गंगी आणि सूर्यराव : (गंगा आणि सूर्यराव किंवा गोमाजी कापसे यांचे चरित्र). भास्कर गोविंद रामाणी यांनी लिहिलेली चरित्रात्मक ऐतिहासिक स्वरुपाची कादंबरी. रामाणी यांनी या कादंबरीशिवाय साध्वी तारा ही कादंबरी लिहिल्याचा उल्लेख आहे. २०४ पृष्ठांची ही कादंबरी १८९० साली प्रकाशित झाली. शिवाजी महाराजांचा पराक्रम व त्यांचा प्रजाहितदक्षपणा असे या कादंबरीचे एकूण आशयसूत्र आहे. कादंबरीच्या कथानकात ऐतिहासिक संदर्भाला कल्पनेची जोड दिली आहे. विजापूरपासून ७-८ कोसांवर असलेल्या आनंदपुरी या गावात नामांकित जहागिरदार हणमंतराव व त्यांच्या पत्नी आनंदीबाई आपला मुलगा सुंदररावासह राहात असतात. विवाहयोग्य झाल्यानंतर सुंदररावचा विवाह विजापूर येथील दौलतरावांच्या गंगाबाई या मुलीशी होतो. गंगाबाई सुंदर व सुशिल असते. नागरे गावातील गोमाजी कापसे याचे लक्ष गंगाबाईच्या सुंदरतेकडे जाते. तो तिच्यावर मोहित होतो. दौलतरावांनी गंगाबाईसाठी आपले स्थळ नाकारले होते हे लक्षात आल्यानंतर गोमाजी चिडतो व गंगाबाईचे अपहरण करतो. नारोपंत व माधवराव हे दोघे मिळून गंगाबाईच्या शोधासाठी बाहेर पडतात. इकडे शिवाजी महाराज, संभाजी, येसाजी, तानाजी हे आग्य्राहून सुटून जंगलातून पळून येत असताना वाघ आडवा येतो. त्यावेळी शिवाजी महाराज वाघाला ठार मारताना जखमी होतात. यावेळी त्यांना विजापूर जवळच्या मुरर्शिदाबाद या गावातील विनायक नावाच्या ब्राह्मणाकडे तानाजी घेऊन जातो. तानाजी व येसाजी हे शिवाजी राजांच्या आग्रहावरुन संभाजीला सुखरुप पोहचवायला जातात. पण तानाजी शिवाजी महाराजांच्या नकळत त्या गावातच राहतो. ब्राह्मणाच्या घरची परिस्थिती पाहून त्याला बक्षिस मिळावे म्हणून त्या गावातील सरदाराच्या हवाली होतो. पुढे विनायकाला तानाजीकडून खरी परिस्थिती समजल्यानंतर ते दोघे शिवाजी महाराजांच्या सुटकेसाठी मदत करतात. दरम्यान गोमाजी गंगाबाईलाला एका विवरात बंद करुन ठेवतो. इकडे गंगाबाईच्या शोधार्थ निघालेल्या माधवरावाला व सुंदररावाला गोमाजीचे साथीदार पकडतात. ते माधवरावाल एका पेटीत घालून पुरतात. सुंदररावाला तलावात ढकलून देतात पण सुदैवान ते दोघे यामधून बचावतात. पुढे माधवराव पुन्हा गोमाजीच्या कैदेत सापडतो. अखेर प्रतापराव या पराक्रमी पुरुषामुळे गंगाबाईची व माधवरावांची सुटका होते. गंगी आणि सुंदररावाची भेट होते.
संदर्भ : भोळे, भास्कर, लक्ष्मण, एकोणीसाव्या शतकातील मराठी गद्य, साहित्य अकादेमी, नवी दिल्ली.