भ्रेंब्रे,उदय : (२७ डिसें १९३९). भारतीय साहित्यातील प्रसिद्ध कोकणी लेखक. नाटककार आणि संपादक म्हणून त्यांची प्रमुख ओळख आहे. खरेतर गोव्यातील प्रसिद्ध वकील अशी एक दुसरीही त्यांची ओळख आहे. जन्म दक्षिण गोव्यातील रिव्हॉन येथे. त्यांचे कुटुंब हे जमीनदार होते.त्याचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण जांबावली, रिवण, कुचकडे आणि वास्को येथून झाले. त्याचे हे शिक्षण पोर्तुगीज भाषेतून झाले.

गोवामुक्ती आंदोलनात त्यांच्या वडीलांना अटक झाली होती आणि त्यांना १९६२ पर्यंत पोर्तुगालला अटक करून ठेवण्यात आले होते. कुटूंब स्थलांतरित झाल्यानंतर त्यांचा शिक्षणक्रम चालू झाला. शालेय वयातच त्यांना लेखन, दिग्दर्शन आणि अभिनयाची आवड होती. शालेय अभ्यासक्रम आटोपून पुढील उच्च शिक्षणासाठी त्यांनी मुंबईच्या सिद्धार्थ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. विज्ञान शाखेत शिक्षण घेत असूनही कला शाखेची त्यांची ओढ कायम होती. त्यावेळी विद्या  नावाचे महाविद्यालयाचे वार्षिक निघत असे, त्यातील एकाचे संपादन भ्रेंब्रे यांनी केले होते.

चान्न्याचे राती (कवितासंग्रह), ब्रह्मास्त्र (सदरलेखन), कर्णपर्व (नाटक), अस्मितायेचो कसाई (निबंध संग्रह) इत्यादी साहित्य त्यांचे प्रकाशित आहे.

कालांतराने त्यांनी मुंबई येथील ऑल इंडिया रेडिओची नोकरी पतकरली. त्यात ते नाटिका आणि गीताचे दिग्दर्शन करीत असत. गोवा स्वातंत्र्य झाल्यावर ते गोव्याला स्थायिक झाले आणि त्यांनी राष्ट्रमत  या वृत्तपत्रामध्ये संपादक म्हणून कार्य केले. या वृत्तपत्रामधील ब्रह्मास्त्र हे त्याचे सदर लोकप्रिय होते. या सदरामधून यांनी कोकणी समाज, कोकणी अस्मिता आणि गोवा महाराष्ट्रात विलिन करण्याच्या राजकीय प्रस्तावाला विरोध या विषयावर त्यांनी कोकणी समाजाचे प्रबोधन केले.१९७३-७८ या कालावधीत ते कोकणी भाषा मंडळाचे अध्यक्ष होते. गोवा कोकणी अकादमीचे सदस्य, अध्यक्ष ही पदेही त्यांनी भूषविली आहे. कला अकादमी गोवा या संस्थेतही त्यांनी गोमंतक संस्कृतीसंदर्भात भरीव कार्य केले. २०१५ मध्ये त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

संदर्भ : http://sahitya-akademi.gov.in/library/meettheauthor/uday_bhembre.pdf


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.