढीलप्रमाणे : लास्कर पुरस्कार (१९७१); इझ्राएलतर्फे हार्वे पारितोषिक (१९७७); रॉयल सोसायटी ऑफ लंडन या संस्थेतर्फे जॅफे पुरस्कार (१९८२); नॅशनल मेडल ऑफ सायन्स (१९८३); जेनेटिक्स सोसायटी ऑफ अमेरिका या संस्थेतर्फे थॉमस हंट मॉर्गन पदक (१९८६); इझ्राएलतर्फे वैद्यकीय संशोधनाकरिता वुल्फ पारितोषिक (१९९१); रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेस या संस्थेतर्फे क्राफूर्ड पुरस्कार (१९९३); जेनेटिकल सोसायटी ऑफ ग्रेट ब्रिटन या संस्थेतर्फे मेंडेल पुरस्कार (१९९४); जपानतर्फे इंटरनॅशनल प्राइझ फॉर बायॉलॉजी (२०००); गैर्डनर (Gairdner) आंतरराष्ट्रीय पुरस्कार (२००४); बुअर (Bower) पुरस्कार (२००४); वैद्यक व जीववैद्यक विषयक संशोधनाकरिता ॲल्बेनी पुरस्कार (२००६).

बेन्झर यांचा पॅसाडीना, कॅलिफोर्निया येथे मृत्यू झाला.

पहा : श्रोडिंजर, एर्व्हीन.

 संदर्भ :

• Holmes, Lawrence Reconceiving the Gene: Seymour Benzer’s Adventures in Phage Genetics, Yale University Press, 2006.

• Weiner, Jonathan Time, Love, Memory: A Great Biologist and His Quest for the Origins of Behavior, Vintage Books edition, 2000.

 समीक्षक : रंजन गर्गे