सरदेसाई, लक्ष्मणराव : (१८ मार्च १९०५ – ५ फेब्रुवारी १९८६). नामवंत मराठी गोमंतकीय कथाकार, स्वातंत्र्यसेनानी आणि विचारवंत. मराठी कथाविश्वात त्यांचे स्थान महत्त्वाचे आहे. त्यांनी उत्कृष्ट व्यक्तिचित्रेही लिहिली. ललितनिबंध लिहिले. कथा हा त्यांच्या लेखनाचा आणि चिंतनाचा मर्मबंध होता. सातशेहून अधिक कथा त्यांनी लिहिल्या. कुशल अध्यापक अशीही जनमानसात त्यांची प्रतिमा आहे. त्यांचा जन्म गोवातील फोंडा तालुक्यातील सावाई-वेरे या मांडवी नदीच्या काठावर वसलेल्या गावात झाला. त्यांचे संपूर्ण नाव लक्ष्मण श्रीपाद सूर्यराव सरदेसाई असे होते. त्यांचे घराणे मूळचे श्रीमंत. पण त्या ऐश्वर्याचा उपभोग त्यांना घेता आला नाही. त्यांचे प्राथमिक शिक्षण सावई-वेरे येथेच झाले. पणजीला लिसेवचा (लायसियम) सात वर्षांचा अभ्यासक्रम त्यांनी १९२५ मध्ये पूर्ण केला, तसेच ‘इंश्तितूतु कोमेर्सियल’ची पदविका घेतली. त्यानंतर त्यांनी म्हापश्याला ‘कुलॅजियु इन्दियानु’ नावाची खाजगी शिक्षणसंस्था स्थापन केली. तेथे त्यांनी पाच वर्षे काम केले. पुढे गोवा विदयाप्रसारक मंडळाने चालविलेल्या फोंडयाच्या कुलॅजियो आलमैद कॉलेजचे प्रमुख व संचालक म्हणून दहा वर्षे त्यांनी काम पाहिले व त्या काळात संस्था भरभराटीस आणली. ही संस्था त्यावेळी राष्ट्रवादी चळवळीचे केंद्र होते. त्यानंतर त्यांनी मडगाव येथे ‘इंश्तितूतु रेनास्सेंस’ हे लिसेवचे सात वर्षाचे शिक्षण देणारे खाजगी विदयालय स्थापन करून ते पाच वर्षे चालविले. गोमंतकाच्या राजकीय पारतंत्र्यामुळे लक्ष्मणराव सरदेसाई अस्वस्थ होत असत. राष्ट्रवादाची ही उर्मी विद्यार्थ्यांमध्ये संक्रमित करण्यात त्यांचा फार मोठा वाटा आहे. हा उद्रेक त्यांच्या लेखनातून व्यक्त होत असे.

पण त्याला त्यांनी प्रचारी मूल्य कधीही येऊ दिले नाही. राममनोहर लोहिया यांनी १८ जून १९४६ रोजी मडगावला सुरू झालेल्या सभाबंदीविरोधी आंदोलनात लक्ष्मणराव सरदेसाई यांनी भाग घेतला. १९४६ मध्ये सत्यागहात भाग घेतल्यामुळे त्यांना एक महिना व पुढे १९४७ मध्येही काही काळ कारावास भोगावा लागला.‘नॅशनल कॉंग्रेस गोवा’ या सघटनेच्या संस्थापकांपैकी ते एक होते. सत्याग्रही म्हणून त्यांनी गोवा मुक्तिआंदोलनात भाग घेतला. गोव्याच्या राष्ट्रीय काँग्रेसच्या संस्थापकांपैकी ते एक होते.१९४९ मध्ये ते मुंबईला गेले व तेथे दहा वर्षे राहून त्यांनी सभा, परिषदा, लेखन यांच्याव्दारे गोमंतक स्वातंत्र्य आंदोलनाचे कार्य केले. ‘गोवा पोलिटिकल कॉन्फरन्स’च्या एका अधिवेशनाचे ते स्वागताध्यक्ष होते. १९५९ साली ते दिल्लीला गेले व तेथे आकाशवाणीच्या कोकणी-पोर्तुगीज विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी १९६३ पर्यंत काम पाहिले. १९६३ मध्ये ते गोव्याला परतले व त्यांनी गोवा विलीनीकरणाच्या विरोधी प्रचार-आघाडीत काम केले.

लहानपणापासून त्यांना वाचनाची आवड होती. मराठी, इंग्रजी, फ्रेंच आणि पोर्तुगीज ग्रंथांचे त्यांनी भरपूर वाचन केले. फ्रेंच राज्यक्रांतीचे फलित म्हणून जगन्मान्य ठरलेल्या स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या मानवी मूल्यांचा प्रभाव त्यांच्यावर पडला होता. संवेदनक्षम वयापासून त्यांचा बुद्धिप्रामाण्यवादी आणि राष्ट्रवादी मन:पिंड घडण्यात या विचारसरणीचा मोठा वाटा होता. त्यामुळेच त्यांना सृजनशील लेखनाची प्रेरणा मिळाली. त्यांनी ‘सौमित्र’ या टोपणनावाने भारत या साप्ताहिकात मराठीतून लेखन करण्यास सुरूवात केली होती. १९२२ पासून तरुण वयातच लक्ष्मणराव सरदेसाई यांनी ललित आणि वैचारिक लेखनास प्रारंभ केला होता. भारत, हिंदू, केसरी आणि द हॅराल्ड मधून त्यांनी लेखन केले.१९५१ मध्ये न्यूयॉर्क हॅराल्ड ट्रिब्यून च्या कथास्पर्धेत ‘मोहोर’ या त्यांच्या कथेला पहिले पारितोषिक मिळाले. पुढे केवळ कथासाहित्य यासाठी वाहिलेल्या यशवंत या मातब्बर मासिकातून त्यांच्या कथा नियमितपणे प्रसिद्ध झाल्या. लक्ष्मणराव सरदेसाई यांचे सागराच्या लाटा (१९३५), वादळातील नौका (१९३६), ढासळलेले बुरूज (१९४०), अनितेचे दिव्य (१९४४), संसारातील अमृत (१९५१), सोनेरी ऊन (१९६४), निवारा (१९६९), कल्पवृक्षाच्या छायेत, मोहोर, मधुचंद्र, सुरेख संगम, बिजेची कोर आणि पडसाद असे अनेक कथासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या निवडक कथांचे लक्ष्मणरेषा (१९५७) आणि वेचक लक्ष्मणराव सरदेसाई असे दोन संग्रह प्रकाशित झाले आहेत. मांडवी, तू आटलीस? (१९४७) ही कादंबरी लक्ष्मणराव सरदेसाई यांनी लिहिली. तिला गोमंतकीय समाजजीवनाची पार्श्वभूमी लाभलेली आहे. तत्कालीन राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक ताण-तणावांचे चित्रण तिच्यात आहे. प्रख्यात फ्रेंच कादंबरीकार आल्बर्ट काम्यू यांच्या द आऊटसायडर या कादंबरीचा जगावेगळा (१९५८) या नावाने त्यांनी अनुवाद केला आहे. फ्रान्सिस्क लुइश गोमिश यांच्या उश बामानिश पोर्तुगीज कादंबरीचा ब्राह्मण (१९७७) या नावाने त्यांनी अनुवाद केला आहे. गोव्याकडची माणसं (१९८१) हा सरदेसाई यांचा व्यक्तिचित्रांचा संग्रह आहे. गोव्याच्या मातीचा रंग-गंध असलेली ‘रेंदेर’, ‘देमानिस्त’, ‘पोदेर’, ‘गावडो’, ‘शेट’, ‘भगत’, ‘जुगारी’, ‘झिला’, ‘शाळामास्तर’ आणि ‘चंपा भावीण’ ही व्यक्तिचित्रे त्यांनी समरसतेने रेखाटली आहेत. या सगळ्या व्यक्तिचित्रांतून गतकालीन गोमंतकीय जनजीवनाचे चित्र दृग्गोचर होते. त्या जीवनाकडे ते कधी मिस्कीलपणे तर कधी अंतर्मुख होऊन पाहतात. उत्तरायुष्यात लक्ष्मणराव सरदेसाई यांनी कोकणीतून साहित्यनिर्मिती केली आहे. खबरी कांय कर्माच्यो, कांय वर्माच्यो, रामराज्याची वागाभोंगडी, व पापडांकवळ्यो ही त्यांची कोंकणीतील पुस्तके. त्यांच्या खबरी कांय मर्माच्यो… या पुस्तकाला साहित्य अकादमी’चा पुरस्कार प्राप्त झाला. कथाशिल्प (१९७७) या त्यांच्या समीक्षात्मक पुस्तकात त्यांनी आयुष्यभरातील कथाचिंतनाची मांडणी केली आहे. याच पुस्तकात त्यांनी कोकणीतील महत्त्वाच्या कथाकारांच्या कथेचे मूल्यमापनही केले आहे.

सरदेसाई यांच्या कथालेखनाची काही गुणवैशिष्ट्ये अधोरेखित करताना एक गोष्ट प्रामुख्याने नमूद करायला पाहिजे, ती ही की, त्यांनी पाच तपे कथा साधना केली. गोमंतकाचा परिसर आणि तेथील जनजीवन हा त्यांच्या कथालेखनाचा मुलकंद आहे. थॉमस हार्डीने म्हटल्याप्रमाणे, “जितके तुम्ही विवक्षित प्रदेशाचे सूक्ष्मतेने चित्रण करता तितके तुम्ही विश्वात्मक होता.” हे वाङ्मयीन तत्त्व त्यांनी आपल्या मनावर बिंबविले होते. त्यांनी लिहिलेल्या कथा गोव्याच्या प्रदेशापुरत्या सीमित राहिल्या नाहीत. ‘माणूस’ हे त्यांच्या चिंतनाचे केंद्र बनले. स्वाभाविकपणे मनुष्यत्वाचा सोलीव गाभा ते उलगडून दाखवितात. गोमंतकाच्या तत्कालीन राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचे अंतरंगदर्शन घ्यायचे असेल तर सरदेसाई यांच्या कथाविश्वाचा धांडोळा घ्यावा लागेल. त्यांची अनुभूती अस्सल होती. त्यांचा मन:पिंड सौंदर्यासक्त होता. जीवनाच्या सुसंगतीत ते रमत. विसंगतीमुळे त्यांच्या मनाची तीव्र तडफड होत असे. त्यांची वास्तवाची बैठक पक्की होती. त्यांच्या जीवनविषयक धारणा ठाम होत्या. त्यांची अभिव्यक्ती सृजनात्मक अंगाने विकास पावून समर्थ शब्द्कळेद्वारा होते. कथानकावरची त्यांची पकड सुटत नाही. नैतिकता – न-नैतिकता यांच्या वादात न पडता कलात्मकतेचे भान ते ठेवतात. शारीर आणि मानस संवेदनांचे ते यथातथ्य चित्रण करतात. त्यांच्या कथेतील व्यक्तिचित्रण जिवंत आणि रसरशीत झालेले आहे. जीवनजाणिवेचे प्रगल्भ आकलन, चिंतनशीलता आणि जीवनाच्या सम्यक पैलूंविषयीचे भान यांची एकतानता त्यांच्या कथालेखनात आढळते. गोमंतकातील नितांत रमणीय निसर्गाचे साहचर्य ही त्यांच्या कथालेखनाला लाभलेले आहे. हे निसर्गचित्रण कथाप्रसंगाशी एकरूप होते. कधी कधी अशी वर्णने काव्यात्म अनुभूतीने ओथंबून गेलेली आहेत असे आढळून येते. परिणतावस्थेतील त्यांच्या कथा दीर्घकथेकडे वाटचाल करताना दिसून येतात. एका व्रतस्थ कथोपासकाचा हा समृद्ध प्रवास अभ्यसनीय वाटतो. गोमंतकाच्या भूमीचा स्पंदनकारी आत्मा त्यांना सापडलेला होता.

कुडचडे येथे ३१ डिसेंबर १९७७ रोजी भरलेल्या १५ व्या अ. गो. मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषविले. त्यांचे अध्यक्षीय भाषण म्हणजे त्यांच्या प्रदीर्घ काळ केलेल्या साहित्यचिंतनाचे नवनीत होय.“माणसाचे अंतर्बाह्य जीवनाचे दर्शन घडवणे हे ललित साहित्याचे कार्य. स्थळ, काळ, धर्म, संस्कृती, परंपरा, इतिहास अशा वेगवेगळ्या संस्कारांचा परिपाक म्हणजे व्यक्ती. म्हणून जगातील कोणतेही प्राचीन-अर्वाचीन साहित्य प्रादेशिकच आहे. प्रादेशिकता नसलेले अभिजात साहित्य जगात नाहीच, असे म्हटले तरी चालेल.” हे त्यांचे विचार मननीय आहेत. आयुष्याच्या अखेर पर्यंत ते लेखनमग्न राहिले. प्रसिद्ध कोकणी साहित्यिक मनोहरराय सरदेसाय हे त्यांचे पुत्र होत.

मुंबई येथे लक्ष्मणराव सरदेसाईंचे निधन झाले.

संदर्भ :

  • कामत, श्रीराम पांडुरंग (संपा), मराठी विश्वचरित्र कोश ,खंड ५, विश्वचरित्र संशोधन केंद्र,गोवा, १९७७.