कोमल बलराज : (२५ सप्टें १९२८ – २६ फेब्रु २०१३). भारतीय साहित्यातील प्रसिद्ध उर्दू कवी. कवी, समीक्षक, कथाकार आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांची ओळख आहे. मानवी संवेदनशीलता साहित्यातून प्रकट करीत असताना त्याला मनोविश्लेषणाचा आधार देण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यांच्या बालसाहित्यातूनही त्यांनी आविष्कृत केलेल्या मानसशास्त्राचा प्रत्यय येतो. त्यांचा जन्म पाकिस्तान देशातील सियालकोट येथे झाला. फाळणीनंतर त्यांचे कुटूंब भारतात स्थलांतरित झाले. पदव्युत्तर शिक्षण त्यांनी इंग्रजी साहित्यातून घेतले.
बलराज कोमल यांचे साहित्य : काव्यसंग्रह – मेरी नजमे (१९५४), रिश्ता ए दिल (१९६३), नारीयल के पार (१९६७), सफर मुदम सफर (१९६९), इंतिकाब (१९७१), निझाद. ए. संग (१९७५), परिंदो भरा आसमान (१९८४), शहर मे एक तहरीर (१९८७); लघुकथा – आँखे और पाँव (१९८१); दीर्घकथा – हरियाली का एक तुकडा (हिंदी, १९८१); समीक्षा – अदब की तलाश (१९८५), तवतुर और तसलसूल (१९९५).
बलराज कोमल यांची कविता ही सामान्य आहे, परंतु ती सर्वसामान्यांच्या आवाक्यातील नाही, तिच्यात एक गूढरम्यता आणि संदिग्धता आहे. आधुनिक उर्दु कवितेमध्ये दु:खाचे प्रकटीकरण हे अधिक प्रखर स्वरात अभिव्यक्त केले जाते; मात्र त्या तुलनेत दु:खाचे प्रकटीकरण करताना त्यांच्या कवितेचा स्वर कोमल आहे. आधुनिक उर्दू कविता वादविवाद, खंडनमंडन, तत्त्वप्रतिपादन अशा भावांतून प्रकट होत होती. या काव्यशास्त्रीय चौकटीत न थांबता त्यांनी काव्यनिवेदनाची त्यांची स्वतंत्र शैली निर्माण केली. सामाजिक जाणिवा व्यक्त करताना प्रकटीकरणाचे पारंपरिक दडपण झुगारून त्यांनी सामाजिक जाणिवाचे सर्वसामान्यीकरण करून व्यक्तीगत जाणिवांत अंतर्भूत केले. ह्याच व्यक्ती आणि समाज जाणीवा सर्वमान्य अशा काव्यभाषेत त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
बलराज कोमल यांच्या कवितेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सामाजिक वास्तव आणि बालमन यांच्या तुलनेतून त्यांनी घेतलेला बालमनाचा शोध. कागझ की नाव, परिंदो भरा आसमान या काव्यसंग्रहातून त्यांनी बालमनोविश्वाला अधोरेखित करणार्या कविता लिहिल्या आहेत. ‘कागझ की नाव’, ‘अकेली’ ‘नन्हा शहस्वार’ ह्या त्यासंदर्भातील काही प्रसिद्ध कविता आहेत.उर्दु कवितेत मुक्तछंदाचा वापर त्यांनी केला आहे. त्यांच्या काव्याभिव्यक्तीत पर्शियन शब्दांच्या वावरामुळे अर्थदृष्ट्या काहीशी संदिग्धता निर्माण होते. मात्र त्याद्वारा त्यांच्या कवितांना एक भावनिक खोलीही मिळाली आहे.
भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाचा पुरस्कार (कादंबरी १९६९), उत्तर प्रदेश उर्दु अकादेमी पुरस्कार (१९७१-८२), इतियाझ ए मीर पुरस्कार (१९७७), साहित्य अकादमी पुरस्कार (१९८५), गंगाधर राष्ट्रीय पुरस्कार (२०१२), पद्मश्री (२०११) इत्यादी पुरस्कारांनी त्यांना त्यांच्या साहित्यसेवेबद्दल गौरविण्यात आले आहे.
संदर्भ : http://sahitya-akademi.gov.in/library/meettheauthor/balraj_komal.pdf