विद्यार्थ्यांमधील अभिरुची, अभिवृत्ती, क्षमता इत्यादी लक्षात घेऊन त्यांना शालेय जीवनाशी समायोजन साधण्यास प्रवृत्त व सहकार्य करणे म्हणजे शैक्षणिक मार्गदर्शन होय. शैक्षणिक जीवनातील विविध क्षेत्रांशी समायोजन साधण्यासाठी, त्या त्या क्षेत्रातील अडचणी सोडविण्यासाठी शैक्षणिक मार्गदर्शनाची आवश्यकता असते. व्यक्तीच्या जीवनातील सर्वांत महत्त्वाचे क्षेत्र म्हणजे शैक्षणिक मार्गदर्शन होय. मार्गदर्शन ही मानसशास्त्राने शिक्षणशास्त्राला दिलेली देणगी आहे. कॉफर्ड यांच्या मते, ‘विद्यार्थ्यांना व्यक्तिगत शैक्षणिक अनुभव घेताना व्यक्तिगत गरजा आणि स्वत:मधील नैसर्गिक गुणांना मदत करणे, म्हणजे शैक्षणिक मार्गदर्शन होय.ʼ
महत्त्व : मार्गदर्शन ही व्यापक संकल्पना असल्यामुळे ती शिक्षणक्षेत्राव्यतिरिक्त अन्य क्षेत्रांतही दिसून येते; मात्र शैक्षणिक दृष्ट्या ते शिक्षणाचे एक अविभाज्य अंग आहे. शाळेतील समायोजनासाठी, अभ्यासक्रम निवडण्यासाठी आणि शालेय जीवन ठरविण्यासाठी जे सहकार्य आवश्यक असते, ते शैक्षणिक मार्गदर्शनातून मिळते. शैक्षणिक मार्गदर्शन हे बौद्धिक, सामाजिक, आर्थिक, कलात्मक, आध्यात्मिक, कौटुंबिक, नैतिक ह्या सर्व पायाभूत कृतींचे शिक्षण देण्याशी संबंधित असते. व्यक्तीला तिचा शैक्षणिक जीवनक्रम ठरविण्यासाठी सहकार्य करणे हे शैक्षणिक मार्गदर्शनात अपेक्षित असते. शैक्षणिक मार्गदर्शन हे व्यक्तीच्या बौद्धिक वाढीसाठी केलेले जाणीवपूर्वक प्रयत्नांचे सहकार्य असते.
शिक्षणातील प्रत्येक विद्यार्थ्याची बौद्धिक क्षमता, पात्रता, आवडीनिवडी, पार्श्वभूमी, गरजा, वृत्ती इत्यादींत भिन्नता असते. या भिन्नतेचा सखोल विचार करून तिच्या विश्लेषण व अर्थनिर्वचनावरून शैक्षणिक दिशा ठरविण्याचे काम शैक्षणिक मार्गदर्शनाच्या माध्यमातून होत असते. त्यामुळे मार्गदर्शन हे मुख्यत्वेकरून शालेय बाबीप्रमाणेच जीवनाच्या इतर बाबींशीही कमीअधिक प्रमाणात निगडित असते. त्यामुळे मार्गदर्शन ही एक सर्वसमावेशक प्रक्रिया आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व घटकांचे विश्लेषण करून विद्यार्थ्यांना सहकार्य करण्याची एक महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे. शैक्षणिक संपादणुकीमध्ये विद्यार्थ्यांच्या अपेक्षित प्रगतीला वैज्ञानिक पद्धतीने चालना देणारी पद्धती म्हणजे शैक्षणिक मार्गदर्शन होय.
उद्देश : शाळेतील बहुसंख्य विद्यार्थी हे सर्वसाधारण बुद्धीचे असतात. त्यांपैकी काही विद्यार्थी शालेय प्रगती खुंटल्याने किंवा शाळेत विवध अडचणी/अडथळे निर्माण होण्यामुळे शिक्षणाच्या संधीचा पुरेसा लाभ घेऊ शकत नाहीत. अशा विद्यार्थ्यांच्या अडचणी शोधून त्यांवर कोणते उपययोजना केले, तर ते पूर्ववत शालेय प्रगती करू शकतील हा विचार करून त्या दिशेने त्याला वाट दाखविणे हा शैक्षणिक मार्गदर्शनाचा मुख्य उद्देश होय. त्याचप्रमाणे
- स्वत:ची समस्या स्वत: सोडविण्यास त्यांस पात्र करणे.
- विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यासाठी विविध शैक्षणिक चाचण्यांचा व साधनांचा वापर करणे.
- विद्यार्थ्यांच्या क्षमता, बुद्धिमत्ता, भावनिक स्थिती, अभिवृत्ती, सामाजिक व आर्थिक स्थिती, आवड-निवड, भविष्यकालीन गरजा इत्यांदींचे त्यांना ज्ञान करून देऊन योग्य अभ्यासक्रम निवडण्यासाठी मदत करणे.
- अभ्यासात समाधानकारक यश मिळविण्यासाठी आवश्यक अशा सवयी आत्मसात करण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत करणे.
- विद्यार्थ्यांना अभ्यासपूरक कार्यक्रमात सहभागी करून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्यास मदत करणे.
- शाळा व अभ्यासक्रमाशी समायोजन करणे.
- विद्यार्थ्यांमध्ये शालेय वातावरणाशी समन्वय साधण्याची क्षमता निर्माण करणे.
- शिक्षणाची उद्दिष्टे, साधने व परिस्थिती यांद्वारे विद्यार्थांत शैक्षणिक जागृती निर्माण करणे.
- विशिष्ट व्यवसाय शिक्षणास वा महाविद्यालयीन शिक्षणास आपण कितपत योग्य आहोत, याची जाणीव निर्माण करण्यासाठी मूल्यांकन करणे.
- शाळा व महाविद्यालयाच्या उद्देशासंबंधी जागरूकता निर्माण करणे.
- शैक्षणिक संस्थेत काम करणाऱ्या सर्वांनाच कार्यक्षमतेच्या दृष्टिने साह्य करणे.
- समाजाला एक निश्चित विधायक दिशा देणे इत्यादी.
https://www.youtube.com/watch?v=k-ifCoyjt1U
शिक्षण संस्थेचे कार्य :
- विद्यार्थ्यांच्या अभियोग्यता व क्षमतांनुसार त्यांनाच अभ्यासक्रमाची निवड करण्या स्वातंत्र देणे.
- विद्यार्थ्याच्या योग्य अभ्यास सवयींचा विकास करण्यास मदत करणे.
- स्वयंअध्ययनाची सवय विकसित करणे.
- अद्ययावत ज्ञान-विकसनाची तंत्रे देणे.
- अप्रगत विद्यार्थ्यांसाठी आवश्यकतेनुसार विशेष अभ्यासक्रम व पद्धती पुरविणे किंवा मानसिक समस्यांवर उपचारात्मक कार्यक्रम देणे.
- प्रज्ञावान मुलांसाठी विशेष शैक्षणिक कार्यक्रम पुरविणे.
- प्रचलित परीक्षापद्धतीच्या गुणदोषांचे विश्लेषण करणे व दोषनिवारणासाठी पर्याय सुचविणे.
- विद्यार्थ्यांत अध्ययनाची अंत:प्रेरणा जागृत करणे.
- विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मागासलेपण दूर करून त्यांची क्षमता वाढविणे तसेच क्षमता निर्माण करण्यासाठी शिक्षक व पालकांना मार्गदर्शन करणे व विद्यार्थ्याना सहकार्य करणे ही शैक्षणिक मार्गदर्शनाची महत्त्वाची कार्ये आहेत.
शिक्षणाच्या नवीन प्रवाहांचा शास्त्रीय अर्थ स्पष्ट करण्याची भूमिका शैक्षणिक मार्गदर्शनाची आहे. शाळेतील पालक व विद्यार्थ्यांचे समायोजन करण्यासाठी भविष्यकालीन शिक्षणाची माहिती मिळविण्यासाठी, अध्ययनकृतीविषयी विद्यार्थ्यांत रंजकता निर्माण करण्यासाठी, शालेय व्यवस्थापनातील बदल यांतील सुनियोजित कार्यक्रम आवश्यक असतो. यासाठी शैक्षणिक मार्गदर्शन मदत करते.
शैक्षणिक विषयाशी संबंधित सर्व प्रश्नांची सखोल व दिशादर्शक चर्चा शैक्षणिक मार्गदर्शनामध्ये होते. त्यामध्ये अभ्यास, शालेय जीवनाशी समायोजन, शालेय कृती, मुलाखती, संभाषण, परीक्षा, ग्रंथालय, अध्ययन साधने, निर्णयक्षमता, ताण-तणावव्यवस्थापन, जीवनकौशल्य विकास, लैंगिक शिक्षण इत्यादी घटकांचा समावेश करता येते.
शाळेला आदर्श करायचे असेल, मुख्याध्यापकांनी आपल्या सहकारी अध्यापकांसह ज्या शाळा आदर्श शाळा म्हणून लौकिक प्राप्त केल्या आहेत, अशा शाळांना भेटी दिल्यास तेथील मुख्याध्यापक आणि अध्यापकांकडून त्यांना उत्तम मार्गदर्शन व प्रेरणा मिळू शकते. तसेच नवे ज्ञान व तंत्रज्ञान वापरून सृजनशील व्यक्ती, एखादी संस्था शिक्षणक्षेत्रात नाविण्यपूर्ण प्रयोग व प्रकल्प राबवीत असतात. त्याची माहिती आज सहज उपलब्ध होऊ शकते. अशा शैक्षणिक प्रकल्पांनाही भेटी देऊन मार्गदर्शन प्राप्त करता येते.
शैक्षणिक मार्गदर्शनात शाळा व पालक यांच्याशी घनिष्ठ संबंध असणे आवश्यक आहे. या संबंधाशिवाय शैक्षणिक मार्गदर्शन पूर्ण होत नाही. शैक्षणिक मार्गदर्शनात प्रमाणित चाचण्या अत्यंत महत्त्वाच्या असतात. प्रमाणित चाचण्यांतूनच शैक्षणिक विकासाची दिशा ठरविण्यास मदत होते. शैक्षणिक मार्गदर्शनात मूल्यमापनाला महत्त्वाचे स्थान आहे. मूल्यमापन न झाल्यास शैक्षणिक मार्गदर्शनाची परिणामकारकता समजत नाही. शैक्षणिक मार्गदर्शनातून पाठपुरावा आवश्यक असतो. पाठपुरावा नसेल, तर शैक्षणिक मार्गदर्शनाची उपयुक्तता स्पष्ट होत नाही.
आज ज्ञान आणि तंत्रविज्ञानाच्या युगात सर्वच क्षेत्रात क्रांती घडून आलेली आहे. त्यातून एक स्पर्धात्मक वातावरण निर्माण झाले आहे. अशा वेळी विद्यार्थी अथवा शिक्षक यांना शैक्षणिक समस्यांवर मात करून ध्येय सिद्ध करायचे असेल, तर मार्गदर्शक व मार्गदर्शनाशिवाय पर्याय नाही.
समीक्षक – उमाजी नायकवडे