तत्त्वज्ञान ह्या विषयाला केवळ अकादमीय वर्तुळापुरते सीमित न राखता त्याची नाळ दैनंदिन जीवनाशी जोडलेली असते, हे लक्षात घेऊन त्याचे उपयोजन समस्या सोडविण्यासाठी करण्याचे प्रयत्न विविध दिशांनी विसाव्या शतकात केले गेले. तात्त्विक समुपयोजन ह्या ज्ञानक्षेत्रातही त्याचे प्रतिबिंब पडले. मंदी, महायुद्धे, रोगराई यांसारख्या समस्यांनी ग्रस्त असलेल्या माणसाला तत्त्वज्ञान दिलासादायी व आश्वासक वाटले. त्यामुळे आशा, उमेद, चैतन्य प्राप्त होऊ शकते. घटना-घडामोडींकडे वेगळ्या नजरेने पाहिल्याने प्रश्न समजा सुटले नाहीत, तरी समजून घेण्यास मदत होते, हे जाणून तात्त्विक समुपदेशनशास्त्र विकसित झाले. तात्त्विक व व्यावहारिक अशा दोन्ही पातळ्यांवर हा विकास झालेला दिसतो. तात्त्विक विचारविनिमय हा ह्या शास्त्राचा व समुपदेशनपद्धतीचा गाभा होय.

घरगुती समस्या, संघर्ष, रोजचे ताणतणाव, कामाच्या ठिकाणी पडणारे नैतिक प्रश्न, भांडण-वादविवाद ह्या आणि अशा प्रकारच्या समस्या आपले मनःस्वास्थ्य बिघडवितात. आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग असणाऱ्या ह्या समस्या इतक्याही गंभीर नसतात की, त्यासाठी आपल्याला डॉक्टरकडे किंवा मानसोपचारतज्ञाकडे जाण्याची गरज पडावी असे असले तरीही हे प्रश्न दुर्लक्षित करण्यासारखेही नसतात; कारण त्यांचा संबंध थेट आपल्या जगण्याशी आणि अस्तित्वाशी असतो. अशाच प्रश्नांवर तोडगा काढण्याची एक पद्धत म्हणजे तात्त्विक समुपदेशन होय.

तात्त्विक समुदेशनाचा संक्षिप्त इतिहास : तात्त्विक समुदेशनाचा इतिहास तसा खूप जुना आहे. पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाच्या परिप्रेक्ष्यातून पाहता अगदी ग्रीक काळापासूनच तात्त्विक समुपदेशनाची सुरुवात झालेली दिसते. ग्रीक तत्त्वज्ञ सॉक्रेटिस ह्याच्या तत्त्वज्ञानात ह्या पद्धतीचा उगम आढळतो. त्याच्या तत्त्वज्ञानात असे म्हटले आहे की, माणसाचे अंतिम ध्येय म्हणजे एक ‘सुखी-समाधानी जीवन जगणे’. असे जीवन मिळविण्यासाठी स्वतःला नीट समजून घेणे, आत्मपरीक्षण करणे, मूल्याधिष्ठित जीवन जगणे ह्यांवर त्याने खूप भर दिला होता. माणसांना विचार करायला प्रवृत्त करणे आणि त्यांना त्यांच्या आयुष्यातील समस्यांवर नावीन्यपूर्ण पद्धतीने बघायला लावणे, हे सॉक्रेटिसच्या समुपदेशनाचे काही प्रमुख गुण. म्हणूनच त्याच्या ह्या पद्धतीला ‘द आर्ट ऑफ इंटलेक्च्युअल मिडवायफरी’ म्हणजेच समोरच्याच्या विचारांना जन्माला घालण्याची कला असे म्हटले जाते. ह्याच तंत्राचा अधिक शास्त्रशुद्ध पद्धतीने वापर तात्त्विक समुपदेशनात होतो. तात्त्विक समुपदेशनाची सुरुवात जरी सॉक्रेटिसने केली, तरी एपिक्यूरस, सेनेका यांपासून ते जॉन ड्यूईसारख्या विसाव्या शतकातील तत्त्वज्ञांनी तसेच स्टोईक व अस्तित्ववादी विचारधारांनी तत्त्वज्ञानाची उपयोजित बाजू अधोरेखित केली. जर्मन तत्त्ववेत्ते गेर्ट आखेनबाख ह्यांनी १९८२ मध्ये सोसायटी फॉर फिलॉसॉफिकल प्रॅक्झिस ही संस्था सुरू करून तात्त्विक समुपदेशनाची खऱ्या अर्थाने एक व्यवसाय म्हणून सुरुवात केली.

पुढे १९९२ साली तात्त्विक समुपदेशनाच्या अभ्यासासाठी अमेरिकेतील तत्त्वज्ञ एलियट कोहेन आणि पॉल शार्की ह्यांनी मिळून अमेरिकन सोसायटी फॉर फिलॉसॉफी, काउन्सलिंग अँड सायकोथेरपी ही संस्था स्थापन केली. आता ही संस्था नॅशनल फिलॉसॉफिकल काउन्सलिंग असोसिएशन (NPCA) ह्या नावाने ओळखली जाते. ही संस्था इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल थिंकिंग ह्या संस्थेबरोबर तर्काधिष्ठित चिकित्सा (logic-based Therapy) ह्या विषयाचा अभ्यासक्रम राबविते (तर्काधिष्ठित चिकित्सा एलियट कोहेन ह्यांनी निर्माण केलेली तात्त्विक समुपदेशनाची एक अग्रगण्य पद्धती आहे). त्याचप्रमाणे १९९८ मध्ये लाऊ मेरीनोफ ह्यांनी न्यूयॉर्कमध्ये स्थापन केलेली अमेरिकन फिलॉसॉफिकल प्रॅक्टिश्नर्स असोसिएशन (APPA) ही संस्था तत्त्वज्ञानाचे पदव्युत्तर शिक्षण झालेल्यांसाठी तात्त्विक समुपदेशनाचे काही अभ्यासक्रम राबवते. ह्या दोन्ही संस्था तात्त्विक समुपदेशनाचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालवतात आणि ह्या विषयावरील चर्चासत्र, कार्यशाळा ह्यांचे आयोजन करतात. NPCA ही संस्था तात्त्विक समुपदेशन ह्या विषयात होणारे नवनवीन संशोधन त्यांच्या इंटरनॅशनल जर्नल ऑफ फिलॉसॉफिकल प्रॅक्टिस ह्या अधिकृत संशोधनपत्रिकेत छापून आणते आणि त्यांच्या संस्थेतून प्रमाणपत्र घेऊन तात्त्विक समुपदेशनाचा व्यवसाय करणाऱ्या जगभरातील समुपदेशकांची यादीही ते त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करतात.

तात्त्विक समुपदेशनाचा परिचय : तत्त्वज्ञानाच्या अभ्यासक्रमात विद्यार्थी तत्त्वज्ञानाचा इतिहास, वेगवेगळ्या विचारवंतांच्या कल्पना ह्यांचा अभ्यास करतात; परंतु तात्त्विक समुपदेशनात ह्या कल्पनांचा आपल्या रोजच्या आयुष्यात कसा उपयोग होऊ शकतो आणि त्यांचा वापर करून आपण आपल्या जीवनाला एक नवीन दिशा कशी मिळवून देऊ शकतो ह्याचा अभ्यास केला जातो. भारतीय आणि पाश्चिमात्य तत्त्वज्ञानात अनेक तत्त्ववेत्त्यांनी आपले जीवन चांगल्या पद्धतीने जगण्यासाठी वेगवेगळे उपाय सांगितले आहेत. त्या तत्त्वांवर आधारित समुपदेशन म्हणजेच तात्त्विक समुपदेशन. तात्त्विक समुपदेशन माणसाला सल्ला-मसलतींद्वारे त्याचे आचार-विचार, त्याची मुल्ये आणि जीवन जगण्याची पद्धत ह्यांबद्दल अधिक स्पष्टपणे बघण्यास मदत करते. तात्त्विक समुपदेशन पद्धतीत आपल्या आयुष्यातले बहुतेक सगळे त्रास हे जीवनाचा अर्थ नीटसा उमगला नसल्यामुळे आणि तर्कशुद्धतेच्या अभावामुळे उद्भवतात, असे मानले जाते.

गेर्ट आखेनबाख ह्यांच्या मते तात्त्विक समुपदेशन ही एक प्रशिक्षित तात्त्विक समुपदेशक आणि त्याच्याकडे आलेली व्यक्ती ह्या दोघांनी एकत्रितपणे व चर्चात्मक पद्धतीने केलेली प्रक्रिया आहे. तात्त्विक समुपदेशनाद्वारे संबंधित व्यक्तीच्या मूलभूत तत्त्वांचा, मूल्यांचा आणि सवयींचा अभ्यास केला जातो आणि त्यात आवश्यक ते बदल करून त्या समस्यांवर तत्त्वज्ञानाच्या अंगाने उपाययोजना केली जाते.

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे लेखक आणि तात्त्विक समुपदेशनाचे पुरस्कर्ते पीटर राबी ह्यांची ह्या विषयावरची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. ते म्हणतात की, तात्त्विक समुपदेशन हा दोन व्यक्तींमध्ये साकारणारा एक सर्जनशील संवाद आहे. ह्या संवादात सहभागी होणारी एक व्यक्ती तत्त्वज्ञानाचा अभ्यास, इतिहास आणि सराव ह्यांत निपुण असते, तर दुसरी व्यक्ती समुपदेशकाच्या ह्या शिक्षणाचा आणि अनुभवाचा फायदा आपले जीवन सुधारण्यासाठी करते. तात्त्विक समुपदेशन ही अशी प्रक्रिया आहे, जी आपल्याला निरर्थकतेतून अर्थपूर्ण जीवनाकडे घेऊन जाते. समुपदेशनाद्वारे मिळालेल्या नवीन दृष्टीचा आपल्या आयुष्यात उपयोग करून आपण आपले दुःख, ताणतणाव, गोंधळ दूर करू शकतो.

तात्त्विक समुपदेशनाचे एक वेगळेपण म्हणजे आपल्याला पडणारे अस्तित्वविषयक प्रश्न किंवा अडचणींना ते रोगाचे स्वरूप देत नाहीत. प्रत्येक मानसिक तणाव हा मानसिक आजारच असेल असे नाही. तात्त्विक समुपदेशनानुसार प्रत्येक व्यक्तीत आपल्या नैतिक अथवा इतर कुठल्याही प्रकारच्या समस्यांमधून बाहेर येण्याची क्षमता असते. ती क्षमता ओळखून त्याचा वापर करण्याची कला आत्मसात करण्यासाठी तात्त्विक समुपदेशनाचा खूप फायदा होतो. ह्या पद्धतीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ही कोणत्याही धर्माचा किंवा मूल्यांचा पुरस्कार करत नाही. कशावर विश्वास ठेवावा किंवा कुठल्या नितीमूल्यांच्या आधारे वागावे ह्याची शिकवण देणे हे त्याचे कामच नाही. असे असले तरी जी व्यक्ती समुपदेशनासाठी येते, त्या व्यक्तीचा धर्म, त्याची मुल्ये आणि त्यांचा त्याच्या जीवनाशी असलेला संबंध ह्याचा अभ्यास मात्र केला जातो; कारण ह्या सगळ्याचा आपल्या जीवनावर खोल ठसा उमटलेला असतो आणि त्यातूनच आपला जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोण तयार झालेला असतो.

काही समाजात अशा गोष्टींना फारसे महत्त्व दिले जात नाही. ही एक ‘फेज’ आहे असे सांगून आपले मन वळविण्याचा प्रयत्न केला जातो. आपल्या भावनांचा आवेग कमी झाला की, आपणही पुन्हा पूर्वपदावर येतो. एखादा देशभक्तीपर सिनेमा पाहिला की, अगदी भारावून जायला होते आणि आपण देशासाठी काहीतरी केले पाहिजे, ही भावना एकदम जागृत होते; पण थोडा वेळ गेला की, पुन्हा आपल्या हरिदासाची कथा मूळ पदावर येते आणि मग तो विचार मागे पडतो. त्याचप्रमाणे आपल्या रोजच्या आयुष्यात चढ-उतार नेहमीच येतात; पण म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे आणि ते आले तसे निघून जातील असे म्हणणे बरोबर नाही. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून ते नाहीसे होत नाहीत. अधूनमधून ते सर्व त्रास डोके वर काढत राहतात. म्हणूनच योग्य वेळीच त्यांचा निचरा करणे गरजेचे असते. आपण परिस्थिती बदलू शकत नाही; पण आपली मानसिकता, आपली विचार करण्याची पद्धत, गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोण बदलू शकतो आणि ह्याचसाठी तात्त्विक समुपदेशनाची मदत होते.

तात्त्विक समुपदेशन आणि मानसशास्त्रीय समुपदेशनातील फरक : तात्त्विक समुपदेशनाच्या चर्चेत एक महत्त्वाचा प्रश्न नेहमी विचारला जातो, तो म्हणजे तात्त्विक आणि मानसशास्त्रीय समुपदेशनात फरक काय? ह्या दोन्ही पद्धती जीवनातील समस्या सोडविण्यावर केंद्रित आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये बरेच साम्य आहे. मानसशास्त्र हे अगदी अलीकडेच तत्त्वज्ञानापासून वेगळे झाले असल्यामुळे त्याची पाळेमुळे तत्त्वज्ञानातच रुजलेली आहेत, असे अनेक जाणकार मानतात. तरीही ह्या दोन्हींमध्ये असलेला महत्त्वाचा फरक म्हणजे त्यांचा समस्यांकडे बघण्याचा दृष्टिकोण. समस्या कोणत्या पातळीवर आहेत आणि त्याचा परिणाम किती खोलवर होत आहे ह्यावरून ह्या उपचारपद्धतींमध्ये फरक करता येतो. रोजच्या आयुष्यातले गंभीर नसलेले परंतु महत्त्वाचे प्रश्न/समस्या सोडविण्यासाठी तात्त्विक समुपदेशन प्रभावी ठरते; परंतु जेव्हा ह्या समस्या जास्त गंभीर होतात आणि त्यांचा आपल्या रोजच्या कामावर, नात्यांवर परिणाम दिसू लागतो, बर्‍याचदा त्याचे पडसाद काहीअंशी शारीरिक पातळीवरही दिसू लागतात, तेव्हा मात्र मानसशास्त्रीय समुपदेशकाकडे जाणे गरजेचे असते. काही समस्यांच्या बाबतीत मानसोपचारतज्ञाकडे जाणे गरजेचे असते; कारण ते त्रास बऱ्याच वरच्या पातळीवर गेलेले असतात आणि अशा वेळी बऱ्याचदा मानसशास्त्रीय किंवा तात्त्विक समुपदेशन पुरेसे पडत नाही. अशा व्यक्तींना आधी काही औषधे देऊन त्यांची मानसिक स्थिती सुधारावी लागते आणि मगच त्यांना समुपदेशनाचा फायदा होऊ शकतो. म्हणूनच लाऊ मेरिनोफ तात्त्विक समुपदेशनाला ‘तर्कसंगत विचार करू शकणाऱ्या लोकांसाठीचे समुपदेशन असे म्हणतात. (Therapy for the sane) ह्या दोन पद्धतींमधील फरकाविषयी सांगताना ते असे म्हणतात की, तात्त्विक समुपदेशन हे मानसशास्त्रीय समुपदेशनाला किंवा मानसोपचाराला पर्याय नाही. मानसशास्त्रीय समुपदेशन बहुतांशवेळेला भावनांवर जोर देते, तर तात्त्विक समुपदेशन भावनांपेक्षा तर्क, तर्कशुद्धपणा ह्यांवर जोर देते.

तात्त्विक समुपदेशनाची पद्धत : आपण आपल्या आयुष्याकडे डोळसपणे बघितल्यावर आपल्याला जाणवते की, आपण अगदी यांत्रिक पद्धतीने जगत असतो. रोजची ठरलेली कामे फारसा विचार न करता करणे, आजूबाजूच्या त्रासदायक गोष्टींकडे कानाडोळा करणे, यांसारखे उपाय बहुतेक लोक अवलंबतात. आपल्या ह्या यांत्रिक अवस्थेतून आपल्याला बाहेर काढून विचारप्रवृत्त करणे, हे आखेनबाख ह्यांच्या मते जिवंत असण्याचे लक्षण आहे आणि म्हणूनच तात्त्विक समुपदेशनात समुपदेशक आणि त्याच्याकडे आलेली व्यक्ती दोघेही एकत्रितपणे समस्यांकडे डोळसपणे बघतात. समुपदेशक त्याचे विचार किंवा मते समोरच्यावर लादत नाही, तर त्या व्यक्तीला आपल्याच समस्यांकडे नव्या दृष्टिकोणातून बघण्यास प्रवृत्त करतो.

जर्मन मानसोपचारतज्ञ व्हिक्टर फ्रान्केल त्यांच्या अतिशय गाजलेल्या मॅन्स सर्च फॉर मीनिंग ह्या पुस्तकात हा मुद्दा प्रकर्षाने मांडतात. हिटलरच्या छळछावणीमध्ये राहताना त्यांना असे जाणवले की, आपण आपले त्रास नाहीसे करू शकत नाही; परंतु त्याच्याशी कसे लढायचे, त्याच्याशी कसा सामना करायचा, हे मात्र आपणच ठरवू शकतो. त्यांच्या मते त्या सर्व त्रासातही एक अर्थ शोधून काढणे आणि त्या आधारावर पुढे जात राहणे, जीवनाचा अर्थ नवनवीन पद्धतीने शोधत राहणे, हेच जीवनाचे सार आहे. ह्यातूनच पुढे तात्त्विक समुपदेशनाची त्यांनी शोधलेली आणि पुढे प्रचलित केलीली एक चिकित्सापद्धती अस्तित्वात आली. ती म्हणजे ‘लोगो थेरपी’. लोगो ह्या शब्दाचा उगम ग्रीक शब्द लोगोस म्हणजेच ‘अर्थ’ ह्यातून झाला आहे. ह्या चिकित्सापद्धतीनुसार आपल्या आयुष्याचे ध्येय फ्रॉईड म्हणतो त्याप्रमाणे सुख शोधण्यात नसून आयुष्याचा अर्थ शोधण्यात आहे.

तात्त्विक समुपदेशनाच्या साधारणपणे पाच पायऱ्या मानल्या जातात, त्या खालीलप्रमाणे :

  • समस्या ओळखणे : बऱ्याचदा आपल्या मनातल्या गोंधळामुळे आपली मूळ समस्या इतर भावनांच्या मागे लपून जाते. भावनांच्या गुंत्याचे आवरण काढून मूळ मुद्दा काय आहे हे समजून घेतले, तर त्यावर तर्कशुद्ध विचार करणे सोपे जाते. तात्त्विक समुपदेशनाच्या पहिल्या पायरीत ह्या गोष्टीवर लक्ष केंद्रित केले जाते.
  • भावना व्यक्त करणे : समस्या काहीही असली, तरी त्याबरोबरच अनेक भावना मनात येऊन गोंधळ घालतात. त्या वेगळ्या करणे आणि त्या योग्यप्रकारे व्यक्त करणे ही दुसरी पायरी. मनुष्यभावना अतिशय गुंतागुंतीच्या असतात, त्यामुळे त्या नक्की काय आहेत, हे कळण्यासाठी थोडा  वेळ द्यावा लागतो. त्या योग्यप्रकारे ओळखून मगच व्यक्त करणे योग्य.
  • उपायांचे विश्लेषण : मूळ समस्या काय आहे हे एकदा ओळखले आणि त्यामुळे निर्माण झालेल्या भावनांचा नीट विचार केला, त्या योग्यपद्धतीने व्यक्त केल्यानंतर त्या समस्येचा आपण वस्तुनिष्ठपणे विचार करू शकतो. प्रत्येक समस्येवर, त्रासावर काही ना काहीतरी उपाय शोधण्याचा प्रयत्न ह्या प्रक्रियेत केला जातो. समुपदेशक त्याच्या अभ्यासाद्वारे आत्तापर्यंत आपल्या लक्षात न आलेले उपाय सुचवू शकतो. अनेक प्राचीन तत्त्वज्ञांनी सांगितलेल्या वेगवेगळ्या विचारांचाही आपल्या समस्यांवर तोडगा शोधून काढण्यासाठी उपयोग केला जातो.
  • वस्तुनिष्ठपणे समस्येकडे पाहणे : आपल्याला सापडलेल्या उपायांकडे अगदी वस्तुनिष्ठ पद्धतीने पाहून त्यातून सर्वांत तर्कशुद्ध उपाय निवडणे ही पुढची महत्त्वाची पायरी.
  • समतोल अवस्था : अशा प्रकारे तात्त्विक आणि तर्कशुद्ध पद्धतीने आपल्या समस्येकडे बघून मानसिकच नव्हे, तर सर्वार्थाने समतोल अवस्था प्राप्त करणे आणि आंतरिक समाधान, शांती मिळविणे ही सगळ्यात शेवटची पायरी.

तात्त्विक समुपदेशक आपल्याकडे आलेल्या उपदेशलाभार्थीची मूल्ये, त्याचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोण ह्यांचा अभ्यास करतो. ह्या परीक्षणामुळे उपदेशलाभार्थीचा जगाकडे बघण्याच्या दृष्टिकोणामागे नक्की कोणती कारणे आहेत, ह्याचे विश्लेषणही करतो. ह्या प्रक्रियेत त्याची बलस्थाने कोणती आहेत, त्रुटी काय आहेत हेही समजायला मदत होते. ह्या परीक्षणाचा अजून एक फायदा म्हणजे उपदेशलाभार्थी आपल्या तत्त्वांमधील आणि प्रत्यक्ष कृतीमधील संघर्ष आणि विसंगती ह्याबद्दल जागरूक होतो. ह्यामुळे त्याची आत्मजागरूकता तर वाढतेच; पण त्याचबरोबर आपल्या आयुष्याचे अत्यंत बारकाईने परीक्षण करण्याची क्षमता निर्माण होते. समुपदेशनासाठी आलेल्या उपदेशलाभार्थीला स्वतःच्या आयुष्याविषयी सखोल विचार करायला मदत करणे व स्वतःसाठी एक सुसंगत, सक्षम आणि परिपूर्ण अशी विचारप्रणाली विकसित करण्यास मदत करणे, हे तात्त्विक समुपदेशनाचे अंतिम ध्येय आहे. तात्त्विक समुपदेशनामुळे उपदेशलाभार्थीला स्वतःबद्दलचे ज्ञान वाढविण्यात मदत होते, तिची स्वतःच्या समस्यांबद्दलची आकलनशक्ती वाढते आणि ती स्वतःच्या समस्या स्वतः सोडविण्यासाठी, दुःखातून, अडीअडचणीतून मार्ग काढण्यासाठी कार्यक्षम स्वावलंबी बनते.

तात्त्विक समुपदेशन प्रशिक्षण : पाश्चिमात्य देशांमध्ये तात्त्विक समुपदेशनाला बरीच लोकप्रियता मिळाली आहे. भारतातही सध्या त्याचा प्रचार आणि प्रसार जोरात सुरू झाला आहे. तात्त्विक समुपदेशक बनण्यासाठी तत्त्वज्ञानातील पदव्युत्तर शिक्षण आणि आचार्यपदवी असावी लागते. व्यवसाय ह्या दृष्टीने तात्त्विक समुपदेशनाची जगभरात उत्तरोत्तर प्रगती होत आहे आणि म्हणूनच अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अभ्यासक ह्याकडे आकर्षित होत आहेत.

भारतामध्ये २०२० साली मुंबईच्या रुईया महाविद्यालयाने एलियट कोहेन ह्यांच्या अमेरिकेतील लॉजिक-बेस्ड थेरपी अँड कॉन्सल्टेशन इन्स्टिट्यूट ह्या संस्थेबरोबर करार करून ‘तर्काधिष्ठित चिकित्सा आणि विचारविनिमय’ ह्या विषयाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला आहे.

तत्त्वज्ञानासाठी मराठीत वापरला जाणारा एक उत्तम शब्द म्हणजे दर्शनशास्त्र. ‘दर्शन का कारण’ त्यातून आपल्याला जीवनाचे तत्त्व दिसते. ही तत्त्वे, हे शहाणपण नुसते पुस्तकांमध्ये राहून काही उपयोग नाही. त्याचा आपल्या खऱ्या आयुष्यात आपले जीवन सुधारण्यासाठी उपयोग झाला, तर ते खऱ्या अर्थाने दर्शनशास्त्र होईल. तात्त्विक समुपदेशन हा त्या अर्थाने दर्शनाकडे नेणारा एक उपयुक्त मार्ग आहे. तत्त्वज्ञानात अशा प्रकारच्या तात्त्विक समुपदेशनाची बरीच उदाहरणे बघायला मिळतात. कुरुक्षेत्रामध्ये समस्यांनी ग्रासलेल्या अर्जुनाला कृष्णाने गीतेच्या स्वरूपात जो उपदेश केला, ते एक प्रकारचे तात्त्विक समुपदेशनच होते. उपनिषदांमधील याज्ञवल्क्य-मैत्रेयी, यम-नचिकेत, उद्दलक-अरुणी आणि श्वेतकेतू हे सर्व संवाद तात्त्विक समुपदेशनाची प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. तात्त्विक समुपदेशनामुळे आपले आयुष्य जादूची कांडी फिरविल्याप्रमाणे एकदम सुखी-समाधानी होईल, असे नाही; परंतु आपल्या तणावपूर्ण आयुष्यात आपल्याला जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने बघण्यात आणि आपल्या तणावांची मर्यादा न ओलांडून देण्यात तात्त्विक समुपदेशनाची मदत होऊ शकते.

 

संदर्भ :

समीक्षक : शर्मिला वीरकर