मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध किल्ला. बुरहानपूरपासून उत्तरेला २० किमी. अंतरावर समुद्रसपाटीपासून सु. ८५० फूट उंचीवर हा अभेद्य किल्ला आहे. आसा अहिर या अहिर राजाच्या नावावरून सातपुडा डोंगररांगेतील या किल्ल्याला असीरगड किंवा असीरगढ हे नाव प्राप्त झाले.

असीरगड.

किल्ला हा तीन भागांत विभागला असून किल्ल्याभोवती दुहेरी तटबंदी आणि बालेकिल्ला अशी विभागणी आहे. त्यामुळे एकात एक असे तीन स्वतंत्र किल्लेच तयार झाले आहेत. पायथ्याजवळचा मलयगड, मधला कमरगड आणि त्यांचा मुकुटमणी म्हणजे असीरगड. पायथ्याच्या असीरगड गावातून पायऱ्यांच्या वाटेने किल्ल्यावर जाताना एका पाठोपाठ एक अशी भक्कम दरवाजांची मालिका आहे. यांपैकी मदार दरवाजा, हप्त दरवाजा हे प्रसिद्ध आहेत. किल्ल्यावर जाण्यासाठी एक गाडीमार्ग असून तो मार्ग लांबचा व गडाच्या मुख्य डोंगराला वळसा घालून बालेकिल्ल्याजवळ पोहोचतो.

बालेकिल्ल्यावर जाताना अकबर, दानियाल, शाहजहान आणि औरंगजेब यांचे चार फार्सी भाषेतील शिलालेख आहेत. किल्ल्यामधील भव्य वास्तू म्हणजे जामा मशीद. ही वास्तू म्हणजे फारुकी शासन काळातील बांधकामाचा एक उत्कृष्ट नमुना आहे. सदर मशिदीचे बांधकाम काळ्या दगडात असून मशिदीच्या दोन्हो बाजूस ८० फूट उंच दोन मिनार आहेत. असीरगड किल्ल्यावर पाण्याची उत्तम सोय आहे. किल्ल्यावर सहा तलाव असून काही विहिरी देखील आहेत. किल्ल्यावर एक शिवमंदिर आहे आणि त्याच्या जवळच किल्ल्यावर येणारा आणखी एक मार्ग आहे. सध्या हा मार्ग बंद आहे. या मंदिरात अश्वत्थामा येऊन पूजा करत होता, अशी आख्यायिका आहे. मंदिराजवळ एक मोठा बुरूज असुन मंदिराचे बांधकाम मात्र मराठाकालीन दिसते. ब्रिटिश लोकांचे या गडावर अनेक वर्षे वास्तव्य होते. किल्ल्यावर ब्रिटिशांनी बांधलेल्या बराकी, कैदखाने आणि चर्च यांचे अवशेष दिसतात. तसेच गडावर एक ब्रिटिशकालीन दफनभूमी आहे. किल्लाच्या पायथ्याशी मोगलकालीन ‘मोती महाल’ नावाची इमारत आहे.

प्रवेशद्वार, असीरगड.

पूर्व मध्ययुगीन कालखंडातील या स्थळाच्या अस्तित्वाचे पुरावे नाणी, देवदेवतांच्या मूर्ती, मंदिराचे अवशेष इत्यादी रूपांत येथे उत्खननात सापडले. या किल्ल्याला खरी ओळख दिली, ती फारुकी राजवटीतील शासनकर्त्यांनी. त्यांचे पूर्वज खल्जी, तुघलक यांसारख्या परकीय आक्रमणकर्त्यांसोबत हिंदुस्थानात आले आणि त्यांनी दिल्ली दरबारात स्वत:चे स्थान निर्माण केले. १३७० साली फारुकी सरदार मलिक राजा याला तुघलक सुलतानाने गुजरातच्या दक्षिण सीमेलगतच्या प्रांताची जहागिरी दिली. त्याने जहागिरीचे मुख्यालय थाळनेरला (सध्या जि. धुळे, महाराष्ट्र) स्थापन केले. तुघलकांची सत्ता खिळखिळी होताच मलिक राजाने स्वत:ला स्वतंत्र संस्थानिक घोषित करून फारुखी साम्राज्याची स्थापना केली. १३९९ साली त्याचा मुलगा नासिर खान गादीवर बसला. नासीर खानने किल्लेदार आसा अहीर याच्याकडून कपटाने असिरगड किल्ला घेतला.

नासिर खान स्वत:ला मुसलमानांचे दुसरे खलिफा ‘उमर-अल-फारुख’ यांचा थेट वंशज समजत असे. त्याची सुरुवातीची काही वर्षे अंतर्गत कलह मिटविण्यात गेली. थाळनेरवर आक्रमण करून त्याने भावाला कैद केले. पुढे बहमनी फौजेकडून पराभव पतकारावा लागल्यानंतर बसलेल्या धक्क्यामुळे १४३७ साली त्याचा मृत्यू झाला. दोनशे वर्षाच्या फारुकी शासनकाळात एकूण बारा सुलतान झाले. १५७६ साली गादीवर बसलेल्या राजा अली खानने (आदिल शाहा) मोगलांचे मांडलिकत्व स्वीकारले. स्वतःच्या मुलीचे लग्न अकबरचा दुसरा मुलगा शहाजादा मुराद सोबत लावून दिले. स्वत: अकबरच्या वजिराच्या बहिणीसोबत लग्न केले. मोगलांच्या वतीने युद्धात लढतानाच त्याचा मृत्यू झाला.

जामा मशीद, असीरगड.

पुढे त्याचा मुलगा ‘बहादूरखान’ याने कारभार हाती घेतला. वडिलांच्या विरुद्ध नीती अवलंबून त्याने मोगलांच्या मोहिमेत सहभागी होण्यास नकार दिला. त्यामुळे मोगल बादशहा अकबराचा मुलगा दानियालचा अपमान झाला. परिणामस्वरूप खुद्द अकबर त्याच्यावर चालून आला. बहादूरखानाला हे अपेक्षितच होते. युद्धाच्या तयारीने तो १५००० फौजेनिशी असीरगडवर तयार होता. सोबत व्यापारी, कारागीर, गुरेढोरे असा बराच लवाजमा होता. किल्ल्याच्या आश्रयाने मोगलांना बराच काळ झुंजत ठेवू अशी त्याची अटकळ होती, पण ती फोल ठरली. १६०० साली अकबराने किल्ला जिंकला. याबाबत पर्शियन इतिहासकार फिरिश्तानेही नोंद करून ठेवली आहे. ‘किल्ल्याला वेढा घालून बरेच महिने झाले. पावसाळ्यानंतर कसल्या तरी रोगाचा प्रसार झाला आणि किल्ल्यातील जनावरे मृत्यू पडू लागली आणि कुजून दुर्गंधी पसरली. त्यात कोणीतरी बातमी पेरली की, हे सगळे अकबर त्याच्या जवळच्या मांत्रिकामार्फत घडवतोय, या बातमीवर सैन्यांचा विश्वास बसला. खुद्द फारुकी सुलतान बहादूरखान कामकाज सोडून यावर उपाय शोधण्यात गुंतला. यापेक्षा त्याने मेलेली जनावरे बाहेर फेकण्याची, रोगराई फैलू नये म्हणून हकिमाकरवी उपचाराची, बिनकामी जनावरे, माणसे गडाखाली धाडण्याची आज्ञा द्यायला हवी होती. आगाऊ पगार देऊन सैन्याला प्रोत्साहित करायला हवे होते. पण त्याने काहीच केले नाही. त्याच्याकडे धनसंचय भरपूर होता. दहा वर्षे पुरेल एवढे धान्य आणि आणखी एखादे नवीन शहर वसविता येईल, एवढा खजिना होता. सुलतान काहीच करत नाही, हे बघून इकडे सैन्याने त्यालाच कैद करून अकबराला सोपविण्याचा कट रचला. स्वत:चे सैन्यच विरोधात उभे ठाकलेले पाहून त्याने शरणागती पतकरली. सैन्यासह स्वत:ला जिवंत किल्ल्याबाहेर जाऊ द्यावे, अशी त्याची अट होती. अकबराने सैन्याला किल्ला सोडून जाऊ दिले, पण बहादूरशाहाला कैदेत टाकले व त्याची संपत्ती जप्त केली. धान्य, पाणी, दारूगोळ्यासह लढण्यासाठी पूर्ण सज्जता आणि सैनिकी सामर्थ्य असूनही केवळ बहादूरशाहाच्या नाकर्तेपणामुळे फारुकी साम्राज्याचा अंत झाला. विजयाने आनंदित झालेल्या अकबराने त्याचे गुणगान गाणारा शिलालेख गडाच्या दरवाजावर बसविला. ‘जर्ब असीर’ (असीरला नमवले) हे शब्द असलेली सोन्याची नाणी पाडली. बलाढ्य ठिकाण झडप घालून गारद करणार्‍या बहिरी ससाण्याचे चिन्ह नाण्याच्या दुसर्‍या बाजूला होते.ʼ

पुढे किल्ला पेशव्यांचे सरदार शिंदेंच्या ताब्यात होता. पेशवे दुसरे बाजीराव किल्ल्याजवळील धुळकोट गावी ब्रिटिशांना शरण गेले (जून १८१८). १८५७ सालच्या उठावातील वीरांगना राणी लक्ष्मीबाई झाशीचा किल्ला पडल्यानंतर काही काळ येथे मुक्कामाला होत्या. पुढे उठावात सहभागी झालेल्या कित्येकांना ब्रिटिशांनी अटक करून येथेच कैदेत ठेवले. त्यात सुरेंद्र साए ही ओडिशामधील राजघराण्यातील व्यक्तीही होती. या पराक्रमी योद्ध्याचा येथे कैदेतच २० वर्षांनंतर मृत्यू झाला.

संदर्भ :

  • Mehta B. H., Gonds of the Central Indian Highlands, Volume : 2, New Delhi, 1984.
  • Shrivastav P. N. Madhya Pradesh District Gazetteers East Nimar, 1969.
  • कुंटे भ. ग. अनु., गुलशने इब्रहिमी या फेरिश्ता लिखीत ग्रंथाचा मराठी अनुवाद, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, १९८२.

                                                                                                                                                                                       समीक्षक : जयकुमार पाठक