मध्य प्रदेशातील एक प्रसिद्ध प्राचीन संस्थान. विंध्यांचल पर्वतरांगेच्या बुंदेलखंड भागातील अशोकनगर जिल्ह्यातील चंदेरी हे शहर चंद्रगिरी आणि चंद्रपूरम या नावांनीही परिचित आहे. लोकसंख्या सु. ३३,०८१ (२०११). श्रीकृष्णाचा आतेभाऊ शिशुपाल याने चेदी (चंदेरीचे तत्कालीन नाव) राज्याची स्थापना केली, अशी आख्यायिका आहे. आणखी एका पुराणकथेनुसार नल राजाने झोपी गेलेल्या दमयंतीला नरवरच्या घनदाट जंगलात सोडल्यानंतर ती जंगली श्वापदांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी भटकत चेद्नगरला पोहोचली. त्यावेळी हे गाव आजच्या चंदेरीपासून १९ किमी. लांब उर्वशी नदीकाठी वसलेले होते. त्याला ‘बुढी चंदेरी’ असे म्हणतात. आजही तेथे किल्ल्याच्या तटबंदीचे अवशेष व मंदिरे पाहायला मिळतात. उपलब्ध शिलालेखानुसार ११ व्या शतकात येथे प्रतिहार राजकर्त्यांच्या शाखेचे शासन होते.
आठव्या शतकात गुर्जर–प्रतिहार राजांनी स्वतःचे सार्वभौमत्व घोषित केले आणि पुढे त्यांच्याच वंशजांनी चंद्रपूरमला राजधानीचे शहर बनविले. शिलालेखात सातवा राजा कीर्तीपाल याने आपली राजधानी चंदेरी गावात वसविल्याचा उल्लेख आहे. साधारणतः ११ व्या शतकाच्या शेवटच्या दशकात गुर्जर-प्रतिहार राजांची सत्ता संपुष्टात आली आणि हा प्रदेश कुशवाह राजपुतांनी जिंकला. तेव्हा दिल्लीत गुलाम वंशाचा नासिरुद्दीन महमूद सुलतान राज्य करीत होता. त्याचा वजीर घियासुद्दीन बल्बनने १२५१-५२ साली राजपूत राजाला नमवून चंदेरी जिंकली. तो परत माघारी गेल्यावर लगेचच राजपुतांनी शहराचा ताबा घेतला. पण उत्तरेकडून आलेल्या मुस्लिम आक्रमणापुढे ते जास्त काळ टिकाव धरू शकले नाहीत.
१२९६ साली दिल्लीचा शासक बनलेल्या अल्लाउद्दिन खल्जीने चंदेरी पाठोपाठ विदिशा, उज्जैन, धार, मांडू हे प्रदेश जिंकून माळव्यापर्यंतचा प्रांत वर्चस्वाखाली आणला. त्यानंतर मुहम्मद तुघलकाने हा प्रदेश ताब्यात ठेवला. १३९२ साली दिलावरखान घौरी या माळव्याच्या सुभेदाराने तुघलक सत्तेच्या विरोधात जाऊन माळवा सलतनतची स्थापना केली. त्याच्या मुलांमध्ये सत्तेवरून भांडणे होऊन त्यांतील एकाने चंदेरीला स्वतःचे स्वतंत्र राज्य स्थापन केले. पुढे १४२४ साली चंदेरी पुन्हा माळवा सुलतानांच्या आधिपत्याखाली आले. १५१२ साली राजपूत सरदार मेदिनिराय याच्या हाती सर्व अधिकार आले. राणा संगच्या आश्रयाला जाऊन त्याने चंदेरीचा कारभार सांभाळायला सुरुवात केली. १५२८ साली बाबरने प्रचंड फौजेनिशी चंदेरीवर आक्रमण केले. किल्ल्याला वेढा दिला. त्यावेळी जवळपास ७०० राजपूत स्त्रियांनी किल्ल्यात लाकडाची चिता करून त्यात उड्या मारून जोहर केला. युद्धानंतर चंदेरीवर मोगलांची सत्ता प्रस्थापित झाली. पुढे अकबर बादशाहने चंदेरीला सुभ्याचे ठिकाण म्हणून दर्जा दिला. १६०५ साली जहांगीरने मोगलांच्यावतीने चंदेरीचा कारभार बुंदेल राजपूत रामशहा राजाकडे सोपविला. येथून पुढे सु. दोनशे वर्षांपेक्षा जास्त काळ चंदेरीवर राजपुतांचा अंमल होता. राजपुतांनी मोगलांचा नि मोगलांनी राजपुतांचा पुरेपूर वापर करून घेतला. १७०७ साली औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मोगल साम्राज्य अस्थिर झाले आणि मराठ्यांचा प्रभाव वाढला. मराठा सरदार गोविंदपंत बुंदेला यांनी चंदेरीवर आक्रमण केले. त्यांच्यापासून सुटका मिळविण्यासाठी बुंदेला राजपुतांनी परत मोगलांचा आश्रय घेतला. दोन्ही फौजांनी मिळून मराठ्यांचे आक्रमण थोपवून धरले. पुढे चंदेरीला योग्य शासक मिळाले नाहीत, तसेच कौटुंबिक कलह, समाजमान्य नसलेल्या गोष्टींचे शौक यांमुळे प्रशासन कोलमडले. याचा फायदा घेत दौलतराव शिंदे यांचा सेनापती कर्नल जीन बाप्तीस्ट याने १८११ साली चंदेरी जिंकून शिंदे संस्थांनच्या आधिपत्याखाली आणली.
मर्दनसिंग हा ९ वर्षे वयाचा चंदेरीचा युवराज राजपुतांना पुन्हा गौरव मिळवून देण्याची स्वप्ने पाहत होता. १८४४ साली जनकोजी शिंदेंच्या मृत्यूनंतर ग्वाल्हेर संस्थान आणि ब्रिटिश यांच्यात बेबनाव झाला. तेव्हा मर्दनसिंगने चंदेरीवर ताबा मिळविला. १८५७ साली त्याने स्वतःला स्वातंत्र्ययुद्धात झोकून दिले. राणी लक्ष्मीबाईसोबत हात मिळवून त्याने ब्रिटिशांना जेरीस आणले. ब्रिटिशांनी कसाबसा चंदेरीवर ताबा मिळविला. पण मर्दनसिंगच्या हल्ल्यामुळे ब्रिटिशांना माघार घ्यावी लागली. या पराभवाचा बदला घेण्यासाठी रॉयल काउंटी डाउन नावाची मोठी बटालियन आली. त्यांनी १७ मार्च १८५८ ला चंदेरीवर तोफांचा मारा केला. अखेर तटबंदीला भगदाड पडले. मर्दनसिंगने पराक्रमाची शर्थ केली; परंतु ब्रिटिशांच्या मोठ्या सैन्यापुढे त्याचा निभाव लागला नाही. त्याला बंदी बनवून वृंदावनला पाठविण्यात आले. तेथेच त्याचा अंत झाला. १८६० साली झालेल्या तहानुसार चंदेरी पुन्हा शिंद्यांकडे सोपवण्यात आली. पुढे हिंदुस्थान स्वतंत्र होईपर्यंत चंदेरी ग्वाल्हेर संस्थांनचा भाग होता. मर्दनसिंग हा बुंदेलखंडातील सर्वांत शेवटचा राजपूत शासक ठरला.
उत्तरपथ व दक्षिणापथ याला जोडणाऱ्या महत्त्वाच्या व्यापारी मार्गावर चंदेरी हे थांब्याचे ठिकाण होते, असे पर्शियन इतिहासकार अल् बीरूनी त्याच्या किताब-उल्-हिंद या ग्रंथात लिहितो. इब्न बतूता याच्या प्रवास वर्णनात चंदेरी येथील बाजाराचे वर्णन आहे. बाबरनाम्यात चंदेरीतील घरांचे, त्यावरील नक्षीकामाचे वर्णन आहे. अत्यंत विकसित अशा चंदेरी शहरात १४,००० दगडी घरे, ६१ महाल, २५० धर्मशाळा, १२०० मशिदी, १२०० विहिरी असल्याचे अबुल फझल सांगतो.
चंदेरीमध्ये अनेक पुरातन, धार्मिक आणि ऐतिहासिक वास्तू आहेत. यामध्ये जोगेश्वरी माता मंदिर, कीर्तिदुर्ग किल्ला, बुंदेलखंडातील सर्वांत जुनी म्हणजे १३ व्या शतकातील जामा मशीद, बादल महाल, कोशाल महाल, राजाराणी महाल, शहजादी का रोजा, शाही मदरसा, इदगाह, चाकाला बावडी, बत्तीसी बावडी इ. वास्तू आजही तग धरून आहेत.
संदर्भ :
- Nath, R. The Art of Chanderi: A Study of the 15th Century Monuments of Chanderi, 1979.
- The Imperial Gazetteer of India, Vol.19, Nayakanhatti to Parabhani, Oxford, 1908, Reprint 2019.
- Mitra Swati, Chanderi Travel Guide, New Delhi, 2009.
समीक्षक : चंद्रकांत अभंग