निकोटीन हे अल्कलॉइड गटातील एक विषारी संयुग आहे. तंबाखू या वनस्पतीमधील (निकोटियाना टोबॅकमNicotiana tobacum) हे मुख्य अल्कलॉइड असून तंबाखूचे मादक गुणधर्म व वास निकोटीनमुळेच असतात. तंबाखूच्या पानांमध्ये त्याचे प्रमाण सर्वाधिक असून ते मॅलिक अम्ल, सायट्रिक अम्ल, ॲसिटिक अम्ल यांच्याबरोबर संयोगरूपांत असते.

इतिहास : एल्. व्हकलीन यांनी  तंबाखूच्या द्रावणातून निकोटीन वेगळे काढले (१८०९). जर्मनीतील हायडलबर्ग विद्यापीठात पोझेल्त आणि राइनमान यांनी तंबाखूपासून निकोटीन वेगळे करून शुद्ध केले (१८२८). त्यांनी या संयुगाला ‘निकोटीन’ हे नाव तंबाखूच्या निकोटियाना टोबॅकम  या नावावरून ठेवले. निकोटियाना  हे नाव पोर्तुगालमधील फ्रान्सचा राजदूत झां नीको दी विल्मन यांच्या सन्मानार्थ दिले. कारण नीको यांनी तंबाखू व तंबाखूच्या बिया फ्रेंच राजाला भेट दिल्या होत्या. मेल्सन यांनी निकोटीनचे सूत्र शोधून काढले (१८४३) तर श्लॉसिंग यांनी रेणूसूत्र शोधून काढले (१८४७). या संयुगावर वेगवेगळ्या रासायनिक अभिक्रिया केल्यास जी संयुगे निर्माण होतात, ती ओळखून व त्यांच्या निर्मितीची संगती लावून ॲडॉल्फ पिनर आणि रिचर्ड वुल्फेन्स्टाइन यांनी निकोटीनचे संरचना सूत्र निश्चित केले (१८९३). पीक्टे यांनी प्रयोगशाळेत संश्लेषण प्रक्रियेने निकोटीन सर्वप्रथम बनवले (१९०४).

प्राप्ती : तंबाखूची पाने, देठ इत्यादींचे चूर्ण पाण्यात मिसळतात. निकोटीन पाण्यात विरघळत असल्याने त्याचे द्रावण बनते. या द्रावणात कॉस्टिक सोडा (सोडियम हायड्रॉक्साइड) मिसळला की निकोटीन वेगळे होते. या मिश्रणाचे बाष्पीय ऊर्ध्वपातन (steam-distillation) प्रक्रियेने निकोटीन वेगळे करता येते. औद्योगिक उत्पादनात तंबाखूच्या पाने व देठ यांचा चुरा चुन्याचे व कॉस्टिक सोडा यांच्या द्रावणात मिसळून त्याचे ट्रायक्लोरोएथिलीन द्रावकाने निष्कर्षण करतात. या निष्कर्षित द्रावणापासून निकोटीन वेगळे करतात. संश्लेषण प्रक्रियेने देखील निकोटीन बनवता येते, परंतु ते खूप खर्चिक पडते.

निकोटीन : संरचनासूत्र

भौतिक गुणधर्म : निकोटीन हे द्रवरूप संयुग आहे. शुद्ध स्थितीत ते रंगहीन, चवहीन आणि तेलकट असते. परंतु प्रकाशात किंवा हवेच्या संपर्कात त्याचा रंग करडा होतो. पाण्यात व कार्बनी द्रावकांत ते सहज विरघळते. त्याचा उकळबिंदू २४६°से. आहे. रासायनिक सूत्र C10H14N2 असून त्याचे IUPAC नाव S (-) ३-(१-मिथिल-२-पायरॉलिडील) पिरिडीन आहे.

या संयुगाची प्रकाशत: सक्रिय (optically active) अशी दोन रूपे संभवतात. त्यांपैकी एक दक्षिणवलनी (+) आणि दुसरे वामवलनी (-) आहे. निसर्गात आढळणारे रूप हे वामवलनी असून त्याचे येथे वर्णन दिलेले आहे.

रासायनिक गुणधर्म : निकोटीन अम्लारिधर्मी आहे. निकोटीनचा अम्लाशी संयोग होऊन त्याचे क्षार बनतात. उदा., निकोटीन सल्फेट. निकोटीनच्या ऑक्सिडीकरणाने निकोटिनिक अम्ल व ब्रोमिनची अभिक्रिया केल्यास डायब्रोमोटिकोनीन मिळते.

उपयोग : निकोटीन व निकोटीन सल्फेट हे कीटनाशक म्हणून अनेक वर्षांपासून वापरले जाते. ते चेताविष असल्याने वनस्पतींचे शाकाहारी प्राण्यांपासून आणि विशेषत: कीटकांपासून रक्षण करते.

निकोटीनयुक्त चघळण्याच्या गोळ्या

धूम्रपान आणि निकोटीन यांचा सहसंबंध : एका सिगारमध्ये असणारे निकोटीन मनुष्याच्या मृत्यूला पुरेसे असते. मनुष्यासाठी ५० ते १०० मिग्रॅ. निकोटीन जीवघेणे ठरू शकते. परंतु तंबाखूचे ज्वलन केले असता बहुतांशी निकोटीन जळून गेल्याने त्याचा नाश होतो. तंबाखूचे सेवन करताना निकोटीनचा विषारी परिणाम अपेक्षेइतका होत नाही. कारण पोटात गेल्यावर ते अल्प प्रमाणात शोषले जाते, त्याने उलट्या होतात व तंबाखू बाहेर पडल्यामुळे निकोटीन जास्त शोषला जात नाही. धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीच्या रक्तात ५ ते ५० नॅनोग्रॅ./मिली. निकोटीन असते. अत्यंत कमी प्रमाणात सस्तन प्राण्यांमध्ये ते उत्तेजक म्हणून कार्य करते; धूम्रपानामुळे येणारे उत्तेजन तात्पुरते असते.

निकोटीनचे व्यसन लवकर लागते.  तंबाखूचा एक वापर त्यातील निकोटीनमुळे धूम्रपानासाठी होतो. धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींमध्ये अचानक नूर बदलणे, ताण, अस्वस्थता, एकाग्रता कमी होणे, झोप न लागणे इ. चिन्हे दिसून येतात. धूम्रपानामुळे मनुष्याच्या चेतासंस्थेवर तसेच श्वसन संस्थेवर दुष्परिणाम होतात, तर तंबाखूच्या सेवनाने कर्करोग होण्याची शक्यता असते. धूम्रपान बंद करण्याची इच्छा असलेल्या व्यक्तींवर उपचार करण्यासाठी निकोटीनयुक्त चघळण्याच्या गोळ्या (chewing gum) देतात.

पहा : तंबाखू, धूम्रपान.

समीक्षक : श्रीनिवास सामंत